India Rejects NATO Claim: नाटोचे (NATO) सरचिटणीस मार्क रुट्टे यांनी भारताबाबत एक मोठा आणि वादग्रस्त दावा केला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लादलेल्या शुल्कामुळे भारताने रशियाला त्यांच्या युक्रेन युद्ध रणनीतीबद्दल विचारणा केली असल्याचा दावा रुट्टे यांनी केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी थेट या विषयावर चर्चा केल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, भारताने हा दावा फेटाळून लावला आहे.
नेमका दावा काय?
रुट्टे म्हणाले, “ट्रम्प यांनी भारतावर लावलेल्या शुल्काचा रशियावर मोठा परिणाम होत आहे. भारत आता पुतिन यांच्याशी फोनवर बोलत आहे, आणि नरेंद्र मोदी त्यांना युक्रेनवरील तुमची रणनीति समजावून सांगायला सांगत आहेत. कारण या शुल्काचा फटका भारताला बसला आहे.”
अमेरिकेने रशियन तेल खरेदी केल्याबद्दल भारतावर 25% आणि भारतीय वस्तूंवर 25% असे एकूण 50% शुल्क लावले आहे. हे शुल्क म्हणजे रशियावर मोठा प्रतिबंध असल्याचे रुट्टे यांनी नमूद केले. रुट्टे यांच्या म्हणण्यानुसार, यामुळे रशियावर थेट परिणाम झाला, कारण मोदींनी पुतिन यांना विचारले, “मी तुम्हाला पाठिंबा देतो, पण तुम्ही मला रणनीति समजावून सांगाल का? कारण अमेरिकेने माझ्यावर 50% शुल्क लावले आहे.”
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे सडेतोड उत्तर
नाटो प्रमुखांच्या या दाव्यावर भारताने त्वरित आणि अत्यंत कडक प्रतिक्रिया दिली आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने रुट्टे यांचा दावा ‘पूर्णपणे चुकीचा आणि निराधार’ असल्याचे स्पष्ट केले आहे.
परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, “पंतप्रधान मोदींनी पुतिन यांच्याशी रुट्टे यांनी सांगितल्याप्रमाणे कोणताही संवाद साधलेला नाही. अशी कोणतीही चर्चा झालेली नाही.”
भारताने नाटो प्रमुखांना भविष्यात सार्वजनिक वक्तव्ये करताना अधिक जबाबदारी आणि सत्यता बाळगण्याचा सल्ला दिला आहे. “पंतप्रधानांच्या संवादांचे चुकीचे वर्णन करणारी किंवा न झालेल्या संभाषणांचा उल्लेख करणारी बेजबाबदार विधाने अस्वीकार्य आहेत,” असेही भारताने स्पष्ट केले आहे.
शुल्कावर भारताची भूमिका
भारताने अमेरिकी शुल्कावर टीका केली असून, 1.4 अब्ज नागरिकांसाठी परवडणारी ऊर्जा सुनिश्चित करण्यासाठी रशियन तेल खरेदी करणे आवश्यक असल्याचे सांगितले आहे. तसेच, युरोपीय संघ आणि अनेक नाटो सदस्य देशही रशियासोबत मोठ्या प्रमाणावर व्यापार करत असल्याकडेही भारताने लक्ष वेधले आहे.
हे देखील वाचा – ‘पूरग्रस्तांना तातडीची मदत करा’; शरद पवारांचा राज्य सरकारला सल्ला, म्हणाले…