No Trophy Without Suryakumar! Naqvi – पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे (PCB)अध्यक्ष मोहसीन नक्वी (Mohasin Naqvi) यांनी काहीशी माघार घेत आशिया चषकाच्या (ACC)अंतिम सामन्याच्या पुरस्कार वितरण समारंभाबद्दल भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (BCCI) माफी मागितली असे सांगितले जात आहे.
मात्र, विजेतेपदाचा चषक भारतीय संघाला न देण्याचा अडेलतट्टूपणा त्यांनी कायम ठेवला आहे. चषक हवा असेल तर सूर्यकुमारला दुबईच्या ऑफीसला पाठवा.
बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी म्हटले की आशिया चषक हा पाकिस्तान क्रिकेट बोर्ड अध्यक्षांची वैयक्तिक मालमत्ता नाही, तो आशियाई क्रिकेट परिषदेच्या मालकीचा आहे. दुबईत परिषदेची काल बैठक झाली.
या बैठकीत शुक्ला यांनी नक्वींना हे खडेबोल सुनावले आणि बीसीसीआय पदाधिकार्यांनी बैठक अर्ध्यावर सोडत सभात्याग केला. या बैठकीत चषकाच्या वादावर तोडगा निघाला नाही. त्यामुळे दोन क्रिकेट संघातील या वादाचा चेंडू आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या कोर्टात जाणार आहे.
रविवारी आशिया चषक अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानला हरवल्यानंतर हा वाद सुरू झाला. भारताने स्पर्धेतील पहिल्या सामन्यापासूनच पाकिस्तानच्या खेळाडूंसोबत हस्तांदोलन न करण्याची भूमिका घेतली होती.
याच धर्तीवर भारतीय संघाने पाकिस्तानचे गृहमंत्री आणि आशियाई क्रिकेट परिषदेचे प्रमुख असलेले पाक क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्या हस्ते चषक स्वीकारण्यास नकार दिला होता. त्यानंतर नक्वींनी चषक स्वतःसोबत नेल्याने वाद उद्भवला आहे. याच पार्श्वभूमीवर काल आशियाई बोर्डाची दुबईत बैठक झाली.
या बैठकीत नक्वींनी बीसीसीआयकडे दिलगिरी व्यक्त केली असे म्हटले जाते. अंतिम सामन्यानंतर तणाव वाढायला नको होता, असेही ते म्हणाल्याचे कळते. मात्र त्यांनी चषक परत करण्याच्या मागणीला विरोध केला.
भारतीय संघाला चषक हवा असेल तर कर्णधार सूर्यकुमार यादव याने दुबईतील आशियाई बोर्ड कार्यालयात येऊन तो स्वतः स्वीकारावा, अशी अट नक्वींनी घातली आहे. मात्र, बीसीसीआयने तात्काळ ही अट फेटाळून लावली आहे. भारताने अंतिम सामन्याच्या चषक वितरण समारंभावेळीच चषक स्वीकारला नसेल तर दुबईला जाऊन तो चषक घेण्याचा विषयच उद्भवत नसल्याचेही स्पष्ट केले.
या संपूर्ण बैठकीदरम्यान नक्वींचा सूर नरमाईचा होता. नक्वी वादावर तोडगा काढण्यात अपयशी ठरल्याने बीसीसीआयच्या पदाधिकार्यांनी सभात्याग करत बैठक अर्ध्यावर सोडली. या बैठकीला महाराष्ट्राचे मंत्री आशिष शेलार हेही
उपस्थित होते.
बीसीसीआयचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी कालच्या बैठकीत नक्वींच्या कृतीचा तीव्र निषेध नोंदवला. त्यांनी बैठकीत स्पष्ट केले की भारतीय संघाने नियमानुसार तो चषक आपल्याकडे सुपूर्द करण्याची मागणी केली आहे.
बीसीसीआयने नक्वींची अट फेटाळल्यामुळे दोन देशातील या संघर्षाला आता आंतरराष्ट्रीय स्वरूप येणार आहे. बीसीसीआय नोव्हेंबरमध्ये होणार्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) बैठकीत हा मुद्दा मांडण्याची शक्यता आहे. चषक सुपूर्द होत नाही, तोपर्यंत हा वाद संपणार नाही, अशी ठाम भूमिका बीसीसीआयने घेतली आहे.
हे देखील वाचा –
अमेरिकेतील ‘सरकार शटडाऊन’ झाले म्हणजे काय? नागरिकांवर आणि अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होणार?