Vladimir Putin on India: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी रशियाकडून कच्चे तेलखरेदी करण्यावरून भारतावर दबाव आणण्याच्या अमेरिकेच्या प्रयत्नांवर जोरदार टीका केली आहे. एका बैठकीत बोलताना पुतिन यांनी स्पष्ट केले की, भारत अशा दबावापुढे कधीही झुकणार नाही किंवा कोणासमोर अपमान सहन करणार नाही.
त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे “संतुलित आणि हुशार ” नेते म्हणून कौतुक केले. तसेच, रशिया व भारत यांच्यातील संबंध ‘विशेष’ असल्याचे अधोरेखित केले.
कच्च्या तेलाची आयात केवळ ‘आर्थिक निर्णय’
पुतिन यांनी स्पष्ट केले की भारताने रशियाकडून केलेले कच्चे तेल आयात हे ‘पूर्णपणे आर्थिक गणित’ आहे, यात कोणताही राजकीय पैलू नाही.
पुतिन म्हणाले, “भारताने जर आमच्याकडून ऊर्जा पुरवठा थांबवला, तर त्यांना $9 ते $10 अब्ज इतके मोठे नुकसान सहन करावे लागेल. पण जर भारताने नकार दिला नाही आणि अमेरिकेने निर्बंध लादले, तर तोटा तितकाच होईल. त्यामुळे देशांतर्गत राजकीय नुकसान पत्करून भारत नकार का देईल?”
ते म्हणाले, अमेरिकेने भारतावर लादलेले जास्त कर रशियाकडून तेल आयात केल्याने संतुलित होतीलच, शिवाय यामुळे देशाला सार्वभौम राष्ट्र म्हणून जागतिक स्तरावर प्रतिष्ठा मिळेल.
मोदींचे केले कौतुक
पुतिन यांनी पंतप्रधान मोदींना आपला मित्र संबोधले. ते म्हणाले की, “मला माहित आहे की पंतप्रधान मोदी स्वतःहून असे कोणतेही पाऊल उचलणार नाहीत. भारत देशाचे लोक त्यांच्या राजकीय नेतृत्वाच्या निर्णयांवर बारकाईने लक्ष ठेवतात आणि ते कोणासमोरही अपमान कधीही सहन करणार नाहीत.”
रशिया आणि भारत यांच्यातील संबंध सोव्हिएत युनियनच्याकाळापासून, म्हणजे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यापासून खूप ‘विशेष’ राहिले आहेत. पुतिन यांनी या संबंधांची आठवण करून दिली. “भारतात या गोष्टी लक्षात ठेवल्या जातात, त्यांचे मूल्य जपले जाते. भारत हे विसरला नाही, याचे आम्हाला कौतुक आहे. भारत आणि रशिया यांच्यात आंतरराज्यीय तणाव किंवा समस्या कधीच नव्हत्या,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
हे देखील वाचा – मुहूर्त ठरला! ‘या’ तारखेला होणार नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन! गौतम अदानींची घोषणा