Navaratri’s 9 Political Coulur’s – Shetkari Paksha’s Struggle
तुळशीदास भोईटे – Shetkari Paksha’s Struggle – महाराष्ट्र म्हणजे शिव, शाहू, फुले, आंबेडकरांचे विचार. उठता बसता राज्यातील सर्वच पक्षांचे नेते बोलतात. पण हा विचार सर्वात आधी कोणत्या पक्षाने बोलून दाखवला, नव्हे ज्या पक्षाची स्थापनाच या पुरोगामी विचारांच्या आधारावर झाली तो पक्ष म्हणजे शेतकरी कामगार पक्ष! स्वातंत्र्यपूर्व काळात 1920नंतर काँग्रेसला सर्वसामान्यांचा पक्ष नव्हे चळवळ बनवण्याचा प्रयत्न महात्मा गांधींनी (Mahatma Gandhi)केला.
पण महाराष्ट्रातील काँग्रेसचे(Congress) नेते मात्र शेतकरी आणि कामगार वर्गाच्या प्रश्नांना तेवढंसं प्राधान्य देत नसल्याचे मत त्यावेळचे नेते शंकरराव मोरे यांचे झाले. त्यांनी भांडवलवादी व जातीयवादी वर्गांना काँग्रेसच्या बाहेर काढत फुले, शाहूंच्या समाजवादी वाटेने जाण्यावर भर दिला. मात्र तसं होत नव्हतं.
सतत येणाऱ्या अनुभवांमधून शंकरराव मोरेंची (Shankarrao More)अस्वस्थता वाढत होती. सावकारी जाच, भांडवलदारांचा मस्तवालपणा आणि त्यांच्याकडे सरकारी दुर्लक्ष यामुळे शेतकरी आणि कामगार वर्ग भरडला जात असल्याने त्यांनी काँग्रेसमधील आपल्या समविचारी मित्रांची बैठक बोलावली.
1946च्या सप्टेंबर महिन्याच्या काळात काँग्रेसमध्ये काम करणाऱ्या सहकाऱ्यांना शंकरराव मोरे यांनी आपली खंत बोलून दाखवली. 11 सप्टेंबर 1946 रोजी शंकरराव मोरे यांनी भाऊसाहेब राऊत, केशवराव जेधे, तुळशीदास जाधव, दत्ता देशमुख, रामभाऊ नलावडे व इतरांना एकत्र आणत शेतकरी-कामकरी संघाची स्थापना केली.
त्यांना काँग्रेसमधून कडवट विरोध झाला. अखेर 11 जानेवारी 1947 रोजी मुंबईत काँग्रेस शेतकरी-कामकरी संघाची बैठक झाली. यशवंतराव चव्हाणही त्या बैठकीत होते.शंकरराव मोरेंचा निश्चय पक्का होता. त्यांनी यशवंतरावांचा कडवट विरोध असूनही पुण्यात पुढची बैठक बोलावली.
केशवराव जेधे, औटे, मोहिते, आनंदराव चव्हाण, तुळशीदास जाधव, दत्ता देशमुख, भापकर, भाऊसाहेब शिरोळे यांना एकत्र आणले. त्या बैठकीतच कररावजी मोरे यांनी ‘शेतकरी-कामगार पक्ष’ स्थापनेचा विचार नक्की झाला. पक्षाच्या स्थापनेमागे शेतकरी कामगारांचे राज्य स्थापन झाले पाहिजे, हा उद्देश नक्की करण्यात आला.
हे लक्ष्य साध्य करण्यावर विचार करण्यासाठी त्याचवर्षी 2 व 3 ऑगस्ट रोजी देवाची आळंदी येथे सभा घेतली. त्या सभेत शंकरराव मोरे-केशवराव जेधे यांचे प्रमुख मार्गदर्शन झाले. निवडक कार्यकर्त्यांची सभा घेतली. या सभेला जी. डी. लाड, के. पा. खडके, कृष्णराव धुडूप, मुळीक, शिरोळे, नाथाजी लाड, बाबूराव जेधे उपस्थित होते. देवाच्या आळंदीतील सभेतच आजचा ‘शेतकरी कामगार पक्ष’ उदयास आला.
एकंदरीतच शेतकरी कामगार पक्ष हा शेतकरी, कामगार आणि सर्वसामान्यांसाठी लढणारा पक्ष. या पक्षाच्या नेत्यांनी सरकारला हादरवलेलं. ज्यावेळी काँग्रेस म्हणजेच राजकारण अशी परिस्थिती होती. तेव्हा काँग्रेससमोर ताकदीनं उभा ठाकत असे तो शेकापच. संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेआधीच्या 1957च्या निवडणुकीत शेकापचे 31 आमदार निवडून आले होते.
पुढे यशवंतराव चव्हाणांनी खांद्यावर हात टाकत केलेल्या यशवंत नितीच्या प्रभावाखाली येत शेकापची स्थापना करणारे शंकरराव मोरे, केशवराव जेधे, तुळशीदास जाधव स्वगृही म्हणजे काँग्रेसमध्ये परतले. तरीही शेकाप लढत होता. 1977च्या निवडणुकीत शेकापचे पाच खासदार दिल्लीत पोहोचले होते. पुढे भाजपाचा काळ सुरू झाला.
ठाणे जिल्ह्यातील जुने ज्येष्ठ नेते कृष्णराव धुळपांनी कमळ हाती घेतलं.रायगड जिल्ह्यात ग्रामपंचायतीपासून दिल्लीच्या खासदारकीपर्यंत शेकापचा लाल बावटा फडकत असे. पण पुढे पक्ष पाटील घराण्यापुरता मर्यादित होत गेल्याचा आक्षेप घेतला गेला. त्यात दि. बा. पाटील यांच्याविरोधात लढून शेकापतर्फे खासदार झालेले रामशेठ ठाकूरही पुढे मुलगा प्रशांतसह भाजपात गेले.
पेणमधील रवीशेठ पाटील, धैर्यशील पाटील भाजपात गेले. जयंत पाटलांच्या भगिनी मिनाक्षी पाटील यांच्या निधनानंतर कौटुंबिक मतभेद मनभेदात बदलले. त्याचाही फटका बसला. जयंत पाटील हे विधान परिषदेवर सतत असत. तेही पराभूत झाले. एकेकाळी बालेकिल्ला मानला जाणारा अलिबाग विधानसभा मतदारसंघातही चित्रलेखा पाटील यांच्याविरोधात बंडखोरी झाली. त्यांचा शिवसेनेकडून पराभव झाला.
महेंद्र दळवी दुसऱ्यांदा आमदार झाले.आताची स्थिती अशी आहे की, महाराष्ट्रभरात ओहोटी लागल्यानंतरही बालेकिल्ला राहिलेल्या रायगडात शेकाप अस्तित्वाची लढाई लढत आहे. तिथे एकही आमदार नाही. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला या दिवंगत गणपतराव देशमुखांच्या मतदारसंघात बाबासाहेब देशमुख विजयी झालेत.
त्यामुळे किमान विधानसभेत शेकापचं खातं आहे. रायगड जिल्ह्यात आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत 2017मध्ये जिंकलेल्या 21 या पहिल्या क्रमांकाच्या जागा टिकवण्याचं पहिलं आव्हान असेल.
सतत चर्चेत असणारा प्रहार जनशक्ती पक्ष!
खरंतर काही पक्ष हे त्यांच्या नेत्यांमुळेच ओळखले जातात. त्यातीलच एक म्हणजे प्रहार जनशक्ती पक्ष. बच्चू कडू यांच्यामुळेच तो पक्ष ओळखला जातो आणि त्यांच्यामुळेच त्या पक्षाचे अस्तित्व असल्याचं मानलं जातं. बच्चू कडू उर्फ ओमप्रकाश हे खरंतर शिवसैनिक. अमरावती जिल्ह्यातील अचलपूर भागातील. शिवसैनिकासारखेच रांगडे.आक्रमक राजकारण करणारे. त्यांच्या गावातील ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांचा सरपंचपदी मुस्लीम गावकरी बसवण्यावरून वाद झाला.
तरी ते पंचायत समितीच्या सत्तेपर्यंत पोहोचले. ते तिथंही लढत राहिले. पुढे पक्षापासून वेगळं होत त्यांचं एकांडं राजकारण सुरू झालं. बच्चू कडूंचं नाव महाराष्ट्रभर गाजत राहिलं ते त्यांच्या स्टंटमॅन टाईप आंदोलनांमुळे. कधी जलसमाधी, कधी पाण्याच्या टाकीवर शोलेटाईप, तर कधी अधिकाऱ्यांना आक्रमकतेनं दणके देणं अशा पद्धतीनं आंदोलनं करत माध्यमांची स्क्रीन त्यांनी व्यापली.
त्यातूनच ते नेते म्हणून महाराष्ट्रात ओळखले जाऊ लागले. त्यातूनच मुंबईतील मनोज टेकाडे, अजय तापकीर ही समाजवादी विचारांचे कार्यकर्ते त्यांच्या नेतृत्वाकडे आकर्षित झाले. एकेकाळी कपिल पाटलांसोबत असलेल्या या दोघांसोबत कडूंच्या संपर्कात आले. त्यांच्या प्रयत्नांनी प्रहार संघटना 2017मध्ये प्रहार जनशक्ति पक्षात बदलली. बच्चू कडू पक्षनेते झाले. 2019च्या निवडणुकीत त्यांच्या प्रहार जनशक्तीचे 2 आमदार निवडून आले.
अचलपुरातून ते स्वत: आणि मेळघाट मतदारसंघातून राजकुमार पटेल निवडून आले. पण 2022च्या बंडात ते आपल्या पक्षासह मविआतून बाहेर पडले. महायुतीसोबत गेले. त्यावेळी त्यांचं विमान जास्तच वर उडत होतं. आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री होईल असंही ते पत्रकारांना सांगत.
त्यामागे शिंदेंना शिवसेनेचा वेगळा गट म्हणून अस्तित्व मिळाले नाही तर आपल्या पक्षाची मदत घ्यावी लागेल आणि आपला मुख्यमंत्री होईल असे त्यांना वाटायचे. पण पुढे शिवसेनाच शिंदेंची झाली. बच्चू कडूंना मंत्रिपदही मिळालं नाही. त्यांनी 2024मध्ये परिवर्तन महाशक्ती आघाडी स्थापन केली.
राजू शेट्टींचा स्वाभिमानी शेतकरी, संभाजी छत्रपतींचा स्वराज्य पक्ष त्यांच्यासोबत होते. पण तरीही दारूण पराभव झाला. स्वत: बच्चू कडू सततच्या चार विजयांनंतर अचलपुरातून पराभूत झाले. मेळघाटातून राजकुमार पटेलांचाही पराभव झाला.
अर्थात हार पत्करतील, खचून जातील ते बच्चू कडू नाहीतच.
त्यांनी पुन्हा एकदा सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेत शेतकरी आणि बेरोजगारांसाठी आंदोलनं सुरू केली आहेत. पण यावेळी अभाव जाणवत आहे, तो विश्वासाचा. बच्चू कडू यांनी 2019नंतर पाच वर्षांत तीन वेळा भूमिका बदलल्यानं ते नेमकं काय करणार याची खात्री त्यांचे कडवट समर्थकही देऊ शकत नाहीत…
राजू शेट्टींचा स्वाभिमानी
पुन्हा शेतकऱ्यांसह भरारी घेणार?
राज्यात शेकाप हा नावात शेतकरी असलेला आणि त्यांच्यासाठी लढण्याचा इतिहास असलेला पक्ष असला तरी निव्वळ शेतकरी प्रश्नावर राजकारण करणारा एकमेव पक्ष म्हणजे स्वाभिमानी शेतकरी संघटना. हा पक्षही राजू शेट्टी या शेतकरी नेत्याच्या नावामुळेच जास्त ओळखला जातो.
शेतकरी आंदोलनातील एक वैचारिक दीपस्तंभ मानले जाणारे दिवंगत शरद जोशी यांच्या नेतृत्वाखाली राजू शेट्टी शेतकरी आंदोलनात आले. त्यांनी जोशींचा विश्वासही कमवला. ऊसासाठीचं त्यांचं आंदोलन सतत गाजलं. पुढे शेट्टींचे जोशींशी मतभेद झाले आणि राजू शेट्टी व सदाभाऊ खोत यांनी बाहेर पडत स्वतःचा पक्ष काढला. नंतर सदाभाऊ खोत त्यातूनच बाहेर पडले आणि राजू शेट्टींच्या शेजारी रविकांत तुपकर दिसू लागले.
पुढे तुपकरही बाहेर पडले. राजू शेट्टी एकदा खासदार झाले. परंतु त्यांचा प्रभाव फक्त काही भागांपुरता मर्यादित राहिला आहे. ऊस प्रश्नावर ते आंदोलन करतात, पण उसाचा भाव वाढवून मिळेपर्यंत उसाची गोडी उतरल्याने शेवटी अधिक पैसे मिळतच नाहीत हा त्यांच्या आंदोलनाबाबत सतत होणारा आरोप आहे.
हे देखील वाचा –
बविआ, जनसुराज्यसारख्या पक्षांचे जिल्हा राजकारणावरच लक्ष!
नवरात्रीचे राजकीय नवरंग ! राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संभ्रमाचे राजकारण
नवरात्रीचे राजकीय’ रंग ! शिवसेना: रंग भगवाच, पण कशा बदलणार छटा?