AYUSH Ministry in Maharashtra: केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या (AYUSH Ministry) धर्तीवर महाराष्ट्रातही लवकरच स्वतंत्र आयुष मंत्रालय स्थापन करण्यात येणार आहे. त्यासाठी केंद्र सरकारकडून पाठपुरावा सुरू असल्याची माहिती केंद्रीय आयुष आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिली.
‘आयुष’च्या माध्यमातून निरोगी, सशक्त आणि विकसित भारताचे स्वप्न साकार होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
पुण्यातील कोरेगाव पार्क येथे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथी आणि केंद्रीय आयुष मंत्रालयाच्या सहकार्याने सुरू झालेल्या ‘सीएच-२ वर्ल्ड फाऊंडेशन’चे उद्घाटन करताना ते बोलत होते.
एकात्मिक उपचार पद्धती आणि पारंपारिक आरोग्यावर भर
मंत्री जाधव यांनी यावेळी नागरिकांच्या उत्तम आरोग्यासाठी आयुष मंत्रालय कसे कार्यरत आहे, यावर प्रकाश टाकला. देशभरात पारंपरिक उपचार पद्धतीचा प्रचार आणि प्रसार केला जात आहे. ते म्हणाले की, ॲलोपॅथी उपचारांची आवश्यकता असली तरी, पारंपरिक आयुर्वेदाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. सर्व वैद्यकीय शाखांनी एकत्र येऊन एकात्मिक उपचारपद्धती अवलंबणे काळाची गरज आहे.
जाधव यांनी स्पष्ट केले की, आयुष मंत्रालय आणि आरोग्य मंत्रालय हे दोन्ही विभाग एकमेकांना पूरक आहेत. सध्या जिल्हा रुग्णालयांपासून प्राथमिक आरोग्य केंद्रांपर्यंत सर्व ठिकाणी आयुषचे डॉक्टर उपलब्ध आहेत. असाध्य आजारांवरउपचारासाठी सर्व प्रकारच्या पॅथीच्या डॉक्टरांनी एकत्र येत चिंतन करणे आवश्यक आहे.
जीवनशैलीतील आजार आणि आयुषचे महत्त्व
सध्याच्या बदललेल्या जीवनशैलीमुळे वाढलेल्या लठ्ठपणाच्या समस्येकडेही मंत्री जाधव यांनी लक्ष वेधले. सर्वेक्षणानुसार, आहार, झोप आणि व्यायामाचे नियम न पाळल्यामुळे लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सुमारे 40 टक्के लोक लठ्ठपणाने त्रस्त आहेत.
लठ्ठपणामुळे मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार यांसारखे शारीरिक तसेच मानसिक आजारही जडतात. अशा प्रकारच्या जीवनशैलीतील आजारांवर पारंपरिक आयुष पद्धतीने प्रभावीपणे उपचार करणे शक्य आहे, असे त्यांनी सांगितले.
हे देखील वाचा– 11 बालकांच्या मृत्यूने केंद्र सरकार सतर्क; 2 वर्षांखालील मुलांना ‘कफ सिरप’ देण्यास बंदी