Home / लेख / Changing Shades of Regional Politics : प्रादेशिक राजकारणाचे वेगळे रंग

Changing Shades of Regional Politics : प्रादेशिक राजकारणाचे वेगळे रंग

Navaratri’s 9 Political Coulur’s – Changing Shades of Regional Politics तुळशीदास भोईटे – Changing Shades of Regional Politics – भारत...

By: Team Navakal
Changing Shades of Regional Politics

Navaratri’s 9 Political Coulur’s – Changing Shades of Regional Politics


तुळशीदास भोईटे – Changing Shades of Regional Politics – भारत म्हटलं की विविधतेचे रंग. राजकारणातही त्याचे वेगळे ढंग दिसतातच. जसा प्रदेश, तशी भाषा, तसे रंग आणि तसेच ढंग. पण राजकारणातही राज्यांप्रमाणे रंग बदलताना दिसतात. त्यातही प्रादेशिक पक्षांची तर तऱ्हा आणखीच वेगळी असते.


पूर्वी हिंदीभाषिक प्रदेशांमध्ये राष्ट्रीय राजकीय पक्षांचा प्रभाव असे. तर इतर राज्यांमध्ये प्रादेशिक पक्ष असत. पण 1990नंतर भारतीय राजकारणाचे रंग बदलत गेले. विशेषत: मंडल काळापासून उत्तरेतील हिंदी भाषिक राज्यांमध्येही नोंदणीत राष्ट्रीय पण व्यवहारात प्रादेशिक असणाऱ्या समाजवादी पार्टी, बहुजन समाज पार्टी, राष्ट्रीय जनता दल अशा प्रादेशिक पक्षांचा प्रभाव वाढला.

तेवढाच काँग्रेसचा घटला. भाजपा प्रमुख पक्षांच्या रचनेत वर गेली. पण त्याचवेळी दक्षिणेतील प्रादेशिकतेचे रंग आणखीच गडद झाले.
सुशेगात गोव्यात मराठीवाला मगोप पक्षआपल्या महाराष्ट्राशेजारचा गोवा. इटुकलं राज्य. पण पर्यटन नकाशावर मोठं महत्त्व. 1961मध्ये गोवा पोर्तुगिजांच्या जोखडातून मुक्त झाला.

तिथं 1963मध्ये महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष (मगोप) या प्रादेशिक पक्षाची स्थापना झाली. मगोपची स्थापनेनंतर गोव्याचं विलिनीकरण महाराष्ट्रात करण्याची भूमिका होती. पण सार्वमतात महाराष्ट्रातील विलिनीकरणाला पाठिंबा मिळू शकला नाही. गोव्यातील पोर्तुगीज राजवटीनंतर 1963 ते 1979 या काळात मगोप सत्तेवर होता.


गोव्यामध्ये मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळावा अशी मगोपची भूमिका राहिली आहे. सध्या त्या राज्यात मराठी आणि कोकणी राज्यभाषा आहेत.भाऊसाहेब बांदोडकर हे मगोपचे संस्थापक आणि गोव्याचे पहिले मुख्यमंत्री होते. त्यांच्यानंतर त्यांच्या कन्या शशिकला काकोडकर दुसऱ्या मुख्यमंत्री झाल्या.

पुढे काँग्रेसची सभा आली आणि नंतर भाजपाने गोव्यात प्रवेश केला. मगोपने भाजपाशी युती केली. आता भाजपा गोव्यातील सत्ताधारी पक्ष असून मगोप मात्र स्थानिक पातळीवरील छोटा पक्ष झाला आहे.


सध्या दीपक ढवळीकर पक्षाध्यक्ष आहेत. 2022 च्या गोवा विधानसभा निवडणुकीत मगोपचे 2 आमदार निवडून आले. एकेकाळी गोव्यात सत्तेत असणारा मगोप आता उपलब्ध संख्याबळावर गोव्यातील आघाडी युतीच्या राजकारणात भाग घेत कधी सत्तेत कधी विरोधात असतो.


कडवट द्रविड अस्मितेवाला द्रमुक


द्रविड मुन्नेत्र कळघम म्हणजेच द्रमुक हा द्रविड म्हणजेच तमिळ अस्मितेचा कडवट पुरस्कर्ता असणारा राजकीय पक्ष. सध्या तमिळनाडूत सत्तेत असणारा हा पक्ष शेजारच्या पुद्दुचेरीमधील प्रमुख विरोधी पक्ष आहे. तामिळनाडूत  17 सप्टेंबर 1949 रोजी सी.एन. अण्णादुराई यांनी या पक्षाची स्थापना केली. द्रविडार कळघमचा पूर्वीचा अवतार पेरियार यांची जस्टिस पार्टी होता.


द्रविडार कळघमच्या रामास्वामी यांच्याशी वैचारिक मतभेद झाल्याने अण्णादुराई यांनी द्रमुकची स्थापना केली.
द्रमुकची विचारसरणी ब्राह्मणेतर आणि मागासलेल्या समुदायांच्या हक्कांसाठी आणि प्रतिनिधित्वासाठी लढण्याची आहे. तसंच सामाजिक न्यायाच्या तत्वाला पक्ष कमालीचे महत्त्व देतो.

द्रमुक तामिळ भाषा, संस्कृती आणि अस्मितेचा कडवट पुरस्कर्ता आहे. हिंदी भाषा लादण्याच्या धोरणाला द्रमुक तीव्र विरोध करतो. पक्षाची निशाणी उगवता सूर्य आहे. द्रमुकचे अध्यक्ष एम. करुणानिधी यांनी 13 वर्षे मुख्यमंत्रिपद गाजवले. त्यांच्यानंतर त्यांचे पुत्र एम.के. स्टालिन हे पक्षाचे अध्यक्ष झाले. तेच सध्या मुख्यमंत्री आहेत.


जयललितांच्या नंतरही त्यांच्यामुळेच ओळखला जाणारा अण्णा द्रमुक ऑल इंडिया अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम म्हणजेच एआयएडीएमके हा द्रमुकमधून फुटून निघालेला पक्ष. तामिळनाडूत गेली अनेक दशकं द्रमुक आणि अण्णाद्रमुकमध्येच सत्तेचा खेळ चालतो. एम.जी. रामचंद्रन आणि त्यानंतर जयललिता यांच्या कारकिर्दीत अनेकदा अण्णा द्रमुक सत्तेत असे तेव्हा द्रमुक विरोधी पक्ष असे.

द्रविड मुन्नेत्र कळघम (द्रमुक) पक्षाचे नेते एम. जी. रामचंद्रन (एमजीआर) यांना पक्षातून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर त्यांनी वेगळा पक्ष काढला. एमजीआर यांनी अण्णा द्रमुक पक्ष स्थापन केल्यानंतर, राज्याच्या राजकारणात त्यांनी मोठे यश मिळवले. त्यांनी अनेक कल्याणकारी योजना सुरू केल्या. त्यानंतर ती तामिळ राजकारणाची एक शैलीच झाली.

एमजीआर यांच्या निधनानंतर जयललिता यांनी पक्षाची धुरा सांभाळली. त्यांच्या नेतृत्वातही अण्णा द्रमुक सत्तेत होता. अण्णा द्रमुकही द्रमुकसारखाच द्रविड अस्मितेचं राजकारण करतो. जयललितांच्या मृत्यूनंतर पनीरसेल्व्हन मुख्यमंत्री झाले होते. पण जयललिता यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पक्षाला यश मिळालेले नाही.


तामिळनाडूचे राजकारण हे तसं फिल्मी प्रभावाखालील असतं. दोन्ही प्रमुख पक्षांचे संस्थापक चित्रपट क्षेत्रातीलच होते. त्याशिवाय कमलहासन यांचा पक्ष, रजनीकांत यांचं अयशस्वी राजकारण, थलपती विजय यांचा ‌‘तमिळगा वेट्री कळघम‌’ पक्ष (जो शनिवारी झालेल्या चेंगराचेंगरीतील बळींमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडला), विदुथलाई चिरुथाईगल कच्ची, पट्टळी मक्कल कच्ची हेही पक्ष आहेत.


महाराष्ट्रात प्रवेश केलेला तेलंगणाचा बीआरएस पक्ष भारत राष्ट्र समिती म्हणजेच बीआरएस हा तेलंगणामधील एक प्रमुख राजकीय पक्ष आहे. हाच पक्ष पूर्वी तेलंगणा राष्ट्र समिती म्हणजेच टीआरएस म्हणून ओळखला जात असे. या पक्षाची स्थापना के. चंद्रशेखर राव उर्फ केसीआर यांनी 27 एप्रिल 2001 रोजी केली होती.

आंध्र प्रदेश या तेलुगूभाषिक राज्यातील मागासलेल्या तेलंगणा भागाचे वेगळे राज्य करण्याचा उद्देश होता. राज्याच्या निर्मितीसाठी संघर्ष करणे हे त्या पक्षाचे एकमेव ध्येय होते. 14 वर्षांच्या संघर्षानंतर, 2014 मध्ये तेलंगणा राज्याची स्थापना झाली. तेलंगणाच्या मतदारांनी टीआरएसला सत्तेतही बसवलं.

त्यानंतर केसीआर यांची राष्ट्रीय महत्त्वाकांक्षा फुलली. त्यांनी 5 ऑक्टोबर 2022 रोजी पक्षाचे नाव बदलून भारत राष्ट्र समिती केले. पण पहिल्याच निवडणुकीत फटका बसला. या पक्षाने महाराष्ट्रात वाजतगाजत प्रवेश केला होता. पण महाराष्ट्रात त्यांना यश मिळाले नाही.


आम आदमी पार्टी (AAP)


आम आदमी पक्षाची (आप) स्थापना 26 नोव्हेंबर 2012 रोजी झाली. काँग्रेसप्रणित यूपीएच्या दुसऱ्या सत्ताकाळात 2011पासून सत्ताविरोधी वातावरणनिर्मिती सुरू झाली. अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन छेडण्यात आलं. त्यासाठी ‌’इंडिया अगेन्स्ट करप्शन‌’ या भ्रष्टाचारविरोधी चळवळीनं खूप मेहनत घेतली. त्या चळवळीतूनच हा पक्ष उदयास आला.


अण्णा हजारेंपासून वेगळे होऊन असणाऱ्या अरविंद केजरीवाल यांनी आप स्थापन केला तो राजकीय व्यवस्थेत बदल घडवून आणण्याच्या विचारानं. आपचा जनलोकपाल विधेयक आणत सरकारवर नियंत्रण ठेवणं मुख्य उद्देश होता. 2

013ची दिल्ली विधानसभा निवडणूक आपची पहिलीच निवडणूक. त्या निवडणुकीत पक्षाने 28 जागा जिंकून राजकीय वर्तुळात खळबळ माजवली. त्यानंतर 2015 च्या निवडणुकीत 70 पैकी 67 जागा जिंकून पक्षाने दिल्लीत दणदणीत विजय मिळवला. 10 एप्रिल 2023 रोजी निवडणूक आयोगाने ‌’आप‌’ला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा दिला.


2015नंतर 2020मध्येही आपने दिल्लीची सत्ता मिळवली. आप पंजाबातही सत्तेत आला. पण 2025च्या निवडणुकीत आपचा दिल्लीत पराभव झाला. आप पूर्वी ‌’खछऊखअ‌’ आघाडीचा भाग होता, परंतु 2025 मध्ये वेगळा झाला.


उत्तर प्रदेशातील समाजवादी पार्टी


उत्तर प्रदेशातील राजकारणात काँग्रेसची सद्दी मोडणारा एक प्रमुख पक्ष म्हणजे समाजवादी पार्टी. पुढे हा पक्ष त्या राज्यात भाजपाविरोधातील प्रमुख पक्ष ठरला. या पक्षाची स्थापना 4 ऑक्टोबर 1992 रोजी मुलायम सिंह यादव यांनी केली होती. समाजवादी नेते डॉ. राममनोहर लोहिया यांच्या समाजवादी तत्त्वज्ञानावर पक्षाची मांडणी आहे.

समानतेच्या तत्त्वावर आधारित समाजवादी समाज निर्माण करण्यावर पक्षाचा विश्वास आहे. पक्षाची विचारधारा धर्मनिरपेक्ष आणि लोकशाहीवादी आहे.


पक्षाचे संस्थापक मुलायम सिंह यादव हे उत्तर प्रदेशचे तीन वेळा मुख्यमंत्री आणि भारताचे संरक्षण मंत्री होते. सध्या सपाचे सर्वेसर्वा अखिलेश यादव आहेत. ते मुलायम सिंह यादव यांचे पुत्र आहेत. अखिलेश सध्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि कन्नौजचे खासदार आहेत.


महाराष्ट्रात 1992च्या बाबरी पाडल्यानंतच्या दंगलीनंतर समाजवादी पार्टी रुजू लागली. सध्या सपाचे दोनच आमदार आहेत. महाराष्ट्रातील सपा अबू आझमी चालवतात. ते महाराष्ट्रातील समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि मानखुर्द शिवाजी नगर मतदारसंघाचे आमदार आहेत.
लालूप्रसाद यादवांच्या राष्ट्रीय जनता दलाचे ‌‘तेजस्वी‌’ नेतृत्व बिहार म्हटले की, लालू प्रसाद यादव आठवतातच आठवतात.

बिहारमधील राजकारणात प्रभावी असलेल्या या पक्षाची स्थापना 1997 मध्ये लालू प्रसाद यादव यांनी केली होती. त्यांनी 5 जुलै 1997 रोजी जनता दलातून वेगळे होऊन राष्ट्रीय जनता दलाची स्थापना केली. चारा घोटाळ्यातील आरोपानंतर लालूप्रसाद यादव यांच्यावर जनता दलातून मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याचा दबाव होता. त्यामुळे त्यांनी वेगळं होऊन राजदची स्थापना केली. त्यांचा पक्ष यूपीएचा भाग होता.


यूपीएच्या पहिल्या पर्वात लालूप्रसाद यादव रेल्वे मंत्री होते. त्यांचा पक्ष बिहारमध्ये 15 वर्षे सत्तेवर होता. 2005 मध्ये राजदची बिहारमधील सत्ता गेली. यादव समाजाव्यतिरिक्त इतर मागासवर्गीयांनी राजदची साथ सोडली. त्याचा लालूंच्या पक्षाला मोठा फटका बसला. त्यानंतरच्या काळात राजदने जनता दल (संयुक्त), काँग्रेस यांच्यासोबत अनेक वेळा ‌’महागठबंधन‌’ सरकारमध्ये सहभाग घेतला. सध्या लालूप्रसाद यादवांचे सुपुत्र तेजस्वी यादव पक्षाचं नेतृत्व करतात.


त्यांनी राहुल गांधींसोबत बिहारमधील मतदार पुनरीक्षणाविरोधात मताधिकार यात्रा काढून भाजपा – जदयूला धक्का दिला आहे. एकीकडे तेजस्वी यादव निवडणूक तोंडावर आलेली असताना जोर लावत आहेत. तर लालूप्रसादांचे दुसरे पुत्र तेजप्रताप वेगळेच रंग दाखवत आहेत. लालटेनचा (राजदचे निवडणूक चिन्ह कंदील)प्रकाश घरातील बंडखोरीनं मंदावू नये हे मोठं आव्हान तेजस्वींसमोर असेल.


मोदी – शहांनाही टक्कर देणारी बंगालची वाघीण तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी


‌’मा, माटी, मानुष‌’ म्हणजेच आपली आई, आपली माती आणि आपली माणसं… तृणमूल काँग्रेसची ही घोषणा. ममता बॅनर्जी या वाघिणीसारखीच ही घोषणाही 2011 च्या निवडणुकीत खूप लोकप्रिय झाली. तृणमूल काँग्रेस सत्तेत आली.

ममता बॅनर्जी बंगालच्या मुख्यमंत्री झाल्या. पण बंगालच्या वाघिणीचा प्रवास असा थेट सत्तेतला नव्हता. त्या काँग्रेसमध्ये होत्या, पण प्रणब मुखर्जी आणि अन्य काँग्रेसी खोडांच्या वठलेल्या राजकारणात त्यांना राजकीय प्रगतीला वाव नव्हता. त्या काँग्रेसमधून बाहेर पडल्या. ममता बॅनर्जी यांनी 1 जानेवारी 1998 रोजी तृणमूल काँग्रेसची स्थापना केली.


स्थापनेच्या पहिल्याच वर्षात 1998 मध्ये पहिल्या लोकसभा निवडणुकीत तृणमूलने 7 जागा जिंकल्या. 2001 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेससोबत युती करून 60 जागा मिळवल्या आणि तृणमूल प्रमुख विरोधी पक्ष बनला. पुढे 2004 लोकसभा, 2006 विधानसभा फटका देणाऱ्या निवडणुका होत्या.

2009मध्ये कामगिरी सुधारली. ममता बॅनर्जी मतदारांना जोडून ठेवताना जेवढ्या भावनाप्रधान असतात, तेवढ्याच राजकारणात व्यवहारकुशल आहेत. त्या केंद्रातील सत्तेत काँग्रेसप्रमाणेच भाजपासोबतही होत्या.
पुढे 2011ची निवडणूक आली.

तृणमूलला ऐतिहासिक विजय मिळाला. या विधानसभा निवडणुकीत पश्चिम बंगालवर 34 वर्षे राज्य करणाऱ्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला नेस्तनाबूत करीत तृणमूलने 184 जागा जिंकल्या आणि एकहाती सत्ता मिळवली. पुढे 2016 आणि 2021मध्ये सत्ता राखली. त्याचवेळी लोकसभेत 2019मध्ये भाजपाने मोठा धक्का दिला.

भाजपाने फोडाफोडीचे राजकारण करीत सुवेंदू अधिकारी यांना आपल्याकडे खेचत ममता बॅनर्जींना धक्का दिला. त्यांच्यावर आरोप केले. पण 2024मध्ये ममता बॅनर्जींनी जोर लावला. कामगिरी सुधारली. आता लक्ष 2026वर आहे.


हे देखील वाचा

बविआ, जनसुराज्यसारख्या पक्षांचे जिल्हा राजकारणावरच लक्ष!

बाबासाहेबांचं नाव… विचारांचा वारसा…मात्र, विखुरलेलीच आरपीआय! शिका, संघटित व्हा, संघर्ष करा!

सर्वसमावेशकतेचे सर्व रंग काँग्रेसचं भविष्य उजळवणार?

Web Title:
For more updates: , , , , , , , stay tuned with Navakal
Topics:
संबंधित बातम्या