Uddhav Thackeray criticize Devendra Fadnavis: राज्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांकडून सातत्याने ‘ओला दुष्काळ’ जाहीर करण्याची मागणी केली जात असताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र नियमावलीत ओला दुष्काळ ही संकल्पनाच नसल्याचे म्हटले आहे.
मुख्यमंत्र्यांच्या या भूमिकेवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी थेट फडणवीस विरोधी पक्षनेते असताना त्यांनी लिहिलेले पत्र दाखवून जोरदार टीका केली आहे.
कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही 16 ऑक्टोबर 2020 रोजीचे फडणवीस यांचे पत्र ट्वीट करून शब्दांचा खेळ थांबवण्याची मागणी केली आहे.
तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी १६ ऑक्टोबर २०२० मध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राज्यात #ओला_दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करत पत्र लिहिले होते.
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) October 1, 2025
आज त्यापेक्षा दहा पटीने गंभीर परिस्थिती राज्यात निर्माण झाली आहे,म्हणून आम्ही जेव्हा ओला दुष्काळ जाहीर करण्याची… pic.twitter.com/EJOAxnVAEl
फडणवीसांचे पत्र वाचून ठाकरेंचा पलटवार
पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी राज्यात अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीकास्त्र सोडले. फडणवीसांनी विरोधी पक्षनेते असताना तत्कालीन मुख्यमंत्र्यांना लिहिलेले पत्र ठाकरे यांनी वाचून दाखवले.
त्या पत्रात काय होते?
परतीच्या पावसाने मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये झालेल्या प्रचंड नुकसानीबाबत तातडीने मदत देण्याची मागणी होती.
“शेतकऱ्यांचे अश्रू पाहून वेदना होतात. नुकसानीची व्यापकता पाहता आता तातडीने ओला दुष्काळ जाहीर करून दुष्काळाच्या निकषाप्रमाणे मदत दिली गेली पाहिजे.” अशी मागणी त्यात करण्यात आली होती.
हे पत्र वाचून दाखवत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना थेट सवाल केला: “सत्तेवर नसलात की ओला दुष्काळ असतो, सत्तेवर गेल्यावर संज्ञा गायब होते का? पदानुसार संज्ञा बदलतात का?”
सत्ताधाऱ्यांवर केली टीका
उद्धव ठाकरे यांनी यावेळी सरकारवर निष्क्रियतेचा आरोप केला. “मुख्यमंत्री जाहिरातींमध्ये व्यस्त आहेत, दुसरे उपमुख्यमंत्री पाकिटांवर आपले फोटो लावण्यात व्यस्त आहेत, तर तिसरे उपमुख्यमंत्री तर अंगाला अजिबात लावूनच घेत नाहीत.”, अशा शब्दात त्यांनी टीका केली.
उद्धव ठाकरे म्हणाले की, “साखर सम्राटांप्रमाणे शेतकरीही भाजपात आल्यावरच कर्जमाफी करणार का? काहीतरी गहाण टाकल्याशिवाय शेतकऱ्याला कर्ज मिळत नाही, याउलट साखर कारखानदारांना हजारो कोटींची कर्जहमी मिळते.”
ठाकरे यांनी हेक्टरी 50,000 रुपये तातडीची मदत देण्याची मागणी केली. तसेच, केंद्र सरकारकडून पीएम केअर फंडातून मदत आणण्याचा मार्गही त्यांनी सुचवला.
हे देखील वाचा – पंतप्रधान मोदींनी जारी केले 100 रुपयांचे विशेष नाणे; पहिल्यांदाच नाण्यांवर ‘हा’ फोटो