Trophy Drama at Asia Cup – दुबई येथे काल आशिया कपच्या(Asia Cup) अंतिम क्रिकेट सामन्यात भारताने पाकिस्तानचा पराभव करत आशिया कपवर नवव्यांदा नाव कोरले. परंतु या स्पर्धेचा ट्रॉफी वितरण समारंभ नाट्यमय झाला. आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष या नात्याने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष व पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसीन नक्वी (Mohasin Nakvi)हे पारितोषिक समारंभाचे प्रमुख पाहुणे होते.
पण पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याकडून पारितोषिक घेण्यास भारतीय संघाने ठाम नकार दिला. यामुळे खळबळ माजली.बांगलादेश बोर्डाचे अध्यक्ष अमिनूल इस्लाम यांनी पाकिस्तानी क्रिकेटपटूना त्यांची पारितोषिके दिली. मॅन ऑफ द मॅच व बाकी पुरस्कार इतर मान्यवरांनी दिले.
पण विजेत्या संघाला मोहसीनच पुरस्कार देणार असल्याने भारतीय संघाने चषक स्वीकारला नाही. समारंभ संपल्याचे जाहीर करून मोहसीन हे आशिया चषक घेऊन तिथून निघूनच गेले. भारतीय संघाने मग आभासी चषक हातात घेऊन विजयोत्सव साजरा केला.
मोहसीन नक्वी हे भारताचा विजयी चषक त्यांच्या हॉटेलमध्ये घेऊन गेले. त्यांच्या या कृतीमुळे भारत-पाकिस्तान वाद आणखी चिघळला. बीसीसीआय सचिव देवजीत सैकिया यांनी लगेच नक्वी यांना इशारा दिला की, विजयी चषक आणि पदक भारतीय संघाला दिले नाही तर यासंदर्भात आयसीसीकडे तक्रार करण्यात येईल.भारताने आशिया चषक 2025 चे विजेतेपद पटकावले.
या विजयानंतर भारतीय संघाने पाकिस्तानी मोहसीन यांच्या हस्ते चषक स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळे हा समारंभ सव्वा तास रखडला आणि वाद निर्माण झाला.
सामना संपल्यानंतर भारतीय संघाने स्पष्टपणे सांगितले की, आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्या हस्ते आम्ही चषक स्वीकारणार नाही. याचे कारण ते पाकिस्तान सरकारमध्ये मंत्रीही आहेत.
यामुळे पुरस्कार समारंभाच्या आयोजनात गोंधळ झाला. आयोजक आणि आशिया कप पदाधिकारी यांनी वेगवेगळ्या पर्यायांवर विचार केला. त्यावेळी भारतीय संघाने एमिरेट्स क्रिकेट बोर्डाचे उपाध्यक्ष खालिद अल झारुनी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्याची तयारी दर्शवली. मात्र नक्वी मंचावरून बाजूला झाले नाहीत.
सूत्रसंचालक सायमन डुल यांनी उपविजेत्यांना नक्वी पदके प्रदान करतील असे जाहीर केले. परंतु नक्वी यांनी या गोष्टीला नकार दिला. त्यामुळे पाकिस्तान संघाला बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे अमिनूल इस्लाम यांनी उपविजेत्या पाकिस्तान संघाला पदके दिली. त्यानंतर नक्वी यांनी भारतीय संघाला ट्रॉफी देण्याचा प्रयत्न केला, पण भारतीय खेळाडूंनी या गोष्टीला नकार दिला.
अखेर नक्वी यांनी चषक आणि पदक मंचावरून परत घेऊन जाण्याचे आदेश दिले. यानंतर सूत्रसंचालक डुल यांनी घोषणा केली की, मला आशियाई क्रिकेट परिषदेकडून माहिती मिळाली आहे की, भारतीय संघ आज आपले पारितोषिक स्वीकारणार नाही. आता हा पुरस्कार समारंभ संपतो.
यादरम्यान पाकिस्तानचा कर्णधार सलमान आघा याने उपविजेत्याचा चेक घेऊन तो मंचावरून फेकून दिला आणि मुलाखतीसाठी गेला. याशिवाय सामना संपल्यानंतर चषकासह छायाचित्र घेतले जात असताना सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या कर्णधारासोबत एकत्र येण्यास नकार दिल्याची माहिती आहे.
सूर्यकुमार यादव काल्पनिक चषक उचलल्याचा अभिनय करीत आला आणि तसाच अभिनय करीत भारतीय संघाने विजयाचा जल्लोष केला. हा जल्लोष करताना त्यांनी नक्वी यांच्या कृतीवर उपरोधात्मक टीका केली.

आशिया चषकाच्या अंतिम सामन्यानंतर सूर्यकुमार यादव आणि अभिषेक शर्मा यांची संयुक्त पत्रकार परिषद झाली. यावेळी चषक न स्वीकारण्याच्या निर्णयावर बोलताना सूर्यकुमार म्हणाला की, क्रिकेट खेळायला लागल्यापासून विजयी संघाला चषक नाकारला असा प्रसंग कधीच पाहिला नव्हता. आमची ही मेहनत होती.
आम्ही सलग दोन दिवस सामने खेळून विजय मिळवला. चषक कुणाकडून घ्यायचा याबाबत आमचा निर्णय ठाम होता. खरा चषक हे ड्रेसिंग रूममधील माझे 14 सहकारी आणि मदतनीस आहेत. हीच खरी कमाई आणि आठवण मी बरोबर घेऊन जाणार आहे.
नक्वीच्या वादग्रस्त वागणुकीवर तो म्हणाला की, पाकिस्तानचे गृहमंत्री असलेले आणि आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष असलेले मोहसीन नक्वी यांनी भारतीय लढाऊ विमान पाडल्याच्या जुन्या दाव्यांना सादर करून भारतीय चाहत्यांची थट्टा केली. अध्यक्षाच्या भूमिकेचा दर्जा न राखता पाकिस्तानच्या बाजूने उघडपणे प्रचार केला.
उपविजेत्या पाकिस्तानचा कर्णधार सलमान आघा पत्रकार परिषदेत म्हणाला की, भारताने या आशिया कप स्पर्धेत ‘नो हँडशेक’ धोरण अवलंबले, हे क्रिकेटसाठी अपमानजनक आहे आणि युवा चाहत्यांसाठी वाईट उदाहरण आहे. भारताने आमच्याशी हस्तांदोलन न केल्याने आमचा नाही तर क्रिकेटचा अपमान केला.
आम्ही चषक फोटोशूटसाठी गेलो, पदके स्वीकारली हे आमचे कर्तव्य आहे. पण भारताने आम्हाला अपमानित केले. सूर्यकुमार सार्वजनिक ठिकाणी हात मिळवत नाहीत, पण खासगीत हात मिळवतात. कदाचित ते दिलेले निर्देशांचे पालन करत आहेत. भारतीय संघाने नक्वींकडून चषक स्वीकारण्यास नकार दिल्यामुळे त्यांना चषक मिळाला नाही.
अशा प्रकारच्या घटना क्रिकेटसाठी चुकीचे उदाहरण आहेत. हे थांबायला हवे. मी फक्त पाकिस्तानचा कर्णधार नाही तर क्रिकेटचा चाहता आहे. त्यामुळे हा चुकीचा आदर्श ठेवला जात आहे.
या नाट्यानंतर सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, शुभमन गिल आणि अभिषेक शर्मा यांसारख्या भारतीय खेळाडूंनी पोस्ट करत चषक इमोजी जोडलेले फोटो शेअर केले.
सूर्यकुमार यादवने एक्स पोस्टमध्ये लिहिले की, खेळ संपल्यानंतर केवळ विजेत्यांची आठवण राहते. चषकाच्या फोटोची आठवण राहत नाही.
बीसीसीआय सचिव देवजीत सैकिया यांनी यावर म्हटले की, आशिया कप 2025 चा चषक भारतीय संघाला न देण्याबाबत पाकिस्तान क्रिकेट संघ आणि आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करणार आहोत. त्यांच्याकडून चषक स्वीकारणार नसल्याचे भारतीय संघाने आधीच जाहीर केल्यानंतर ते चषक आणि पदके घेऊन गेले हे अत्यंत दुर्दैवी आणि खिलाडू वृत्तीच्या विरुद्ध आहे.
त्यांनी चषक आणि पदके लवकरात लवकर भारताला द्यावी अशी अपेक्षा आहे. नोव्हेंबर 2025 मध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेत (आयसीसी) आम्ही या प्रकारचा निषेध नोंदवणार आहोत.
यावेळी सैकिया यांनी स्पष्ट केले की, केंद्र सरकारच्या फक्त भारत आणि पाकिस्तान यांच्यातील थेट सामने न खेळण्याच्या नियमाचे बीसीसीआय 12-15 वर्षांपासून काटेकोर पालन करते. मात्र बहुपक्षीय स्पर्धांमध्ये खेळणे आवश्यक असल्याने त्यामध्ये सहभाग घेणे बंधनकारक आहे. अन्यथा आंतरराष्ट्रीय संघटना भारतीय संघावर बंदीची कारवाई करू शकते.
पाक संघ दहशतवाद्यांना
सामन्याचे पैसे देणार
दुबई – भारताने आशिया चषक 2025 मध्ये पाकिस्तानवर पाच गडी राखून विजय मिळवला. या सामन्यात कर्णधार सूर्यकुमार यादवने आपले संपूर्ण मानधन भारतीय लष्कराला दान करण्याची घोषणा केली. त्यानंतर पाकिस्तानी कर्णधार सलमान अली आगा यानेही आपले मानधन ऑपरेशन सिंदूरमध्ये मृत्युमुखी पडलेल्या पाकिस्तानी कुटुंबांना दान करण्याची घोषणा केली.
आगा म्हणाला की, आम्ही आशिया चषकातून कमावलेले पैसे ऑपरेशन सिंदूरमध्ये मृत्यू पावलेल्या पाकिस्तानी नागरिक आणि मुलांच्या कुटुंबीयांना दान करणार आहोत.
त्याची ही घोषणा वादात सापडली आहे. कारण भारताच्या ऑपरेशन सिंदूरमध्ये सामान्य नागरिक नव्हे, तर दहशतवादीच ठार झाले होते. त्या कारवाईत मसूद अजहरसारख्या कुख्यात दहशतवाद्यांचे कुटुंबच ठार आले होते. त्यामुळे हे पैसे अप्रत्यक्षपणे दहशतवाद्यांच्या कुटुंबीयांनाच मिळण्याची शक्यता आहे.
’एक्स’वरून वार-पलटवार
भारताने आशियाई कप जिंकल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय क्रिकेट संघाचे अभिनंदन करत एक्स पोस्ट केली की,ऑपरेशन सिंदूर मैदानातही पार पडले. मात्र निकाल तोच आहे ! या पोस्टवर मोहसिन नक्वी यांनी असे उत्तर दिले की, युद्ध तुमच्या अभिमानाचे माप असेल तर इतिहासात पाकिस्तानकडून झालेल्या अपमानास्पद पराभवांची नोंद आहे.
कोणताही क्रिकेट सामना सत्य बदलू शकत नाही. तुम्ही खेळात युद्ध ओढता, त्यातून केवळ निराशाच दिसून येते आणि खेळाच्या आत्म्याला कलंकित करते.
हे देखील वाचा
ऑपरेशन सिंदूर’ वर पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया; सूर्यकुमार यादव म्हणाला, ‘देशाचा नेता जेव्हा स्वतः
पाकिस्तानला हरवूनही टीम इंडियाने ट्रॉफी का नाकारली? जाणून घ्या नेमकं कारण
कॅनडा सरकारचा मोठा निर्णय! लॉरेन्स बिश्नोई टोळीला ‘दहशतवादी संघटना’ म्हणून केलं घोषित