Postpone BARTI-SARTHI Exam – राज्यात मुसळधार पावसाने थैमान घातले असून अनेक ठिकाणी पूरस्थिती कायम आहे. हवामान विभागानेही अतिवृष्टीचा इशारा दिलेला असताना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (BARTI), छत्रपती शाहू महाराज संशोधन व प्रशिक्षण संस्था (SARTHI ), महात्मा जोतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) आणि टीआरटीआय या संस्थांनी अद्याप त्यांच्या सामायिक प्रवेश परीक्षा पुढे ढकललेल्या नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे.
या संस्थांच्या माध्यमातून यूपीएससी, एमपीएससी, बँकिंग, रेल्वे तसेच इतर स्पर्धा परीक्षांसाठी मोफत प्रशिक्षण दिले जाते. खासगी प्रशिक्षण संस्थांच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या या योजनांसाठी प्रवेशपूर्व परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांची निवड केली जाते.
पूर्वी प्रत्येक संस्था स्वतंत्रपणे परीक्षा घेत होती; मात्र समान धोरण राबविल्यापासून या सर्व संस्थांची प्रवेश प्रक्रिया एकत्र झाली असून तिची जबाबदारी बार्टीकडे सोपविण्यात आली आहे
ही सामायिक प्रवेश परीक्षा २९ आणि ३० सप्टेंबर रोजी घेण्यात येणार आहे. परंतु अद्यापही अनेक भागात पूरस्थिती गंभीर असून विद्यार्थ्यांना केंद्रावर पोहोचणे कठीण आहे. याउलट, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) तसेच वैद्यकीय व औषध द्रव्य विभागाने त्यांच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यामुळे बार्टी, सारथी, महाज्योती आणि टीआरटीआय यांनीही विद्यार्थ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन परीक्षा पुढे ढकलावी, अशी जोरदार मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे.
हे देखील वाचा –
मोदी -शहांनी मराठवाड्याचा हेलिकॉप्टरने तरी दौरा करावा ! राऊतांचा हल्लाबोल
आक्रमक ‘ओंकार’ हत्ती गोव्यातून पुन्हा सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखलआज
भारत-पाकिस्तान अंतिम सामना ; उबाठाला अचानक बहिष्काराची पुन्हा आठवण झाली