Home / Uncategorized / Farmer Suicides :निराश, हताश शेतकरी; मृत्यूला कवटाळू लागले

Farmer Suicides :निराश, हताश शेतकरी; मृत्यूला कवटाळू लागले

Farmer Suicides : सततची अतिवृष्टी आणि ढगफुटी यामुळे यावर्षी मराठवाडा, विदर्भ आणि दक्षिण महाराष्ट्रातील शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. या राक्षसी...

By: Team Navakal
Farmer Suicides

Farmer Suicides : सततची अतिवृष्टी आणि ढगफुटी यामुळे यावर्षी मराठवाडा, विदर्भ आणि दक्षिण महाराष्ट्रातील शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. या राक्षसी संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग त्याला दिसत नसल्याने तो हताश, निराश झाला आहे. सरकारी मदत जाहीर झाली तरी ती कधी मिळेल याची त्याला हमी नाही. अशी विषण्ण मनःस्थितीत हा शेतकरी मृत्यूला कवटाळू लागला आहे. एकामागे एक शेतकरी आत्महत्या करू लागले आहेत . नेते मात्र दसरा मेळाव्यात मग्न आहेत. या शेतकर्‍यांना वेगाने आणि खंबीर मदत पोहचली नाही तर आत्महत्यांचे सत्र सुरूच राहील.

मुलाची फी कशी भरायची?
अतिवृष्टीने पीक नष्ट केल्यावर मुलाला डॉक्टर बनवण्याचे स्वप्न पाहणार्‍या मधुकर सर्जेराव पळसकर (Madhukar Palskar) या 54 वयाच्या शेतकर्‍याने आर्थिक विवंचनेतून आयुष्य संपवले. ही  घटना छत्रपती संभाजीनगरच्या बकापूर-पळशी येथे घडली.
पळसकर यांचा मुलगा हैदराबाद येथे एमबीबीएसचे (MBBS)शिक्षण घेत आहे. त्यासाठी  फी भरण्याची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर होती. यासोबतच त्यांच्यावर राष्ट्रीयीकृत बँकेचे कर्ज देखील होते. भाजीपाला पिकातून उदरनिर्वाह आणि मुलाच्या शिक्षणाची फी भागवण्याची त्यांची योजना होती. मात्र अतिवृष्टीमुळे शेतात पाणी साचून कोबीच्या पिकाचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे त्यांचे आर्थिक संकट अधिकच वाढले. फी कशी भरायची आणि कर्ज कसे फेडायचे, या चिंतेतून त्यांनी शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. पळसकर यांच्या पश्चात पत्नी, तीन विवाहित मुली आणि एमबीबीएस शिकणारा मुलगा असा मोठा परिवार आहे.

धाराशिवला दोन आत्महत्या
मुसळधार पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाल्याने धाराशिवमध्ये उमेश सूर्यकांत ढेपे (Umesh Suryakant Dhepe)  (45) या शेतकर्‍याने आत्महत्या केली आहे. त्यांनी तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपवले.  
ढेपे यांची अणदूर शिवारात शेती होती. सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे त्यांच्या शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले होते. हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने ते गेल्या काही दिवसांपासून आर्थिक विवंचनेत होते. या नैराश्यातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले. उमेश ढेपे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या मृत्युमुळे शेतकरी वर्गात हळहळ व्यक्त होत असून, शासनाने तातडीने त्यांच्या कुटुंबाला मदत करावी, अशी मागणी होत आहे.  24 सप्टेंबर रोजी धाराशिवच्या भूम तालुक्यातील म्हात्रेवाडी येथील लक्ष्मण पवार (Laxman Pawar)(42) यांनी शेतीचे मोठे नुकसान झाल्याने आत्महत्या केली होती.

माझे पप्पा गेले तसे
कोणाचे जाऊ नये! लेकीचा आक्रोश

बार्शीच्या (Barshi) कारी गावातील शेतकरी शरद गंभीर (Sharad Gambhir)यांनी 25 सप्टेंबर रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. यानंतर त्यांच्या लेकीने माझे पप्पा गेले तसे कोणाचे जाऊ नये, अशी तीव्र हृदयद्रावक भावना व्यक्त केली. शरद गंभीर यांनी 7 एकर शेतीत प्रायोगिक फळबाग फुलवली होती. त्यासाठी कर्ज घेतले होते. मात्र अतिवृष्टीने सर्व वाहून नेले.त्यांच्या कुटुंबात आईवडील, पत्नी आणि मुलगा , मुलगी आहेत. त्यांच्या मुलीने सांगितले की,त्या दिवशी ते गाय बांधायला गेले. मम्मीने मी येते म्हणून म्हटले,  पण ते नको म्हणाले. थोड्या वेळाने गायी दुसर्‍याच्या शेतात गेल्याच्या दिसल्या. म्हणून मम्मीला सांगितले. तिने पप्पांना आवाज दिला. परंतु त्यांनी उत्तर दिले नाही. जवळ गेल्यावर झाडाच्या आडोशाला त्यांनी गळफास घेतल्याचे दिसले. त्यांच्यावर कर्ज होते.त्यांना सारखे फोन यायचे. कोणाचा फोन आहे विचारल्यावर गप्प बसायचे. माझे पप्पा माझे लाड करायचे. ते पोलीस होऊन दाखव म्हणायचे. आता वाईट वाटते आहे. आमचे माझे पप्पा गेले तसे कोणाचे जाऊ नये.

पुत्राची आत्महत्या! पित्यानेही प्राण सोडले
नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील कोंढा गावात अतिवृष्टीत झालेल्या शेतीच्या नुकसानीमुळे निवृती  कदम (Nivrutti Kadam)(48) या शेतकर्‍याने सोमवार 29 सप्टेंबर रोजी आत्महत्या केली. त्यानंतर अवघ्या 12 तासातच पुत्रवियोगाने त्यांचे 80 वर्षांचे वडील सखाराम कदम यांनीही मृत्यूला कवटाळले.


वडिलांचा आजार, शेतातील नापिकी आणि अतिवृष्टीचे नैसर्गिक संकट यामुळे खचलेल्या निवृत्ती कदम यांनी चिठ्ठीत लिहिले होते की, मराठा समाजाला (Maratha community) आरक्षण मिळत नाही, अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीची मदत मिळत नाही.  सरकारचे शेतकर्‍यांना मातीमोल करण्याचे धोरण आहे. त्यामुळे  जीवनयात्रा संपवत आहे. मुलाच्या आत्महत्येची बातमी त्यांच्या कानावर पडताच 12 तासांतच सखाराम कदम यांनीही प्राण सोडले. दोघांवर आज अंत्यसंस्कार झाले.


हे देखील वाचा –

शिंदे स्वतःला ठाकरे समजतात; संजय राऊतांची बोचरी टीका

मध्य प्रदेशातील सरकारी रुग्णालयात खोकल्याच्या औषधाने ६ मुलांचा मृत्यू

भिवंडीत मराठीची गरज काय?अबू आझमींचे वादग्रस्त विधान

Web Title:
Topics:
संबंधित बातम्या