Rahul Gandhi Slams BJP-RSS – लडाखमधील हिंसाचारात चार जणांच्या मृत्यूसाठी केंद्र सरकारला जबाबदार धरत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज भाजपावर निशाणा साधला. या हिंसाचारासाठी त्यांनी भाजपा आणि संघाला जबाबदार धरले.
राहुल गांधी यांनी सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवर लिहिले की, लडाखचे अद्भुत लोक, संस्कृती आणि परंपरा यांच्यावर भाजपा आणि संघाकडून हल्ला होत आहे. लडाखच्या लोकांनी आपल्या हक्कांसाठी आवाज उठवला, पण भाजपाने ४ तरुणांची हत्या केली आणि सोनम वांगचुक यांना तुरुंगात टाकले.
राहुल यांनी सरकारकडे हत्या थांबवा. हिंसाचार थांबवा. धमकावणे थांबवा. लडाखला आवाज द्या. त्यांचा संविधानातील सहाव्या परिशिष्टात समावेश करा, असे आवाहन केले आहे. या प्रकरणी कोणतीही प्रतिक्रिया दिली नसल्याबद्दल आम आदमी पार्टीने तथाकथित विरोधी पक्षनेते म्हणत राहुल गांधींवर तिखट शब्दांत टीका केली होती.
लडाखमधील हिंसाचाराला जबाबदार ठरवत पोलिसांनी प्रसिद्ध हवामान कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना शुक्रवारी अटक करण्यात आली होती. त्यांना तातडीने दिल्लीला आणून राजस्थानातील जोधपूर तुरुंगात हलवले.
स्वतंत्र राज्याचा दर्जा आणि संविधानाच्या सहाव्या परिशिष्टात लडाखचा समावेश करण्याच्या मागणीसाठी गुरुवारी झालेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले होते.
केंद्रीय गृहमंत्रालयाने लगेचच वांगचूक यांच्यावर या सगळ्या हिंसाचाराचा ठपका ठेवला होता. एवढेच नाही, तर वांगचूक यांच्या एनजीओची परदेशी आर्थिक मदत घेण्याची परवानगीही रद्द केली होती.
लडाख पोलिसांनीसुद्धा पत्रकार परिषद घेऊन वांगचूक यांचे पाकिस्तानशी संबंध जोडले. दुसरीकडे, गृह मंत्रालयाला हिंसाचारापूर्वी, लडाखमध्ये उद्रेक होण्यापूर्वी हे संबंध, गैरव्यवहार का दिसले नाहीत, असा प्रश्न विचारला जात आहे.
हे देखील वाचा –
थलापतीच्या सभेत चेंगराचेंगरी मृतांचा आकडा ४० वर पोहोचला ! टीव्हीके’ची उच्च न्यायालयात धाव
मराठी साहित्य संमेलन होऊ देणार नाही ! संभाजी ब्रिगेडचा इशारा