IAS Archana Singh: राजस्थानच्या बांसवाडा येथे आयोजित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने एका वरिष्ठ आयएएस (IAS) अधिकाऱ्याला मोठी किंमत चुकवावी लागली आहे. तांत्रिक अडचणींमुळे पंतप्रधानांच्या सभेचे थेट प्रसारण विस्कळीत झाले, त्यामुळे माहिती तंत्रज्ञान आणि दळणवळण विभाग (IT&C) सचिव अर्चना सिंह यांना त्यांच्या पदावरून तात्काळ हटवण्यात आले आहे.
रिपोर्टनुसार, पंतप्रधान सभेत दाखल झाल्यानंतर सुमारे 10 मिनिटे व्हिडिओ प्रणाली फेल झाली होती. तसेच, सभेदरम्यान पंतप्रधानांचा शेतकऱ्यांशी सुरू असलेला संवाद ऐकताना ऑडिओमध्ये देखील अडचणी आल्या. राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमात अशा त्रुटींना राज्य सरकारकडून गांभीर्याने घेण्यात आले आणि याच कारणामुळे अर्चना सिंह यांचे पद काढून घेण्यात आले आहे.
IAS अर्चना सिंह यांच्यावर तातडीची कारवाई
2008 बॅचच्या आयएएस अधिकारी असलेल्या अर्चना सिंह यांना ‘APO’ ( Awaiting Posting Orders) या स्थितीवर ठेवण्यात आले आहे. यानुसार, अधिकाऱ्याला त्यांच्या सध्याच्या जबाबदारीतून मुक्त केले जाते, परंतु त्यांना अद्याप नवीन कार्यभार दिला जात नाही.
त्यांच्या पदावरून हटवण्यामागे ‘प्रशासकीय कारणे’ असल्याचे अधिकृत आदेशात कार्मिक विभागाने नमूद केले आहे.
दरम्यान, हा तांत्रिक बिघाड ‘निष्काळजीपणा’ मानला गेला. राष्ट्रीय स्तराच्या कार्यक्रमात अशा प्रकारच्या त्रुटींना माफ केले जाणार नाही, असा स्पष्ट संदेश राज्य सरकारने यातून दिला आहे.
दरम्यान, अर्चना सिंह यांनी उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील अलाहाबाद विद्यापीठातून बीएससी (BSc) आणि एमएससी (MSc) या पदव्या प्राप्त केल्या आहेत. त्यांनी 2007 मध्ये यूपीएससी (UPSC) परीक्षा उत्तीर्ण केली आणि 2008 मध्ये त्यांची राजस्थान कॅडरसाठी निवड झाली होती. त्या हिंदी आणि इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये पारंगत आहेत.
हे देखील वाचा – शेतकरी संकटात! शरद पवारांनी राज्य सरकारकडे केल्या ‘या’ 5 महत्त्वाच्या मागण्या