BJP Backs Thackeray’s Nightlife Plan – उबाठा (UBT) नेते आदित्य ठाकरे( Aditya Thackeray) यांच्या नाईट लाईफच्या (Nightlife Plan) योजनेला काही वर्षापूर्वी तीव्र विरोध करणाऱ्या भाजपने आता ठाकरेंच्या त्याच कल्पनेची राज्यभर अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात आता रात्रभर मॉल, रेस्टाॅरंट, चित्रपटगृहे सुरु ठेवता येतील असा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे.
त्यामुळे अगदी मध्यरात्रीही खरेदी, चित्रपट पाहणे वा जेवण्याची सोय उपलब्ध होणार आहे. मद्यविक्री करणा-यांना मात्र मध्यरात्री दीड नंतर आपले दुकान बंद करावे लागणार आहे.
राज्याच्या उद्योग विभागाने याबाबत एक परिपत्रक जारी केले आहे. राज्य सरकारच्या तिजोरीत खडखडाट असल्याने महसूली उत्पन्न वाढविण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. २०१४ साली राज्यात भाजप-शिवसेना युती सरकार आल्यानंतर युवा सेना नेते आदित्य ठाकरे यांनी मुंबईत नाईट लाईफची परवानगी देण्याची मागणी लावून धरली होती.
या मागणीला भाजपकडून तीव्र विरोध झाला. पंढरपुरात रात्रीही भाविकांना विठ्ठलाचे दर्शन मिळावे, यासाठी आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस हे प्रयत्नशील असताना काही नेते आपल्या विशेषाधिकाराचा वापर करून नाईट लाईफचा लढा लढत आहेत, अशी टीका भाजपचे नेते आशिष शेलार यांनी १० वर्षांपूर्वी केली होती.
त्यानंतर ठाकरे हे महाविकास आघाडी सरकारमध्ये पर्यटन मंत्री झाल्यानंतर त्यांनी २६ जानेवारी २०२० पासून मुंबईत नाईट लाईफ सुरू करण्याचा निर्णय घेतला. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही व यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असे म्हणत तेव्हाही भाजपने त्यांच्या या निर्णयाला कडाडून विरोध केला होता.
मात्र आता नाईट लाईफची कुठेही मागणी वा चर्चा नसताना अचानक राज्य सरकारने केवळ मुंबईतच नाही तर राज्यभर नाईट लाईफची अनुमती देण्याचा निर्णय घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
२४ तास दुकाने सुरू ठेवण्याची अनुमती देण्यात आली असली तरी हा दुकाने सुरू ठेवायचे की बंद हा निर्णय संबंधित आस्थापनांना घ्यायची मुभा आहे. ज्यांना रात्रीही ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळतो, अशी दुकाने रात्रभर आता उघडी राहू शकतील. मात्र कामगारांना आठवड्यात एकदा २४ तास साप्ताहिक सुटी देणे बंधनकारक राहील, हेही राज्य सरकारने स्पष्ट केले आहे.
मद्यविक्रीच्या दुकानांना
मात्र २४ तास खुले राहण्याची परवानगी नाही. परमिट रुम, हुक्का पार्लर, देशी बार, डिस्कोथेक आदी मद्यपान ठिकाणांना जुन्या नियमांनुसार केवळ रात्री दीडपर्यंतच खुले राहण्याची अनुमती असेल.
हे देखील वाचा –
नवज्योतसिंग सिद्धूची पत्नी पुन्हा विधानसभा लढवणार