Mahayuti’s Power from Galli to Delhi – गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये तुडुंब गर्दीत झालेल्या शिवसेना शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात पक्षाचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आगामी घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी रणशिंग फुंकले.
गल्लीपासून दिल्लीपर्यंत महायुतीचीच सत्ता यावी यासाठी आतापासून कामाला लागा, असे आवाहन कार्यकर्त्यांना केले. राज्यातील नुकसानग्रस्त शेतकर्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही, त्यांना दिवाळीच्या आधी मदत दिल्याशिवाय राहणार नाही, असे आश्वासनही शिंदे यांनी यावेळी दिले.
आपल्या तासाभराच्या भाषणात शिंदे यांनी शिवसेना उबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर विविध मुद्यांवरून यथेच्छ टीका. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कौतुकांचा वर्षाव केला. मात्र संपूर्ण भाषणात त्यांनी शिवसेनेचे माजी ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांचा केवळ एकदाच उल्लेख केला.
मराठवाडा आणि विदर्भासह राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकर्यांचे अतोनात नुकसान झाले असून, सर्व सरकारी निकष बाजूला ठेवून नुकसानग्रस्त शेतकर्यांना तातडीने मदत केली पाहिजे, असा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला आहे, असे शिंदे यांनी सांगितले.
शेतकर्यांना मदत करण्यावरून शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांची खिल्ली उडवली. आम्ही व्हॅनिटी व्हॅन घेऊन शेतकर्यांच्या बांधावर जाणारे लोक नव्हे. आम्ही मदत करायला गेलो तेव्हा आमच्या आधी मदतीचे साहित्य भरलेले ट्रक त्या ठिकाणी पोहोचले होते, असे सांगताना त्यांनी उद्धव ठाकरेंची नक्कल केली. हे आता माझ्या हातात काही नाही म्हणतात. पण यांच्या हातात होते तेव्हाही त्यांनी शेतकर्यांना मदत केली नाही, असा आरोप शिंदे यांनी केला.
शिंदे यांनी आपल्या भाषणात बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा वारंवार उल्लेख करत बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराचा वारसा आपण पुढे नेणार, अशी ग्वाही दिली. बाळासाहेबांचे विचार हे ज्वलंत हिंदुत्वाचे विचार होते. 2019 साली केवळ मुख्यमंत्रिपदाच्या मोहापायी ते विचार सोनिया गांधी यांच्या चरणी अर्पण केले गेले.
उध्दव ठाकरे यांचे नाव न घेता शिंदेंनी त्यांचा उल्लेख कटप्रमुख असा केला. शिंदे म्हणाले की, हे पक्षप्रमुख नव्हे कट कारस्थाने करणारे कटप्रमुख आहेत. त्यांनी आपल्या पक्षातील सहकार्यांना कारस्थाने करून नेस्तनाबूत केले.
पण आम्ही मात्र बाळासाहेबांच्या विचारांच्या मार्गाने खंबीरपणे वाटचाल करत आहोत. 80 टक्के राजकारण आणि 20 टक्के समाजकारण हा मंत्र बाळासाहेबांनी आम्हाला दिला. खरा शिवसैनिक हा घरात नव्हे तर गरजवंताच्या दारात दिसला पाहिजे, असे बाळासाहेब नेहमी म्हणायचे. याचा विसर काहींना पडला आहे.
कोणाच्या युतीची चिंता नको
उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येण्याबद्दलच्या चर्चेचा प्रत्यक्ष उल्लेख न करता शिंदे यांनी ठाकरे बंधुंच्या युतीमुळे काहीही फरक पडणार नाही, असा दावा केला. कोणाच्या युतीची, मनोमिलनाची किंवा एकत्र येण्याची मुळीच चिंता करण्याची गरज नाही. विधानसभेला आम्ही अभूतपूर्व विजय मिळवला. म
हायुतीचे 232 आमदार निवडून आले. आता मुंबई मनपा आणि प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थांवरही महायुतीचाच झेंडा फडकवल्याशिवाय राहणार नाही, असा निर्धार शिंदे यांनी
व्यक्त केला.शेतकर्यांच्या नुकसानावर दुःख व्यक्त करत शिंदे म्हणाले की, शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. त्याच्यावर आस्मानी संकट कोसळले आहे. असे कितीतरी गरीब शेतकरी असतील की, ज्यांच्या मुलींची लग्ने ठरणार असतील. त्या मुलींच्या लग्नाची सर्व जबाबदारी आम्ही घेतली आहे.
मोदींचे वारेमाप कौतुक
शिंदे यांनी पंतप्रधान मोदी यांच्या कामाची स्तुती केली. ते म्हणाले की, मोदी खरे वाघ आहेत. त्यांच्या 2014 ते 2024 या दहा वर्षांच्या कारकिर्दीत देशात आणि महाराष्ट्रात विकासाचे मोठे मोठे प्रकल्प आले. ते ठरल्या वेळेत सुरू करून दाखवले. 2022 पूर्वीचे सरकार स्थगिती सरकार होते. सगळ्या कामांना स्थगिती दिली जात होती.
मंदिरे बंद, सणांवर बंदी असा सगळा प्रकार सुरू होता. पण 2022 मध्ये मी मुख्यमंत्री झाल्यापासून सर्व प्रकल्पांवरील स्थगिती हटवली. मंदिरे खुली केली, सणांवरील बंदी उठवली. हे सर्व पंतप्रधान मोदी यांच्यामुळे शक्य झाले. दहा वर्षांच्या कालावधीत मोदींनी महाराष्ट्राला अपेक्षेपेक्षा एक दोन पट नव्हे तर पाचपट मदत केली.
मोदींनी महाराष्ट्राच्या विकासासाठी 10 लाख कोटी रुपयांचा निधी दिला. त्या निधीच्या बळावरच मुंबई आणि महाराष्ट्र विकासाच्या मार्गावर वेगाने घोडदौड करत आहे. मोदी सदैव आमच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले, याचा मला सार्थ अभिमान आहे.
लक्षवेधी घोषवाक्ये
या परिसरात लावलेल्या अनेक फलकांवरील घोषवाक्ये लक्षवेधी होती. ‘सोनं विचारांचं देऊ घेऊ मनसोक्त, भगवे विचार भगवेच रक्त’ हे घोषवाक्य लिहिलेले फलक या परिसरात अनेक ठिकाणी लावले होते. एकनाथ शिंदेंची थोरवी सांगणारे गीत वाजत होते.
सभागृहात कार्यकर्ते थिरकले!
या मेळाव्याच्या प्रारंभी गायक अवधूत गुप्ते यांनी अनाथांचा नाथ, लोकनाथ! हे एकनाथ शिंदे यांच्यावरील गीत सादर केले. तसेच त्यानंतर शिवसेना, शिवसेना हे गीत सादर केले. या दोन्ही गीतांच्यावेळी सभागृहात उपस्थित हजारो कार्यकर्ते शिवसेनेचा ध्वज हाती घेऊन आपापल्या जागांवर उभे राहून नाचत होते.
वैद्यकीय मदत कक्षासमोर गर्दी
शिवसेना शिंदे गटाच्या वैद्यकीय मदत कक्षाचे राज्यभर मोठे काम आहे. सभेच्या ठिकाणी ऐनवेळी वैद्यकीय मदत लागू शकते हे लक्षात घेऊन या सभास्थळी कक्ष उभारल्याचे या कक्षाचे चारकोप शाखाप्रमुख महेंद्र शेडगे यांनी सांगितले. या कक्षासमोर मोठ्या प्रमाणात गर्दी होती. कार्यकर्ते औषधे व जीवनसत्वांच्या गोळ्या मागताना दिसत होते.
पूरग्रस्तांना मदतीसाठी पुढाकार
पूरग्रस्त शेतकर्यांना मदतीसाठी 15 ट्रक या ठिकाणहून सोडले जाणार आहेत. त्यानंतर मेळाव्याला सुरुवात होणार आहे, अशी घोषणा पक्षातर्फे यापूर्वीच करण्यात आली आहे. कांदिवलीहून आलेले शिंदे गटाचे विश्वनाथ पुजारी आणि मालाडचे शाखाप्रमुख गणेश कदम यांनी दै. ‘नवाकाळ’शी बोलताना सांगितले की, त्यांनी स्थानिक पातळीवर पूरग्रस्तांसाठी मदत गोळा केली आहे.
मदत करतानाची चित्रफित दाखवली
शिंदे यांचे भाषण मध्येच थांबवून पूरग्रस्त भागांतील शेतकर्यांना शिंदेंचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन मदत करत असल्याची एक चित्रफित दाखवण्यात आली. चित्रफितीमध्ये वृध्द महिला, पुरुष आणि काही तरुणींनी शिंदे यांना आपल्या व्यथा सांगितल्या. हे सर्व शेतकरी संकटाच्या परिस्थितीत मदत केल्याबद्दल शिंदे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचे आभार मानत होते. या चित्रफितीत भगवे झेंडे लावलेले दिसत होते.
आय अॅम मॅड मॅड हिंदू शिंदेंच्या बॅनरची चर्चा
दसरा मेळाव्यानिमित्त शिंदे गटाने मुंबईत गोरेगावच्या नेस्को सेंटरवर लावलेले बॅनर विशेष चर्चेत राहिले. या बॅनरवर डाव्या बाजूला बाळासाहेब ठाकरे यांचे छायाचित्र आणि उजव्या बाजूला एकनाथ शिंदे यांचे छायाचित्र होते. बॅनवर चला व्हा सज्ज, मुंबईवर सुध्दा भगव्याचेच राज्य, अशी आकर्षक घोषणा आणि त्याखाली बाळासाहेबांचेच ’आय अॅम अ हिंदू, अ मॅड मॅड हिंदू’ हे वाक्य लिहिले होते.
हे देखील वाचा –
राज ठाकरेंशी युती कायम राहणार उद्धव ठाकरेंची पुन्हा जाहीर ग्वाही
5 वर्षांनंतर भारत-चीन थेट विमानसेवा पुन्हा सुरू! ‘या’ तारखेला IndiGo घेणार भरारी
दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदेंचा महिलांना मोठा शब्द; ‘लाडकी बहीण योजने’बद्दल म्हणाले…