Navaratri’s 9 Political Coulur’s – BVA & Other Powerhouses in MAHA Politics
तुळशीदास भोईटे –BVA & Other Powerhouses in MAHA Politics – महाराष्ट्राच्या राजकारणात पाच प्रमुख पक्षांशिवाय इतरही अनेक पक्ष आहेत, जे स्थानिक पातळीवर प्रभाव पाडत असतात. त्यातील काही तर फक्त जिल्ह्यापुरतेच राजकारण करतात. त्यावरच समाधानी असतात.
आज आपण जिल्हा राजकारणात प्रभाव राखणाऱ्या जनसुराज्य शक्ती आणि स्वराज्य पक्ष, राष्ट्रीय युवा स्वाभिमान पक्ष, बहुजन विकास आघाडी-बविआ, बहुजन समाज पक्ष या पाच पक्षांचा आढावा घेत आहोत. यांचे वैशिष्ट्य म्हणजे बसपा देशपातळीवर आहे. चार पक्ष हे जिल्हा पातळीवर आहेत.
जनसुराज्य शक्ती पक्ष (Jansurajya shkati)
जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेते विनय कोरे उर्फ सावकार यांच्यासाठी 1999 यावर्षी झालेली विधानसभा निवडणूक खूपच महत्त्वाची ठरली. त्या निवडणुकीत विनय कोरेंनी अपक्ष म्हणून लढताना त्याच वर्षी स्थापन झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसशी आघाडी केली. विनय कोरे निवडून आले. या विजयानंतरही ते अपक्षच राहिले.
कोरेंचे राजकारण हे कोल्हापुरातील शिवसेना पक्षाच्या प्रभावाला आव्हान देणारे आणि काँग्रेसच्या प्रस्थापित नेत्यांच्या विरोधातील होते. त्या निवडणुकीत महाराष्ट्रात सत्तांतर घडले.

Vinay Kore
काँग्रेस राष्ट्रवादीचे सरकार सत्तेत आले. ज्यांच्या त्रासामुळे कोरेंनी अपक्ष लढत वेगळी वाट स्वीकारली. ते सर्व काँग्रेस नेते नव्या सरकारमध्ये प्रभावी होते. जिल्हा बँकेच्या निवडणुकीतही कोरेंना त्रास देण्यात आला. त्यामुळे विनय कोरे यांनी काँग्रेस राष्ट्रवादीचे सरकार पाडण्याचे ठरवले. त्यांच्यासोबत किमान 20-22 आमदार तयार झाले.
सुधाकरराव नाईकांसारखा मजबूत नेताही सहभागी झाला. पण पुढे सरकार वाचवण्यासाठी शरद पवार सरसावले. सरकार पाडायची वेळ आली, तर 15 आमदार परत फिरले. सातच ठाम राहिले. त्या बंडातील शेतकरी कामगार पार्टीची भूमिका काहीशी संदिग्ध वाटल्याचे विनय कोरेंनी पुढे सांगितले.
अविश्वास ठरावाच्या आधीच विधानसभेचे तत्कालीन अध्यक्ष अरुण गुजराथी यांनी अतिवेगाने सुनावणी करून निर्णयही दिला आणि विनय कोरेंसह सात आमदारांना अपात्र ठरवले. त्यांची आमदारकी गेली. तसेच पुढील सहा वर्षे निवडणूक लढण्यावरही बंदी आली. विनय कोरेंसह सर्व सातजण न्यायालयात गेले.
सर्वोच्च न्यायालयाने विधानसभेचे अध्यक्ष अरुण गुजराथींचा आदेश रद्द केला. आमदारकी वाचली. त्या घटनेमुळे विनय कोरेंनी स्वतंत्र पक्ष काढायचा निर्णय घेतला. त्या जिद्दीतून जनसुराज्य शक्ती पक्षाची स्थापना झाली.
जनसुराज्य शक्तीच्या स्थापनेनंतर 2004च्या पहिल्या निवडणुकीत 4 आमदार निवडून आले. 2009मध्ये बळ 2 आमदारांवर घसरलं. 2014मध्ये 2, 2019मध्ये एकच आमदार आणि आता 2024मध्ये पुन्हा 2 आमदार असे यश मिळवले.
कोल्हापूरच्या गादीचा स्वराज्य पक्ष (Kolahpur Swarajya Party)
स्वराज्य पक्षाची स्थापना कोल्हापूर गादीच्या संभाजी छत्रपती यांनी केली. त्यांची राजकीय महत्त्वाकांक्षा उघड आहे. त्यांनी कोल्हापुरातून विधानसभेची निवडणूकही लढवली होती. त्यांचा पराभव झाला होता. संभाजी ब्रिगेडने ‘छत्रपती आपल्या दारी’ मोहिमेतून त्यांना मराठवाड्यात घरोघरी फिरवले. त्यांना बीडमधून लढवण्याची तयारी केली जात होती. त्यातून त्यांची एक सार्वजनिक प्रतिमा निर्मिती झाली. पण ते निवडणूक लढले नाहीत.

संभाजी छत्रपती
भारतीय जनता पार्टीच्या पहिल्या सत्ताकाळात राष्ट्रपतीनियुक्त सदस्य म्हणून राज्यसभेत त्यांची नियुक्ती झाली. रायगड विकास प्राधिकरणाचीही जबाबदारी त्यांच्यावर होती. पुढे भाजपाने त्यांची पुन्हा राज्यसभेवर नियुक्ती केली नाही.
त्यांना कोल्हापुरातून लोकसभा निवडणूकही लढवायची होती. पण त्यांचे वडील मविआकडून लढले. शिवसेनेने शाहू महाराजांसाठी ही जागा सोडली होती. त्यानंतर त्यांनी निवडणूक लढवली. स्वराज्य पक्ष स्थापन करूनही एकाही जागी त्यांना यश मिळाले नाही.
ग्लॅमरस राजकारणवाला राष्ट्रीय युवा स्वाभिमान पक्ष (National Yuva Swabhiman)
बडनेरा मतदारसंघातील रवी राणा आणि नवनित राणा यांचा राष्ट्रीय युवा स्वाभिमान पक्ष हा सतत चर्चेत असतो. खरंतर 2019मध्ये शरद पवारांच्या समर्थनाने मिळवलेली लोकसभेची जागा पुन्हा मिळवण्याचा राणा दाम्पत्याचा प्रयत्न होता. नवनित राणांचा लोकसभा प्रवेश हुकला.

रवी राणा मात्र त्यांच्या बडनेरा मतदारसंघातून विधानसभेवर पोहोचले. नवनित राणा चर्चेत असतात, त्यांनी हनुमान चालिसा प्रकरणात उद्धव ठाकरेंच्या विरोधात आघाडी उघडली होती. पण अल्पावधीतच एक आमदार, एक खासदार झालेला त्यांचा पक्ष आता अदखलपात्र ठरला जाऊ लागला आहे.
आपली बविआ, आपले राजकारण (BVA)
आपले वसई-विरार!
वसई-विरार पट्टा म्हटले की, हितेंद्र ठाकूर आणि त्यांची बविआ म्हणजेच बहुजन विकास आघाडी. पण नामचीन भाई ठाकूर यांचे भाऊ असलेल्या हितेंद्र ठाकूर यांना 1990 च्या दशकात राजकारणात आणले शरद पवारांनी. ते आधी युवक काँग्रेसचे तालुका प्रमुख बनले. 1990च्या निवडणुकीत शरद पवार यांनी त्यांना आणि उल्हासनगरच्या पप्पू कलानीला तिकीट दिले.
त्यावरून शरद पवारांवर खूप टीका झाली. परंतु वसई-विरारमध्ये दिवाळी साजरी झाली. त्यावेळी या परिसरात असलेली हितेंद्र ठाकुरांची पकड पाहता त्यांच्यासाठी निवडणूक अवघड नव्हती. ते ही पहिलीच निवडणूक सहज जिंकले. त्यानंतर ते 2009 पर्यंत वसई मतदारसंघातून निवडून येत होते. मात्र, 1995 पासून 2004 पर्यंत पुढील तीन निवडणुका ते अपक्ष लढले आणि जिंकले.
2009 मध्ये हितेंद्र ठाकूर बहुजन विकास आघाडी स्थापन करून निवडणुकीच्या मैदानात उतरले. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. मात्र, बविआच्या नालासोपारा आणि बोईसर अशा दोन जागा जिंकता आल्या. 2009 मध्ये पक्षाने पालघरची लोकसभेची जागाही जिंकली. 2014 मध्ये वसई-विरार, नालासोपारा आणि बोईसर अशा तीन जागांवर पक्ष विजयी झाला.
2019 मध्ये त्याची पुनरावृत्ती झाली. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत मात्र ठाकुरांना पराभवाचा जबर धक्का बसला. एकही आमदारकी उरली नाही. त्यामागे श्रमजीवी संघटनेच्या विवेक पंडितांचा भाजपाशी झालेला घरोबा, उत्तर भारतीय मतदारांचे प्रचंड वाढलेले प्रमाण आणि ठाकुरांनी वसई-विरार आणि नालासोपाऱ्याला गृहित धरणे हे जबाबदार ठरल्याचे मानले जाते.

हितेंद्र ठाकूर यांचे राजकीय धोरण सत्ताधारी पक्षांसोबत राहायचे होते. त्यामुळे सत्ता बदलली की, बविआची धोरणेही बदलत असत. पण त्याचा फटका 2024पर्यंत कधी बसला नव्हता. मग आताच का बसला असावा? याचे कारण ठाकुरांच्या वसई-विरार-नालासोपारा या बालेकिल्ल्यातच मोठ्या प्रमाणावर वाढलेले उत्तर भारतीय मतदार हेही आहे. खरंतर ते 21व्या शतकातच वाढायला सुरुवात झाली. सिडकोकडे महामुंबई परिसर गेला.
पण मोकळ्या जागांवर अनधिकृतचा धंदा तसाच फोफावला. आडव्या पसरणाऱ्या झोपडपट्ट्या, चाळी केवळ निसर्गाला नख लावत नव्हत्या तर आपला एक वर्चस्ववादही निर्माण करत होत्या. हा वर्चस्ववाद जोपर्यंत मतांच्या गणितात बेरजेचा होता. मनपाच्या राजकारणात प्रभाग स्तरांवरही तो खुपत नव्हता. 2014, 2019 तो चालून गेला. पण 2024 मध्ये भाजपाने पद्धतशीरपणे चक्रव्यूह रचले. एकेकाळचे पुरोगामी, आदिवासींच्या न्याय्य हक्कांसाठी लढणारे विवेक पंडित भाजपात गेले.
त्यांच्या श्रमजीवी संघटनेने कितीही नाही म्हटले तरी वजन भाजपाच्या पारड्यात वाढवलेच. त्यात मग पुढे उत्तर भारतीय दुबे कुटुंबात लग्न झाल्यानंतर त्यांच्या कन्या डॉ. स्नेहा यांच्या नावापुढे दुबे हे उत्तर भारतीय आडनावही आले. भाजपासाठी मूळ मराठी मतं+ दुबेंना उमेदवारीमुळे उत्तर भारतीय मतं असे समीकरण झाले.
त्यातच भाजपाचे ज्येष्ठ नेते विनोद तावडे ठाकुरांच्या बालेकिल्ल्यात आले. त्यांच्यावर पैसेवाटपाचा आरोप झाला. लाईव्ह कव्हरेज झाले. ठाकूर पिता-पुत्र उमेदवार भलतेच आक्रमक दिसले. पण त्यानंतरही दोन्ही पिता-पुत्रांना विनोद तावडेंना सुखरुप मतदारसंघाबाहेर सोडावे लागले.
सत्ता असली तर ठाकुरांशी लढता येते, हा मेसेज तिथेच गेला. तिथेच ठाकुरांच्या कुंपणावरील मतदारांचा निर्णय स्पष्ट झाला होता.झालेही तसेच. आता चुकांपासून धडा घेत ठाकुरांनी काय बदल केलेत, त्यावरही आगामी मनपांसह जिल्हा परिषदांमध्ये काय चमत्कार घडतो ते कळेल.
बहुजन समाज पक्षाला उत्तरेत यश! (BSP)
महाराष्ट्रात खातेही उघडले नाही!
उत्तरेतील प्रबळ पक्ष असणारा बहुजन समाज पक्ष किंवा बसपा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घेत महाराष्ट्रात राजकारण करतो. परंतु बाबासाहेबांच्या महाराष्ट्रात कधीही बसपाला यश मिळालेले नाही. कांशिराम यांनी मायावतींच्या सहकार्याने उत्तरेत त्यातही उत्तर प्रदेशात जबरदस्त प्रभाव निर्माण केला. मायावती बसपाच्या मुख्यमंत्रीही झाल्या. पण महाराष्ट्रात मात्र खातेही उघडले गेले नाही.
बसपाचे राजकारण हे उत्तरकेंद्रीतच राहिल्याचा फटका बसला की बसपा या कॅडरबेस पक्षाला महाराष्ट्रात उत्तरेप्रमाणे समर्पित कॅडरच मिळू शकले नाही? खरंतर दोन्ही मुद्दे बसपाला बाबासाहेबांच्या राज्यातच खुंटवणारे ठरले. कांशिराम घडले पुण्यात. वैचारिक जडणघडण बाबासाहेबांच्या विचारांच्या मुशीतील. बामसेफमधून सरकारी कर्मचारी अधिकाऱ्यांची मजबूत बांधणी केली. त्याचा मोठा फायदा झाला.

मायावती
उत्तर प्रदेशात बसपा रुजत गेली. लढा, पाडा आणि मग जिंका! ही कांशिरामांची रणनीती. आधी लढायचं ते इतरांची मत खाऊन त्यांना पाडण्यासाठी. ते स्पर्धेतून दूर फेकले की मग लढायचे आणि जिंकायचे! पण महाराष्ट्रात त्यांना तसे कॅडर मिळाले नाहीच, पण लढणारेही जिंकायचे सोडाच, पण किमान पाडतील असेही मिळाले नाहीत!
काही मराठी चेहरे पक्षाशी जोडले गेलेही, पण टिकले नाहीत ते बसपाच्या उत्तरकेंद्रीत धोरणामुळेच! त्यामुळे कांशिरामांचा हा पक्ष बहेनजींकडे गेल्यावरही उत्तरेत सत्तेत होता. पण लढणे, पाडणे आणि जिंकणे या कशातही महाराष्ट्रात आजवर तरी यश मिळाले नाही.
हे देखील वाचा –
सर्वसमावेशकतेचे सर्व रंग काँग्रेसचं भविष्य उजळवणार?
नवरात्रीचे राजकीय नवरंग ! राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संभ्रमाचे राजकारण
नवरात्रीचे राजकीय’ रंग ! शिवसेना: रंग भगवाच, पण कशा बदलणार छटा?