Suryakumar Yadav : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने आशिया कप जिंकल्यानंतर देशाप्रती असलेल्या भावनेतून एक मोठा निर्णय घेतला आहे. आशिया कप 2025 (Asia Cup 2025) स्पर्धेतून मिळालेली त्याची संपूर्ण मॅच फी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी आणि भारतीय सशस्त्र दलांना मदत म्हणून देण्याचा निर्णय त्याने घेतला आहे.
त्याने X (ट्विटर) वर पोस्ट करत ही माहिती दिली. सूर्यकुमारने लिहिले, “या स्पर्धेतून मिळालेली माझी मॅच फी मी आपल्या सशस्त्र दलांना आणि पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांच्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. जय हिंद.”
I have decided to donate my match fees from this tournament to support our Armed Forces and the families of the victims who suffered from the Pahalgam terror attack. You always remain in my thoughts 🙏🏽
— Surya Kumar Yadav (@surya_14kumar) September 28, 2025
Jai Hind 🇮🇳
किती रक्कम देणार दान?
टीम इंडियाच्या T20 खेळाडूंना प्रत्येक सामन्यासाठी 4 लाख रुपये मिळतात. सूर्यकुमार यादवने आशिया कपमध्ये एकूण 7 सामने खेळले. यानुसार, तो सैन्यदल आणि पहलगामच्या पीडितांसाठी एकूण 28 लाख रुपये देणार आहे.
याआधीही 14 सप्टेंबर रोजी पाकिस्तानसोबत झालेल्या पहिल्या सामन्यानंतर भारतीय संघाने हातामध्ये हात मिळवण्याची प्रथा मोडली होती. तेव्हाही कर्णधार सूर्यकुमार यादवने हा विजय भारतीय सैन्याला समर्पित केला. त्यावेळी त्याने स्पष्ट केले होते की, टीम इंडियाला आपल्या जवानांशी एकजूटता दाखवायची आहे आणि जवान आम्हाला प्रेरणा देत राहतील, अशी आशा आहे.
“जेव्हा जेव्हा आम्हाला संधी मिळेल, तेव्हा आम्ही त्यांना हसण्याचे अधिक कारण देऊ,” असेही तो म्हणाला होता.
‘क्रीडा भावनेपेक्षा काही गोष्टी वरचढ’
दरम्यान, याआधीही पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यानंतर पहलगामवरील वक्तव्यामुळे सूर्यकुमार वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. पहलगामवरील वक्तव्यामुळे ICC ने सूर्यकुमार यादवला मॅच फीच्या 30% दंड ठोठावला आहे.
दरम्यान, दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर काल (28 सप्टेंबर) झालेल्या आशिया चषक (Asia Cup) अंतिम सामन्यात भारताने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा 5 विकेट राखून थरारक पराभव करत विजय मिळवला आहे.
41 वर्षांच्या आशिया चषकाच्या इतिहासात पहिल्यांदाच भारत आणि पाकिस्तान यांच्यात फायनल झाली. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तान संघ 146 धावांपर्यंत मजल मारू शकला. प्रत्युत्तरात 147 धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात अडखळत झाली आणि सुरुवातीचे तीन महत्त्वाचे गडी लवकर बाद झाले.
मात्र, त्यानंतर तिलक वर्मा, संजू सॅमसन आणि शिवम दुबे यांच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर टीम इंडियाने हा सामना 5 विकेट्सने जिंकला. मात्र, सामन्यानंतर बक्षीस वितरण सोहळ्यात मोठ्या घडामोडी घडल्याचे पाहायला मिळाले. भारतीय क्रिकेट संघाने विजेतेपदाची ट्रॉफी आणि पदके स्वीकारण्यास स्पष्टपणे नकार दिला.
हे देखील वाचा – Asia Cup 2025 Final: पाकिस्तानला हरवूनही टीम इंडियाने ट्रॉफी का नाकारली? जाणून घ्या नेमकं कारण