Uddhav Confirms Raj Alliance – आज शिवतीर्थावर झालेल्या उबाठाच्या (UBT) दसरा मेळाव्याला राज ठाकरे आले नाहीत. पण राज ठाकरे (Raj thackeray) यांच्याशी युती कायम राहील, अशी घोषणा उध्दव ठाकरे (Uddhav thackeray) यांनी केली. यामुळे पुन्हा उत्साह वाढला आहे.
आज दसरा मेळाव्यात बोलताना उध्दव ठाकरे यांनी शेतकर्यांसाठी सरकारने हेक्टरी 50 हजाराची मदत देण्याची मागणी केली, त्याचबरोबर त्यांनी भाजपाच्या हिंदुत्वावर टीका केली, मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराची उदाहरणे देत संघाला सवाल केला की, तुमच्या कष्टाला लागलेली ही विषारी फळे लागली याचे समाधान वाटते का?
भरपावसात हा मेळावा झाला. नेते मंचावर सुखरूप होते, पण शिवसैनिकांनी पावसात भिजत उपस्थित राहून आपली निष्ठा दाखवली.
उद्धव ठाकरे म्हणाले की, अनेक पक्षांचा शिवसेना फोडण्याचा प्रयत्न सुरू आहे. काही जणांना त्यांनी पळवले आहे. पण जे पळवले ते पितळ होते. सोने माझ्याकडेच आहे. वाघाचे कातडे पांघरलेल्या लांडग्याची गोष्ट माहीत आहे.
पण आता येताना बाळासाहेब ठाकरे यांची भगवी शाल पांघरलेल्या गाढवाचे चित्र मी पहिल्यांदाच पाहिले. कितीही शाली टाकल्या तरी गाढव ते गाढवच. हे अमित शहांचा भार वाढणारे गाढव आहे. पण जनता त्यांना खरे रूप दाखवल्याशिवाय राहणार नाही. तो दिवस दूर नाही. आज सगळीकडे चिखल आहे. याचे कारण कमळाबाईच आहे. लोकांच्या आयुष्याचा चिखल केला आहे.
शेतकर्यांची जमीन वाहून गेलीच आहे. पण घराघरात चिखल आहे. हे संकट फार मोठे आहे. आता आपले सरकार नाही, पण जी काही मदत करता येईल ती आपण करू. आपल्या आयुष्याचे सार्थक होईल. आज मुख्यमंत्री म्हणतात की, ओला दुष्काळ ही संज्ञाच नाही. आपले सरकार होते, तेव्हा हेच बोंबलत होते की, ओला दुष्काळ जाहीर करा. खड्ड्यात
घाला सगळे निकष आणि शेतकर्यांना मदत करा. हेक्टरी 50 हजार मदत मिळलीच पाहिजे. मी मुख्यमंत्री असताना नागपूरच्या पहिल्याच अधिवेशनात कर्जमाफी केली होती. तशी आता या ठेवून सरकारने कर्जमुक्ती करावी.
शेतकरी वाट बघत आहेत. 2017 ची कर्जमुक्ती अजून झालेली नाही. आम्ही कर्जमाफी केल्यावर कोरोनाचे संकट आले. नंतर गद्दार सुरत- गुवाहाटी निघून गेल्यामुळे ती अर्धवट राहिली.
सरकारने आणलेल्या जनसुरक्षा कायद्यावरही उद्धव ठाकरेंनी कडाडून टीका केली. ते म्हणाले की, जो लढेल तो तुरुंगात जाईल, अशी या सरकारची वाटचाल सुरू आहे. या कायद्याला सर्वांनी विरोध केला, तेव्हा मुख्यमंत्री म्हणाले की, हा कडवे, अतिडावे यांच्यासाठी आणलेला कायदा आहे.
आम्ही देशप्रेमी आणि देशद्रोही एवढेच ओळखतो. सोनम वांगचुक या माणसाने लेह लडाखमध्ये आपले जवान नीटनेटके राहावे त्यांना सोलार टेक्नॉलॉजीवर चालणारी घरे बनवली. पण त्यांनी आंदोलन सुरू केले. न्याय हक्कासाठी त्यांनी लढाई सुरू केली, तेव्हा त्यांना तुरुंगात टाकले. देशद्रोही ठरवले गेले. न्यायहक्क मागणे म्हणजे देशद्रोह होतो?
त्यांच्यावर पाकिस्तानला जाऊन आलात, असा आरोप ठेवला. तुम्ही पाकिस्तानला जाऊन गुपचूप केक खाल्ला त्याचे काय? तीन वर्ष मणिपूर जळत आहे. मोदी जायला तयार नव्हते. ते आता मणिपूरला गेले. तेव्हा वाटले होते की, मोदी काही तरी तोडगा काढतील, सांत्वन करतील. पण त्यांचे भाषण ऐकून हसावे की रडावे ते कळलेच नाही. मणिपूरच्या नावातच मणी आहे असे ते म्हणाले.
मणिपूरच्या नावातील मणी दिसला, पण जनतेच्या डोळ्यांतील पाणी दिसले नाही.उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कारभारावरही हल्लाबोल केला. ते म्हणाले की, एका सर्व्हेत भारतातील लाडक्या मुख्यमंत्र्यांच्या यादीत देवेंद्र फडणवीस यांचे नाव दहाव्या नंबरवर आहे.
संघाच्या मोहन भागवत यांना माझा प्रश्न आहे, ज्या कामासाठी संघाने शंभर वर्ष मेहनत केली आणि त्या मेहनतीला लागलेली विषारी फळे याबाबत तुम्ही समाधानी आहात का? मोहन भागवत यांनी मुस्लीम धर्मगुरू यांच्यासोबत बैठका घेतल्या. आहे का भाजपकडे हिंमत मोहन भागवत यांनी हिंदुत्व सोडले बोलण्याची?
मोहन भागवत यांनी मशिदींना भेट दिल्यानंतर सर्वोच्च मुस्लीम धर्मगुरूंनी मोहन भागवत यांना राष्ट्रपिता असा उल्लेख केला होता. काही लाज आहे की नाही? भाजपाला माझा सवाल आहे की, तुमच्या झेंड्यावरचा हिरवा रंग काढा आणि मग आम्हाला बोला.
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीबाबत बोलताना ते म्हणाले की, तुम्ही निवडणूक लावाच. जनता वाटच बघत आहे. मुंबईच्या रस्त्यांची चाळण झाली आहे. मेट्रो गळते आहे. मोनो लटकते आहे आणि हे आपले महापालिकेत भाजपाचा महापौर झालाच पाहिजे म्हणून दिल्लीत जात आहेत. मुंबई महापालिका हे जिंकूच शकत नाही.
ते व्यापारी म्हणून मुंबईकडे बघत आहेत, आम्ही आमचा जीव म्हणून मुंबईकडे बघतो. तुम्ही जिंकलात तर मुंबई अदानीला देऊन टाकाल. आदित्य ठाकरेंनी मुंबईत नाईट लाईफ सुरू केले, तेव्हा यांनी नंगानाच केला. आता तेच नाईट लाईफ परत आणताहेत.
उद्धव ठाकरेंनी मोदींनाही लक्ष्य केले. ते म्हणाले की, आशिया कप जिंकल्यावर जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाशी करतो तो माणूस बेशरम आहे. क्रिकेट आणि पाकिस्तानसोबत? कशाला थोतांड केले तुम्ही? पहलगाममध्ये धर्म बघून गोळ्या घालण्यात आल्या. तुमच्या देशात हिंदू सुरक्षित नाहीत. बाप हिंदुत्वाचे ढोंग करतो आणि पोरगा पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळतो.
बिहारमध्ये निवडणुकीआधी सव्वा लाख कोटी दिले. जीएसटीचे 125 लाख कोटी खिशात घातले. यांनीच जीएसटी लावला आणि आता कमी केला. लाडक्या बहिणीला पैसे देऊन पगारी मतदार केलेत. तुम्ही पगारी मतदार बनायचे की नाही ठरवा. राज आणि मी एकत्र आलो आहोत, ते एकत्र राहण्यासाठीच.
मातृभाषेचा जिथे जिथे र्हास होईल, तिथे आम्ही फूट पडू देणार नाही. हिंदीला आमचा विरोध नाही, पण हिंदीची सक्ती सहन करणार नाही. मुंबई व्यापार्यांच्या खिशात जाणार असेल, तर खिसा फाडून लढल्याशिवाय राहणार नाही.
राज ठाकरेआलेच नाहीत
उबाठाच्या दसरा मेळाव्याला राज ठाकरे येणार आहेत अशी चर्चा सुरू होती. मात्र ते घडले नाही. राज ठाकरे
आले नाहीत.

बाळासाहेबांची शाल पांघरलेले गाढव
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्याच्या जाहिरातींवर त्यांचे भगवी शाल घातलेले छायाचित्र आहे. त्यावर टीका करताना भाषणाच्या सुरुवातीलाच उध्दव ठाकरे म्हणाले की, बाळासाहेबांची भगवी शाल पांघरलेले गाढव मी पहिल्यांदाच पाहिले. कितीही शाली घातल्या तरी गाढव ते गाढवच.
बिनडोक्याचा रावण
यावेळी या मेळाव्यात डोके नसलेल्या रावणाचे दहन करण्यात आले. उध्दव ठाकरे म्हणाले की रावणाला दहा डोकी असतात. पण या बिनडोक सरकारचे दहन करायचे असल्याने यावेळी बिनडोक रावणाचे दहन केले आहे.
शर्मिला ठाकरेंनी जिलेबी वाटून
शिवसैनिकांना शुभेच्छा दिल्या
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी दसर्याच्या पार्श्वभूमीवर उबाठा शिवसैनिकांना मिठाई आणि जिलेबी वाटून दसर्याच्या शुभेच्छा दिल्या. शिवतीर्थावर पार पडणार्या दसरा मेळाव्याच्या निमित्ताने राज्यभरातून तिथे आलेल्या शिवसैनिकांना त्यांनी घरी आमंत्रित करून भेट घेतली.
शर्मिला ठाकरे यांनी शिवसैनिकांना दसर्याचे सोनेही दिले. या स्वागतामुळे शिवसैनिक भारावून गेले. त्यांनी भावना व्यक्त करताना म्हटले की, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे गेल्या अनेक वर्षांपासून विभक्त आहेत.

आता ते पुन्हा एकत्र यावेत अशी आमची इच्छा आहे. शिवतीर्थावर बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीला वंदन केले. त्यानंतर शर्मिला वहिनी बाहेर आल्या आणि त्यांनी आम्हाला सर्वांना बोलावून मिठाई देऊन शुभेच्छा दिल्या. त्यामुळे आम्हाला भरून आले आहे. महाराष्ट्र आणि मुंबईत दोन्ही भावांची एकत्र सत्ता येण्याचे संकेत आहेत. राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर महाराष्ट्रातच नाही तर देशात मोठी ताकद निर्माण होईल.
हे देखील वाचा –
5 वर्षांनंतर भारत-चीन थेट विमानसेवा पुन्हा सुरू! ‘या’ तारखेला IndiGo घेणार भरारी
दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदेंचा महिलांना मोठा शब्द; ‘लाडकी बहीण योजने’बद्दल म्हणाले…