Protests in Morocco –नेपाळमध्ये झालेल्या जेन-झी आंदोलनाप्रमाणेच मोरोक्को या देशातही सरकारविरोधात गेले नऊ दिवस देशभरात आंदोलन सुरू आहे. हजारोंच्या संख्येने तरुण रस्त्यावर उतरून निदर्शने करीत आहेत. या आंदोलनात आतापर्यंत 3 जणांचा बळी गेला असून, हजारहून अधिक लोकांना अटक करण्यात आली आहे. ‘जेन झी 212’ असे या आंदोलनाला म्हटले जात आहे.
देशात प्रचंड वाढलेली बेरोजगारी, ढासळलेली शिक्षण व्यवस्था, सरकारी रुग्णालयांमधील अनागोंदी आणि आरोग्य सेवेच्या विरोधात सर्वसामान्य जनतेमध्ये आणि रसातळाला चाललेली अर्थव्यवस्था आदी मुद्यांवरून तरुणाईमध्ये तसेच सर्वसामान्य लोकांमध्ये तीव्र असंतोष खदखदत आहे. अशा परिस्थितीत सरकार आगामी 2030 साली होणाऱ्या फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात गुंतले आहे, हे जनतेच्या रोषाचे मुख्य कारण ठरले आहे. या स्पर्धेचे यजमानपद भूषवण्याचा मान मोरोक्को, पोर्तुगाल आणि स्पेन या तीन देशांना मिळाला आहे.
नेपाळमध्ये अशाच स्वरुपाच्या मुद्यांवरून जेन झी आंदोलन झाले. त्यामुळे सत्ताधाऱ्यांना पायउतार व्हावे लागले. नेपाळमधील या आंदोलनापासून प्रेरणा घेत मोरोक्कोमध्ये 27 सप्टेंबरपासून तरुणांनी सरकारविरोधात एल्गार पुकारला. जागोजागी आंदोलक आणि पोलीस यांच्या झटापटी होत आहेत. त्यामध्ये आतापर्यंत 3 जणांचा बळी गेला आहे. तर सुमारे एक हजारहून अधिक निदर्शकांना अटक करण्यात आली आहे.
जेन-झी 212 नामक एका ऑनलाईन गटाकडून हे आंदोलन चालविले जात आहे. त्यासाठी टिकटॉक, इन्स्टाग्राम आणि गेमिंग ॲप्लिकेशनसह अन्य समाज माध्यमांचा वापर केला जात आहे. जेन-झी हे नेपाळच्या जेन झीचे मोरोक्कन रुप आहे. तर 212 हा मोरोक्कोचा आंतरराष्ट्रीय दूरध्वनी सेवेसाठी कंट्री कोड आहे.
हे देखील वाचा –