Home / महाराष्ट्र / Navi Mumbai Airport: नवी मुंबई विमानतळाला दिले जाणार ‘या’ लोकनेत्याचे नाव, PM मोदींनी प्रस्तावाला दिली मान्यता

Navi Mumbai Airport: नवी मुंबई विमानतळाला दिले जाणार ‘या’ लोकनेत्याचे नाव, PM मोदींनी प्रस्तावाला दिली मान्यता

Navi Mumbai Airport: लवकरच सुरू होणाऱ्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला (Navi Mumbai International Airport) लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव...

By: Team Navakal
Navi Mumbai Airport

Navi Mumbai Airport: लवकरच सुरू होणाऱ्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला (Navi Mumbai International Airport) लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव दिले जाणार आहे. या प्रस्तावास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे नवी मुंबईतील भूमिपुत्रांची अनेक दिवसांची आग्रही मागणी आता पूर्ण होणार आहे. पुढील आठवड्यात पंतप्रधान मोदींच्या हस्ते या विमानतळाचे उद्घाटन (8 ऑक्टोबर) होणार आहे. या पार्श्वभूमीवर नामकरणाचा तिढा सुटला आहे.

विमानतळाचा अधिकृत नामविस्तार आणि नामकरणाचे आश्वासन

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत या नामविस्ताराबद्दल स्पष्टीकरण दिले. नवी मुंबई विमानतळाला नाव देण्याबाबत राज्य सरकारचा आणि केंद्र सरकारचाही मानस बदललेला नाही. केंद्र सरकारने बांधकाम परवानगी देताना ‘नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ’ असे नाव दिले होते, पण आता नामविस्तार होऊन ते ‘लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ’ असे होईल, असे मुख्यमंत्र्यांनी ठामपणे सांगितले.

राज्य सरकारने पाठवलेल्या प्रस्तावानुसारच हे नामकरण करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नवीन मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे प्रत्यक्षात प्रवासी वाहतूक सुरू होईल, तेव्हा ‘लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ’ अशीच अधिकृत उद्घोषणा निश्चितपणे होईल, अशी त्यांनी ग्वाही दिली.

नामकरणातील तांत्रिक अडचणी

या नामकरणाचा ठराव यापूर्वीच राज्य मंत्रिमंडळाने आणि विधिमंडळाने संमत करून केंद्र सरकारकडे पाठवला आहे. केंद्र सरकारच्या स्तरावर अशा नामकरणासाठी निश्चित असे धोरण ठरवले जात आहे, ज्यामुळे निर्णयास थोडा वेळ लागत आहे. पण नवीन धोरणानुसार लवकरच नामकरण होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

सध्या विमानतळावर ‘ड्राय रन’ कालावधीत विमान प्रवाशांचे आगाऊ आरक्षण नोंदवणे आणि तांत्रिक बाबींची सज्जता अशा स्वरूपाची कार्यवाही सुरू आहे.

पुणे आणि छत्रपती संभाजीनगर विमानतळांसाठीही केंद्राकडे प्रस्ताव

याचबरोबर, मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील आणखी दोन प्रमुख विमानतळांच्या नामविस्तारांची माहिती दिली. पुणे येथील सध्याच्या विमानतळाला जगद्गुरू संत तुकाराम यांचे नाव देण्यासाठीचा प्रस्ताव आणि छत्रपती संभाजीनगर येथील विमानतळाला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला आहे.

हे तिन्ही प्रस्ताव केंद्र सरकारच्या विचाराधीन असून, राज्य सरकारच्या मागणीनुसार या नामविस्तारांनाही लवकरच मान्यता मिळणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

हे देखील वाचा11 बालकांच्या मृत्यूने केंद्र सरकार सतर्क; 2 वर्षांखालील मुलांना ‘कफ सिरप’ देण्यास बंदी

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या