Russia – Ukraine War: मागील जवळपास 3 वर्षांपासून रशिया-युक्रेन युद्ध सुरू आहे. या युद्धात अनेक भारतीय तरूण देखील रशियाकडून युद्धभूमीत उतरल्याचे वृत्त अनेकदा समोर आले आहे. आता रशियन सैन्याच्या बाजूने युक्रेनविरुद्धच्या युद्धात भाग घेतलेल्या एका 22 वर्षीय भारतीय तरुणाला युक्रेनच्या सैन्याने पकडले आहे.
युक्रेनच्या लष्कराच्या 63 व्या मेकॅनाइज्ड ब्रिगेडने याबाबत दावा केला आहे. हा तरुण गुजरातमधील मोरबी येथील रहिवासी असून त्याचे नाव मजोती साहिल मोहम्मद हुसेन आहे.
तुरुंगातून सुटकेसाठी रशियन सैन्यात भरती
रिपोर्टनुसार, किव्ह येथील भारतीय दूतावास या माहितीची सत्यता पडताळून पाहत आहे. दरम्यान, युक्रेनियन सैन्याने हुसेनचा एक व्हिडिओ जारी केला आहे.
व्हिडिओमध्ये हुसेन रशियन भाषेत बोलताना दिसतो. तो सांगतो की, शिक्षणासाठी रशियाला गेल्यानंतर त्याला अमली पदार्थांशी संबंधित आरोपांखाली सात वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. तुरुंगातून सुटका व्हावी, यासाठी त्याला रशियन सैन्यासोबत ‘विशेष लष्करी ऑपरेशनमध्ये सहभागी होण्याचा करार करण्याची संधी देण्यात आली.
“मला तुरुंगात राहायचे नव्हते, म्हणून मी लष्करी कारवाईसाठी करार केला. पण मला तिथून बाहेर पडायचे होते,” असे त्याने सांगितले.
Ukrainian soldiers captured an Indian national. Majoti Sahil Mohamed Hussein, a 22-year-old citizen of India, spent only three days on the front line. He said he came to Russia to study but was caught with drugs and sentenced to seven years in prison. Immediately after that, he… pic.twitter.com/HtYYkXUzzi
— WarTranslated (@wartranslated) October 7, 2025
प्रशिक्षणानंतर लगेचच युक्रेनियन सैन्याला शरण
व्हिडिओतील माहितीनुसार, हुसेनला 16 दिवसांच्या प्रशिक्षणानंतर 1 ऑक्टोबर रोजी पहिल्या युद्ध मोहिमेवर पाठवण्यात आले. तीन दिवस लढल्यानंतर कमांडिंग ऑफिसरशी झालेल्या वादामुळे त्याने युक्रेनच्या 63 व्या मेकॅनाइज्ड ब्रिगेडच्या सैन्यासमोर आत्मसमर्पण केले.
हुसेन पुढे म्हणाला, “मी सुमारे 2-3 किलोमीटर दूर असलेल्या युक्रेनियन सैन्याच्या बंकरजवळ पोहोचलो. मी लगेच माझी रायफल खाली ठेवली आणि मला लढायचे नाही, मला मदत हवी आहे, असे सांगितले. मला रशियामध्ये परत जायचे नाही, तिथे कोणतेही सत्य नाही. त्याऐवजी मी युक्रेनमध्येतुरुंगात जाईन.”
हुसेनने रशियन सैन्यात भरती होताना आर्थिक मोबदला देण्याचे आश्वासन देण्यात आले होते, परंतु ते कधीच मिळाले नाही, असा दावाही केला आहे.
परराष्ट्र मंत्रालयाचे आवाहन आणि मोदींची भूमिका
यापूर्वीही नोकरी आणि आकर्षक संधींच्या आमिषाने भारतासह अनेक देशांतील नागरिकांना रशियामध्ये बोलावून त्यांना बळजबरीने सैन्यात भरती केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. जानेवारी महिन्यात सरकारने अशा भारतीयांची संख्या 126 असल्याचे सांगितले होते. त्यापैकी 96 जण मायदेशी परतले, तर किमान 12 जणांचा मृत्यू झाला होता आणि 16 जण बेपत्ता होते.
26 सप्टेंबर रोजी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितले होते की, रशियन सैन्यात आणखी 27 भारतीय नागरिक नव्याने भरती झाल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांमार्फत मिळाली आहे.
“आम्ही मॉस्कोतील अधिकाऱ्यांशी याबद्दल चर्चा केली असून, आमच्या नागरिकांना लवकर सोडवून भारतात परत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. नागरिकांनी अशा आमिषांना बळी पडू नये,” असे आवाहन जयस्वाल यांनी केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासोबतच्या भेटीदरम्यान भारतीयांच्या या मुद्द्यावर चर्चा केली होती.
हे देखील वाचा – रणजी सराव सामन्यात पृथ्वी शॉचा ‘हिट शो’! 181 धावांवर बाद होताच जुन्या सहकाऱ्यावर बॅट घेऊन धावला; पाहा व्हिडिओ