Gopichand Padalkar on Jayant Patil: भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार जयंत पाटीलयांच्यावर पुन्हा एकदा अत्यंत वादग्रस्त आणि खालच्या पातळीवर जाऊन टीका केली आहे. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी जयंत पाटलांच्या वडिलांच्या नावावरून टीका केल्याव थेट शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे नाराजी व्यक्त केली होती.
मुख्यमंत्र्यांनी समज देऊनही पडळकर यांनी पुन्हा एकदा जयंत पाटील यांच्यावर टीका केली आहे.
‘तुझ्या कुठल्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं?’
सांगली जिल्ह्यातील जत येथे आयोजित दसरा मेळाव्यात बोलताना आमदार पडळकर यांनी जयंत पाटलांवर सडकून टीका केली. ‘तुम्ही मला मंगळसूत्र चोर म्हणता, तर जयंतरावांना माझा सवाल आहे, तुझ्या कुठल्या बायकोचं मी मंगळसूत्र चोरलं?’ असे विधान पडळकर यांनी केले.
माझी लढाई ही प्रस्थापितांच्या विरोधात आहे, ज्यांनी कारखाने हडपले त्यांच्या विरोधात आहे, असे सांगत पडळकर यांनी जयंत पाटलांवर टीका केली. मंगळसूत्र चोरीच्या आरोपावरून जयंत पाटलांनी पडळकरांना टोला लगावला होता, त्याला प्रत्युत्तर देताना पडळकर यांनी हे आक्षेपार्ह विधान केले.
जयंत पाटलांना थेट आव्हान
यावेळी पडळकर यांनी जयंत पाटलांना आणि निकटवर्तीय दिलीप पाटील यांना थेट आव्हान दिले. दिलीप पाटील यांचा उल्लेख पडळकरांनी ‘वाळव्याचा कुत्रा’ असा केला. या टीकेचा समाचार घेताना गोपीचंद पडळकर म्हणाले, “मी गोप्या म्हटलं तर चालेल का? जयंत्याला आणि वाळव्याच्या कुत्र्याला आवाहन करतो, तुम्ही जर जातीवंत पाटील असाल, तर मला ठिकाण, तारीख, वार आणि वेळ सांगा, मी वाळव्यात यायला तयार आहे. माझ्याकडे पोरं पाठवायची गरज नाही आणि तुमच्याकडे ती हिंमत नाही.”
पडळकर यांनी यावेळी स्वतःचा उल्लेख सुभेदार मल्हारराव यांची औलाद म्हणून केला आणि जयंत पाटलांना इशारा दिला, “तुम्ही जर माझ्या डोक्यात जाण्याचा प्रयत्न केला, तर ती तुमच्यासाठी काळीकुट्ट अंधाराची रात्र असेल.”
हिंदूविरोधी असल्याची टीका
पडळकर यांनी टीका करताना जयंत पाटील हे हिंदूविरोधी असल्याचे म्हटले. ख्रिश्चन धर्मांतराविरोधात आवाज उठवल्यावर जे फादरी रस्त्यावर आले होते, त्यांच्या सभेला जयंत पाटील जातात, त्यामुळे ईश्वरपूरमधील जनतेने त्यांना जागा दाखवायची वेळ आली आहे, असे पडळकर म्हणाले.
“मी फकीर माणूस आहे. मला बदनाम करून मी संपणार नाही. अनेक गावठी कुत्र्यांना तुडवत मी इथंपर्यंत आलो आहे,” असे विधान करून पडळकर यांनी विरोधकांना लक्ष केले.
याच भाषणात पडळकर यांनी आरक्षण आणि देवेंद्र फडणवीस यांचा विषयही मांडला. मराठा आणि ओबीसी समाजाला एकमेकांच्या विरोधात उभे करण्याचे काम सुरू आहे. धनगर समाजाला एसटीमधून आरक्षण मिळावे, ही आपली मागणी कायम राहील. जेव्हा आरक्षणाचा विषय असेल, तेव्हा मी धनगरांच्या बाजूला उभा असेन, पण जेव्हा देवाभाऊंचा विषय असेल, तेव्हा मी त्यांच्या बाजूला बाजीप्रभुंप्रमाणे उभा राहीन, अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली.
हे देखील वाचा – आशिया कपनंतर आता भारत ‘या’ संघाविरुद्ध उतरणार मैदानात; पाहा डिटेल्स