Cough Syrup Ban: मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात लहान मुलांच्या मृत्यूच्या धक्कादायक घटनेनंतर केंद्र सरकारने मोठी पाऊले उचलली आहेत. या घटना दूषित कफ सिरपशी जोडल्या जात असल्याच्या पार्श्वभूमीवर, आरोग्य सेवा महासंचालनालयाने देशभरातील डॉक्टरांसाठी आणि पालकांसाठी महत्त्वाचा सल्ला जारी केला आहे.
DGHS ने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना 2 वर्षांखालील मुलांना कफ आणि सर्दीची औषधे देऊ नयेत, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत.
कफ सिरप वापरण्याबद्दल केंद्राचे नवे नियम
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या DGHS ने लहान मुलांना कफ सिरप देण्याबाबत नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.
- 2 वर्षांखालील मुलांना बंदी: 2 वर्षांखालील मुलांना कफ आणि सर्दीची औषधे (कफ सिरप) लिहून देऊ नयेत किंवा विकू नयेत.
- 5 वर्षांखालील मुलांना शिफारस नाही: 5 वर्षांखालील मुलांना देखील ही औषधे सामान्यतः शिफारस केलेली नाहीत.
- 5 वर्षांवरील मुलांसाठी नियम: 5 वर्षांवरील मुलांना कफ सिरप देण्यापूर्वी डॉक्टरांनी काळजीपूर्वक वैद्यकीय तपासणी करावी. औषधाचे योग्य प्रमाण, प्रभावीपणे कमीत कमी कालावधी आणि अनेक औषधे एकत्र देणे टाळावे.
आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्यांच्या आरोग्य सेवा संचालकांना पत्र लिहून या सल्ल्याची अंमलबजावणी सरकारी दवाखाने, जिल्हा रुग्णालये आणि सर्व वैद्यकीय संस्थांमध्ये करण्याचे निर्देश दिले आहेत. बहुतेक लहान मुलांना होणारी तीव्र सर्दी-खोकल्याची समस्या उपचारांशिवाय आपोआप बरी होते, असेही मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
तपासणी अहवाल: सिरपमध्ये ‘विषारी’ रसायन नाही
मध्य प्रदेशच्या छिंदवाडा जिल्ह्यात अवघ्या पंधरवड्यात नऊ बालकांचा किडनी निकामी झाल्यामुळे मृत्यू झाल्यानंतर, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने या प्रकरणाची तातडीने चौकशी सुरू केली.
नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल (NCDC), नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (NIV) आणि केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्था (CDSCO) यांच्या प्रतिनिधींच्या संयुक्त पथकाने घटनास्थळी भेट देऊन कफ सिरपच्या विविध नमुन्यांची तपासणी केली.
तपासणी अहवालानुसार, या सिरपच्या कोणत्याही नमुन्यात गंभीर किडनीला नुकसान पोहोचवणारे विषारी रसायन डायथिलीन ग्लायकॉल (DEG) किंवा इथिलीन ग्लायकॉल आढळले नाही. मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, राजस्थानमधील दोन मुलांच्या मृत्यूशी संबंधित सिरपमध्ये देखील प्रोपीलीन ग्लायकॉल हे दूषिततेचे संभाव्य स्रोत असलेले रसायन नव्हते.
छिंदवाडा येथे मृत झालेल्या मुलांपैकी किमान 5जणांनी ‘कोल्ड्रेफ’ (Coldref) आणि एकाने ‘नेक्स्ट्रो’ Nextro सिरप घेतले होते.
हे देखील वाचा– ‘…तर पाकिस्तान जगाच्या नकाशावर दिसणार नाही’; लष्करप्रमुख जनरल द्विवेदी यांचा थेट इशारा