Asha Bhosle – ज्येष्ठ गायिका आशा भोसले (Asha Bhosle) यांनी त्यांच्या व्यक्तिमत्व हक्कांच्या संरक्षणासाठी दाखल केलेल्या याचिकेत मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) तात्पुरता दिलासा दिला आहे. आशा भोसले यांनी दाखल केलेल्या याचिकेत दोन अमेरिकन आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) प्लॅटफॉर्म्सनी त्यांचा आवाज, गाण्याची शैली, तंत्र, गायनाची पद्धत आदींचा अनधिकृत वापर करून कृत्रिम स्वरूपात आवाज तयार केला असल्याचा दावा केला होता. त्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्व व प्रसिद्धी हक्कांचा व्यावसायिक व वैयक्तिक फायद्यासाठी गैरवापर होऊ नये, अशी त्यांनी मागणी केली होती.
गायिकेच्या वकिलांनी न्यायालयात युक्तिवाद करताना सांगितले की, कोणत्याही परवानगीशिवाय कलाकाराचा आवाज, शैली, हावभाव किंवा स्वाक्षरीचा वापर करणे हे त्यांच्या नैतिक हक्कांचे उल्लंघन आहे. दुसरीकडे, सोशल मीडिया इंटरमीडियरीने असा दावा केला की ते फक्त तृतीय पक्षाचा कंटेंट प्रदर्शित करतात, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होऊ शकत नाही.
त्यानंतर न्यायालायाने आदेश दिला की, आशा भोसलेंच्या लेखी परवानगीशिवाय त्यांच्या नावाचा, आवाजाचा, गायनशैलीचा किंवा इतर व्यक्तिमत्वाशी संबंधित बाबींचा वापर करू नये. दरम्यान, याबाबतची सुनावणी दोन आठवड्यांनंतर होणार आहे.
यापूर्वी, जुलै महिन्यात न्यायमूर्ती रियाझ छागला यांच्या एकल खंडपीठाने गायक अरिजित सिंग यांनाही अशाच प्रकारचा दिलासा दिला होता. अनेक संस्थांना त्यांच्या व्यक्तिमत्व आणि प्रसिद्धी हक्कांचे उल्लंघन करण्यापासून तेव्हा रोखण्यात आले होते.
हे देखील वाचा–