Marathwada Farmer Suicide: मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी पूर्णपणे हतबल झाले असून, या नैसर्गिक संकटाने अनेकांचे संसार उद्ध्वस्त केले आहेत. अतिवृष्टी आणि खासगी सावकारांच्या कर्जाला कंटाळून धाराशिव जिल्ह्यातील शरद गंभीर (वय 40) तरुण शेतकऱ्याने बुधवारी (ता. 24) गळफास घेऊन आत्महत्या केली. वडिलांच्या पश्चात त्यांचे 11 वर्षांची मुलगी श्वेता आणि 5 वर्षांचा मुलगा वनवासी झाले आहेत.
श्वेताने तिच्या वडिलांची व्यथा आणि सरकारला केलेली भावनिक विनंती ऐकून संपूर्ण मराठवाडा हेलावून गेला आहे. श्वेताचा वडिलांच्या व्यथा सांगणारा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
दिवंगत शेतकरी शरद गंभीर यांची 11 वर्षांची मुलगी श्वेता गंभीर हिने वडिलांच्या आठवणी सांगताना डोळ्यात अश्रू आणले. ती म्हणाली, “माझ्या वडिलांना दिवसातून पंधरा-पंधरा मिनिटांनी फोन यायचे. सुट्टीच्या दिवशी रानात आले की, पप्पा आमच्या गळ्यात पडून रडायचे. कोणाचा फोन येतोय, असं विचारलं तर काहीच सांगत नव्हते. त्यांनी सर्व गोष्टी एकट्याने सहन केल्या आणि शेवटी… माझे पप्पा जसे गेले तसे कोणाचेही जाऊ नये, असं म्हणत श्वेताच्या अश्रूंचा बांध फुटला.”
श्वेताच्या म्हणण्यानुसार, तिच्या वाढदिवसाच्या दोन दिवस आधी तिचे वडील तिला धाराशिवला घेऊन जाणार होते, पण तिनेच “पैसे आल्यावर जाऊ” असं म्हटलं. त्यावर वडिलांनी फक्त हसून वेळ मारून नेली.
“त्यांच्याकडं पैसंच नव्हतं. कर्ज काढून सगळं शेतात घातलं, तेही संपलं, म्हणून खासगी सावकारांकडून पैसं घेतलं. ते पण शेतात गेलं अन् शेतातील पीक पाण्यात गेलं,” ही व्यथा सांगताना तिचे मन हेलावून गेले.
शरद गंभीर यांच्या कुटुंबाचे अस्मानी संकटामुळे सर्वस्व हिरावले गेले आहे. त्यांची सहा एकर शेती होती, ज्यात निम्मी बागायती आणि निम्मी जिरायती ) होती.
शरद यांनी विविध बँकांकडून कर्ज घेतले होते. मात्र, अतिवृष्टीमुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले. हाता-तोंडाशी आलेली पिके पाण्यात वाहून गेल्याने आणि कर्जफेडीचे मोठे संकट समोर उभे राहिल्याने त्यांनी अखेर मृत्यूला कवटाळले.
शरद गंभीर यांची इच्छा होती की, त्यांच्या मुलीने मोठे होऊन पोलीस व्हावे. आता वडिलांच्या पश्चात कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी लहान बंधू श्रीकांत यांच्या खांद्यावर आली आहे, जे कळंब येथे एका दुकानात काम करतात.
दरम्यान, सध्या अनेक नेते मंडळी नुकसानीची पाहणी करण्यासाठी बांधावर येत आहेत, पण अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी त्यांच्या गाड्या अडवून रोष व्यक्त केल्याचे चित्र मराठवाड्यात दिसत आहे.
हे देखील वाचा – ‘तुम्ही तेही नाही करू शकणार!’: शोएब अख्तरने केली ‘ती’ चूक अन् अभिषेक बच्चनने पाकिस्तानची उडवली खिल्ली