Mirabai Chanu: भारताची स्टार वेटलिफ्टर मीराबाई चानू (Mirabai Chanu) हिने तब्बल तीन वर्षांनंतर जागतिक वेटलिफ्टिंग अजिंक्यपद स्पर्धेत पदक जिंकत शानदार पुनरागमन केले आहे. नॉर्वेतील फोर्डे येथे झालेल्या या स्पर्धेत महिलांच्या 48 किलो वजनी गटात चानूने रौप्य पदक पटकावले.
चानूने स्नॅच आणि क्लीन अँड जर्क या दोन्ही प्रकारात मिळून एकूण 199 किलो (स्नॅच: 84 किलो, क्लीन अँड जर्क: 115 किलो) वजन उचलले. या पदकामुळे 2022 नंतर या जागतिक स्पर्धेत भारताच्या पदकांची प्रतीक्षा संपली असून, चानूच्या कारकिर्दीतील हे तिसरे जागतिक अजिंक्यपद पदक आहे.
उत्तर कोरियाच्या खेळाडूचा विश्वविक्रम
या स्पर्धेवर उत्तर कोरियाच्या री सॉन्ग गम हिने पूर्णपणे वर्चस्व गाजवले. तिने स्नॅचमध्ये 91 किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये 122 किलो वजन उचलून एकूण 213 किलो वजनासह सुवर्ण पदक जिंकले. तिच्या शेवटच्या दोन लिफ्ट्सने क्लीन अँड जर्क आणि एकूण वजनाच्या श्रेणीत नवीन विश्वविक्रम प्रस्थापित केला.
थायलंडच्या थान्यथॉन सुखचारोएन हिने 198 किलो (स्नॅच: 88 किलो, क्लीन अँड जर्क: 110 किलो) वजन उचलून कांस्य पदक मिळवले.
चानूची झुंजार कामगिरी
पॅरिस ऑलिम्पिक मध्ये चौथ्या स्थानावर राहिलेल्या चानूची जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील ही पहिली उपस्थिती होती. तिने 84 किलो वजनाच्या यशस्वी स्नॅचसह स्पर्धेची सुरुवात केली, परंतु 87 किलो वजनाचे पुढील दोन प्रयत्न तिचे चुकले आणि स्नॅच सेगमेंटमध्ये ती तिसऱ्या स्थानावर राहिली.
तिने क्लीन अँड जर्कमध्ये जबरदस्त पुनरागमन करत 109 किलो, 112 किलो आणि शेवटच्या प्रयत्नात 115 किलोचे यशस्वी लिफ्ट केले. या कामगिरीमुळे तिला क्लीन अँड जर्क तसेच एकूण वजनाच्या श्रेणीत रौप्य पदक मिळाले.
चानूच्या या पदकामुळे जागतिक वेटलिफ्टिंग अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या एकूण पदकांची संख्या 18 झाली आहे. विशेष म्हणजे, ही सर्व 18 पदके महिला खेळाडूंनीच जिंकली आहेत. यापूर्वी तिने 2017 मध्ये सुवर्ण (48 किलो गटात 194 किलो) आणि 2022 मध्ये रौप्य (200 किलो) पदक जिंकले होते.
हे देखील वाचा – मुहूर्त ठरला! ‘या’ तारखेला होणार नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन! गौतम अदानींची घोषणा