Home / महाराष्ट्र / दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदेंचा महिलांना मोठा शब्द; ‘लाडकी बहीण योजने’बद्दल म्हणाले…

दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदेंचा महिलांना मोठा शब्द; ‘लाडकी बहीण योजने’बद्दल म्हणाले…

Ladki Bahin Yojana: महाराष्ट्रातील महिलांसाठी आणलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ महायुतीच्या विधानसभा निवडणुकीतील यशात महत्त्वपूर्ण ठरली होती. मात्र, या...

By: Team Navakal
Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana: महाराष्ट्रातील महिलांसाठी आणलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ महायुतीच्या विधानसभा निवडणुकीतील यशात महत्त्वपूर्ण ठरली होती. मात्र, या योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर पडणाऱ्या मोठ्या आर्थिक भारावरून आणि अनेक खात्यांचा निधी यासाठी वापरला जात असल्याच्या टीकांमुळे ती बंद होणार असल्याची जोरदार चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात रंगली होती.

याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये झालेल्या दसरा मेळाव्यात लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नसल्याचे जाहीर आश्वासन दिले आहे.

अफवांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रत्युत्तर

या योजनेच्या भविष्याबद्दल विरोधकांकडून उलटसुलट अफवा पसरवल्या जात आहेत, परंतु “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही, हा एकनाथ शिंदेचा शब्द आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

या योजनेला विरोध करणाऱ्यांना योजनेवर बोलण्याचा कोणताही अधिकार नसल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली. ही योजना गरीब कुटुंबातील महिलांना आर्थिक आधार देण्यासाठी सुरू करण्यात आली आहे, ज्या अंतर्गत दर महिन्याला लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात 1,500 रुपये जमा केले जातात.

निवडणुकीतील यशाचा दावा आणि निकषांबाबत स्पष्टीकरण

विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या एकतर्फी विजयाचे श्रेय लाडकी बहीण योजना आणि ‘शासन आपल्या दारी’ सारख्या योजनांना असल्याचे एकनाथ शिंदे यांनी नमूद केले. त्यांनी दावा केला की त्यांच्या अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कारकीर्दीत केलेल्या कामांमुळे महायुतीच्या 232 जागा निवडून आल्या.

योजनेवर टीका करताना उद्धव ठाकरे यांनी ‘लाडकी बहीण योजना म्हणजे भाजप पगारी मतदार तयार करत आहे,’ असा आरोप केला होता. या आरोपाला प्रत्युत्तर देताना शिंदे यांनी दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांना सर्व निकष बाजूला ठेवून मदत दिली जाईल, असे स्पष्ट केले.

ठाकरे गटाकडून होणाऱ्या टीकेला सडेतोड उत्तर

यावेळी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. उद्धव ठाकरे यांनी एका खुर्चीसाठी सर्व काही गमावले, अशी टीका त्यांनी केली. उद्धव ठाकरे हे पक्षप्रमुख नसून, आपल्याच पक्षातील नेत्यांना संपवणारे आणि कारस्थान करणारे ‘कटप्रमुख’ आहेत, असे शिंदे म्हणाले. तसेच, उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात अमित शहा यांच्या जोड्यांचा भार वाहणारे गाढव असा उल्लेख करत टीका केली होती, त्यालाही शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले.

“तुम्ही घरात बसून वर गेला. किती टीका करता. तुमच्यासारखा रंग बदलणारा मी कधीच पाहिला नाही,” असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

हे देखील वाचा –

नवज्योतसिंग सिद्धूची पत्नी पुन्हा विधानसभा लढवणार

Web Title:
संबंधित बातम्या