Trump Demands Nobel Peace Prize – मला शांततेचा नोबेल पुरस्कार द्या ,(Nobel Peace Prize) मी सात युद्ध थांबवली आहेत. मला हा पुरस्कार दिला नाही, तर हा अमेरिकेचा मोठा अपमान असेल, असा जाहीर हट्ट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष (U.S. President)डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump)यांनी आज केला. गाझा येथे शांतता प्रस्थापित करण्याच्या आपल्या योजनेवर जोर देत त्यांनी अमेरिकी सैन्य अधिकाऱ्यांसमोर हा दावा केला.
त्यांनी यावेळी पुन्हा एकदा दावा केला की भारत-पाकिस्तान तणावासोबतच मी ७ महिन्यांत जगभरातील ७ युद्धे थांबवली आहेत. इस्रायल आणि हमास (गाझा) यांच्यातील युद्धतोडगाही दृष्टीपथात असल्याचे सांगत त्यांनी नोबेलसाठी आपणच कसे योग्य आहोत, हेही अधोरेखित केले.
१० ऑक्टोबरला नॉर्वेतील नोबेल समितीकडून शांतता पुरस्काराची घोषणा केली जाणार आहे. त्याआधीच ट्रम्प हे आपण या पुरस्कारासाठी कसे योग्य आहोत, हे जगभर सांगत फिरत आहेत.
युद्ध विभागाला संबोधित करताना ट्रम्प म्हणाले की, माझा २०-कलमी गाझा शांतता आराखडा मध्यपूर्वेतील पेच सोडवू शकतो. इस्रायल आणि सर्व अरब राष्ट्रांनी या योजनेला सहमती दर्शवली आहे. हमासने हा आराखडा स्वीकारला नाही, तर त्यांच्यासाठी परिस्थिती खूप कठीण होईल . गाझा योजना यशस्वी झाली आठ महिन्यांत आठ संघर्ष सोडवण्याचा विक्रम माझ्या नावावर होईल. हा विक्रम याआधी कोणाच्याही नावावर नाही .
भारतात पहलगाम हल्ल्यामुळे भारत-पाकिस्तान यांच्यात निर्माण झालेल्या तणावाचाही त्यांनी पुन्हा एकदा उल्लेख केला आहे. या दोन्ही आण्विक शक्ती असलेल्या देशांमधील संघर्ष आपण सोडवला, असा दावा त्यांनी पुन्हा केला.
मला नोबेल पुरस्कार मिळेल का? असे विचारत ते पुढे म्हणाले की, मला हा पुरस्कार अजिबात मिळणार नाही. तो अशा एखाद्या व्यक्तीला देतील ज्याने काहीही केले नाही. कदाचित द माईंड ऑफ डोनाल्ड ट्रम्प नावाचे पुस्तक लिहिणाऱ्या लेखकाला तो दिला जाईल. मला वैयक्तिकरित्या पुरस्कार नको आहे. पण तो देशाला मिळायला हवा. कारण असे कार्य याआधी कधीही झाले नाही. राष्ट्राध्यक्षांचे मुख्यालय असलेल्या व्हाईट हाऊसनेही ट्रम्प यांना हा पुरस्कार मिळण्याची वेळ झाली आहे असे उघडपणे म्हटले आहे.
ट्रम्प यांनी अनेकदा भारत-पाकिस्तान युद्ध आपणच थांबवल्याचा दावा केला आहे. अमेरिकेसोबतचा व्यापार थांबवला जाईल अशी धमकी दोन्ही देशांना दिल्याने चार दिवसांत संघर्ष संपला, असे त्यांचे म्हणणे आहे. या दाव्याला दुजोरा देत पाकिस्तानचे सैन्यप्रमुख असीम मुनीर यांनीही लाखो लोकांचे प्राण वाचवल्याबद्दल आपले कौतुक केले आहे, असेही ट्रम्प म्हणाले. मात्र भारताचे पंतप्रधान मोदी यांनी ट्रम्प यांचा हा दावा उघडपणे फेटाळला नसला तरी भारताच्या परराष्ट्र खात्याने हा दावा फेटाळला आहे .
ट्रम्प यांच्या मते, कंबोडिया-थायलंड, कोसावो-सर्बेरिया, कांगो-रवांडा, भारत-पाकिस्तान, इस्रायल-इराण, इजिप्त-इथिओपिया आणि आर्मेनिया-अझरबैझान यांच्यातील संघर्ष त्यांनी मिटवला आहे. दुसरीकडे, ट्रम्प यांच्या धमकीनंतरही रशियाने युक्रेन युद्धातून मात्र माघार घेतलेली नाही.
शांततेच्या नोबेलसाठी इस्रायल, पाकिस्तान आणि कंबोडियाच्या नेत्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचे नामांकन पाठवले आहे. त्यांचे नामांकन ३१ जानेवारीच्या अंतिम मुदतीनंतर आल्याने ते अवैध ठरण्याची शक्यता आहे. अनेक नोबेल तज्ज्ञांच्या मते, ट्रम्प यांनी जागतिक संबंध कमकुवत केल्यामुळे आणि गाझा युद्धात इस्रायलला पाठिंबा दिल्याने त्यांची दावेदारी कमकुवत ठरते.
ट्रम्प यांचे आतापर्यंत चारवेळा नामांकन करण्यात आले आहे. दुसरीकडे आतापर्यंत चार अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना नोबेल पुरस्कार मिळाला आहे. यात थिओडर रूझवेल्ट, वुड्रो विल्सन, जिमी कार्टर आणि बराक ओबामा यांचा समावेश आहे.
यंदाचा नोबेल शांतता पुरस्कार दरवर्षीप्रमाणे १० ऑक्टोबर रोजी जाहीर होणार आहे. यंदा एकूण ३३८ जणांना नामांकन मिळाले आहे. निवड समितीमध्ये नॉर्वेजियन संसदेने नियुक्त केलेले पाच सदस्य असतात. त्यांच्याकडे देशोदेशीची सरकारे, राष्ट्रप्रमुख, पंतप्रधान, नामवंत प्राध्यापक आणि गतविजेते पुरस्कारासाठी नामांकन पाठवतात.
ही नामांकने आणि जगभरातील घडामोडींचा अभ्यास करून पुरस्कारार्थीची निवड केली जाते. आल्फ्रेड नोबेल यांच्या इच्छेनुसार १८९५ पासून दरवर्षी एखादी व्यक्ती किंवा संस्थेला हा पुरस्कार दिला जातो. पदक, मानचिन्ह आणि ११ दशलक्ष स्वीडिश क्राऊन (अंदाजे १०.५ कोटी रुपये) असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
हे देखील वाचा –
भिवंडीत मराठीची गरज काय?अबू आझमींचे वादग्रस्त विधान
आशिया कप ट्रॉफीवरून मोठा वाद! BCCI च्या पदाधिकाऱ्यांचा ACC बैठकीतून ‘वॉकआऊट