Home / महाराष्ट्र / Maharashtra News: महाराष्ट्रातील हॉटेल्स-रेस्टॉरंट्स आता 24 तास खुली राहणार; मात्र ‘या’ गोष्टींना परवानगी नाही

Maharashtra News: महाराष्ट्रातील हॉटेल्स-रेस्टॉरंट्स आता 24 तास खुली राहणार; मात्र ‘या’ गोष्टींना परवानगी नाही

महाराष्ट्र सरकारने राज्यातील व्यापार आणि व्यवसायाला चालना देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. 1 ऑक्टोबर 2025 रोजी जारी केलेल्या शासन...

By: Team Navakal
Maharashtra News

महाराष्ट्र सरकारने राज्यातील व्यापार आणि व्यवसायाला चालना देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. 1 ऑक्टोबर 2025 रोजी जारी केलेल्या शासन निर्णयानुसार (GR) राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, उपहारगृहे, चित्रपटगृहे आणि सार्वजनिक मनोरंजनाची ठिकाणे आता 24 तास खुली ठेवण्यास सरकारने परवानगी दिली आहे.

या निर्णयामुळे उद्योग जगताला मोठा दिलासा मिळाला असून, पर्यटन आणि रोजगाराला चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

दारू विक्रीच्या आस्थापनांना 24 तास परवानगी नाही

या जीआरमध्ये सरकारने स्पष्ट केले आहे की, हा नियम दारू विक्री किंवा पुरवठा करणाऱ्या आस्थापनांना लागू होणार नाही. यामध्ये वाईन शॉप्स, बीअर बार्स, डान्स बार्स, हुक्का पार्लर्स, डिस्कोथेक्स आणि परमिट रूम्स यांचा समावेश आहे. या आस्थापनांना 24 तास सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आलेली नाही.

कर्मचारी आणि कामाच्या वेळेचे नियम:

  • सर्व दुकाने आणि व्यापारी आस्थापनांना आठवड्यातील सातही दिवस उघडे ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे.
  • मात्र, प्रत्येक कर्मचाऱ्याला आठवड्यातून किमान 24 तास सलग विश्रांती देणे बंधनकारक असेल.
  • या आस्थापनांच्या कामाच्या वेळेचे नियम पूर्वीप्रमाणेच मर्यादित राहतील.
  • स्थानिक प्रशासन आणि पोलीस विभागांना या नियमांची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

याआधी 2017 च्या अधिसूचनेनुसार डान्स बार, परमिट रूम, बिअर बार, हुक्का पार्लर, डिस्कोथेक्स आणि मद्य विक्री करणारी दुकाने उघडण्याच्या आणि बंद करण्याच्या वेळा निश्चित करण्यात आल्या होत्या. 2020 च्या सुधारित अधिसूचनेने थिएटर आणि सिनेमागृहांना यातून वगळण्यात आले, पण मद्यविक्री संबंधित आस्थापनांवरील वेळेचे बंधन कायम ठेवण्यात आले होते. तेच निर्बंध पुढेही कायम ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे ही आस्थापने 24 तास सुरू ठेवता येणार नाहीत.

आदित्य ठाकरेंकडून ‘महायुती’ सरकारवर टीका

या निर्णयावरून शिवसेना (UBT) नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी ‘महायुती’ सरकारवर टीका केली आहे. जानेवारी 2020 मध्ये ‘मुंबई 24/7’ ही योजना लागू असताना, याच भाजप नेत्यांनी ‘संस्कृती आणि सुरक्षिततेच्या’ नावाखाली विरोध केला होता, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

“ज्या भाजपने माझ्या ‘मुंबई 24/7’ धोरणावर ‘संस्कृती आणि सुरक्षिततेच्या’ मुद्द्यावरून टीका केली, त्याच धोरणाचा जीआर त्यांनी पुन्हा जारी केलेला पाहून मला आश्चर्य वाटले. मी त्यांना तेव्हाही विचारले होते आणि आजही विचारतो की, कष्ट करणाऱ्या शहराला रात्री उशिरापर्यंत खाण्याची आणि आराम करण्याची मुभा देण्यात संस्कृतीच्या विरोधात काय आहे? मुंबई एक कष्टकरी शहर आहे जे 24/7 काम करते,” असे ते म्हणाले.

हे देखील वाचा –  महाराष्ट्रात ई-बाँड प्रणाली लागू; आयात-निर्यात व्यवहारांसाठी पेपर बाँड्सचा वापर थांबणार, व्यापाराला गती

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या