Sambhaji Brigade: सातारा येथे होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लेखक विश्वास पाटील यांच्या निवडीवर संभाजी ब्रिगेडने (Sambhaji Brigade) आक्षेप नोंदवला आहे. पाटील यांनी संभाजी कादंबरीत केलेल्या लिखाणातून छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान केल्याचा दावा करत त्यांनी माफी मागून लिखाण मागे घ्यावे, अन्यथा सातारा येथील नियोजित संमेलन होऊ देणार नाही असा इशारा संभाजी ब्रिगेडने दिला आहे.
संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष अॅड. मनोज आखरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, २००५ साली प्रसिद्ध झालेल्या विश्वास पाटील लिखित संभाजी या कादंबरीत महाराजांविषयी खोटी, आक्षेपार्ह आणि बदनामीकारक माहिती सादर केली आहे. मागील अनेक वर्षांपासून ब्रिगेडने या लिखाणाला विरोध करून आक्षेप नोंदवला होता,परंतु विश्वास पाटील यांनी मजकूर दुरुस्त केला नाही. २०२५ मध्ये २१ व्या आवृत्तीचे प्रकाशन झाले असून यात कोणतीही दुरुस्ती केल्याचे दिसत नाही. त्यामुळे या कादंबरीतील मजकूर त्वरित दुरुस्त न केल्यास हे संमेलन होऊ देणार नाही. या संदर्भात विश्वास पाटील आणि अखिल भारतीय साहित्य परिषदेला कायदेशीर नोटीस पाठविण्यात आली असून १५ दिवसात यावर उत्तर अपेक्षित असल्याचे यावेळी आखरे यांनी सांगितले.
दुसरीकडे विश्वास पाटील यांनी म्हटले आहे की,संभाजी ब्रिगेडच्या वकिलाकडून आम्हाला कायदेशीर नोटीस प्राप्त झाली आहे. संभाजी ही कादंबरी २० वर्षांपूर्वी प्रकाशित झाली आहे. ती महाराष्ट्राच्या जनतेने गांभीर्याने वाचली आहे. तिचे एतिहासिक व वाङ्मयीन मूल्य लक्षात घेता भारतीय ज्ञानपीठसारख्या संस्थेने ती १८ वर्षापूर्वी हिंदी व अन्य भाषांमध्ये प्रकाशित केली आहे. त्यांच्याकडून आम्ही आक्षेप मागवून घेत आहोत. एकदा त्यांचे आक्षेप समजले की त्यांच्या सर्व मुद्द्यांचा गांभीर्याने विचार केला जाईल.
हे देखील वाचा –