Maharashtra Farmers Flood Relief: गेल्या काही महिन्यांत राज्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या प्रचंड नुकसानीबद्दल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचा आढावा घेण्यात आला. या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधताना मोठी घोषणा केली.
प्राथमिक अंदाजानुसार, राज्यात जवळपास 60 लाख हेक्टर शेतजमिनीवरील पिकांचे नुकसान झाले असून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी थेट त्यांच्या बँक खात्यात मदत वितरित करण्याचे राज्य सरकारने ठरवले आहे.
पुढच्या आठवड्यात होणार मदतीची घोषणा
नुकसानीचे प्रमाण मोठे असल्याने, पुढील दोन ते तीन दिवसांत संपूर्ण नुकसानीची आकडेवारी जमा झाल्यानंतर पुढील आठवड्यात सर्वसमावेशक मदतीचे धोरण जाहीर केले जाईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. या धोरणामध्ये केवळ पीक नुकसानीसाठीच नव्हे, तर जमीन खरडून गेलेल्या शेतकऱ्यांसाठी, विहिरींच्या नुकसानीसाठी आणि घरांची पडझड झाली असेल त्यासाठी देखील मदत दिली जाईल.
मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की, ऑगस्ट महिन्यापर्यंत झालेल्या नुकसानीसाठी सरकारने यापूर्वीच 2,215 कोटी रुपये वितरित करण्यास सुरुवात केली आहे. ही मदत देण्यासाठी ई-केवायसीची अट रद्द करण्यात आली असून, शेतकऱ्यांच्या शेतात नोंद आहे, त्याप्रमाणेच मदत दिली जाईल.
‘ओला दुष्काळ’ नाही, पण सवलती मिळणार
राज्यात अनेक ठिकाणी शेतकरी आणि विरोधी पक्षांकडून सातत्याने ‘ओला दुष्काळ’ जाहीर करण्याची मागणी होत आहे. यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले. “धोरणात ओला दुष्काळ असा कोणताही उल्लेख नाही आणि आजपर्यंत कधीही ओला दुष्काळ जाहीर झालेला नाही.”
मात्र, मंत्रिमंडळाने असा निर्णय घेतला आहे की, जेव्हा जेव्हा दुष्काळ जाहीर होतो, तेव्हा ज्या सर्व उपाययोजना आणि सवलती बाधित नागरिकांना मिळतात त्या सर्व सवलती या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागातही लागू करण्यात येतील.
केंद्राच्या मदतीची वाट न पाहता राज्य सरकार मदत करणार
केंद्राच्या मदतीबाबत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, केंद्र सरकारकडून पूर्ण मदत मिळणार आहे. मात्र, वारंवार प्रस्ताव पाठवता येत नसल्याने, नुकसानीचा संपूर्ण आढावा घेतल्यानंतर एकच व्यापक प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवला जाईल. तोपर्यंत केंद्र सरकारच्या मदतीची वाट न पाहता, राज्य सरकार स्वतःच्या निधीतून तातडीने आवश्यक ती सर्व मदत शेतकऱ्यांना देणार आहे आणि नंतर केंद्रीय निधीतून त्याची भरपाई करून घेतली जाईल.
‘सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी’ – एकनाथ शिंदे
यावेळी बोलताना मंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांना दिलासा दिला. ते म्हणाले, “मराठवाडा, सोलापूरसह अनेक जिल्ह्यांमध्ये प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांसमोर जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पण, आम्ही शेतकऱ्यांशी संवाद साधला आहे आणि सरकार म्हणून आम्ही त्यांच्या पूर्ण पाठिशी उभे आहोत.” सरकार मदत करताना हात आखडता घेणार नाही आणि केंद्र व राज्य सरकार शेतकरी सन्मान योजनेप्रमाणे मदत करण्यासाठी कटिबद्ध आहे, असे आश्वासन त्यांनी दिले.
हे देखील वाचा – आशिया कपनंतर आता भारत ‘या’ संघाविरुद्ध उतरणार मैदानात; पाहा डिटेल्स