Ambedkar Statue Ready by 2026 – इंदू मिलमधील स्मारकात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या उभारणीची प्रक्रिया आता सुरू झाली आहे. हा पुतळा पुढील वर्षी डिसेंबरपर्यंत उभारून तयार होईल, असे राज्य सरकारने सांगितले आहे.
या पुतळ्याच्या बुटाच्या दर्शनी भागाचे आज येथे आगमन झाले.या बुटाच्या दर्शनी भागाला फूल वाहून व मेणबत्ती प्रज्वलित करून आज पूजन करण्यात आले. याप्रसंगी राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, डॉ. आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर, सामाजिक न्याय विभागाचे सचिव हर्षदीप कांबळे यांनी या बुटाला अभिवादन केले.
रिपब्लिकन सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.या स्मारकाच्या कामाच्या प्रगतीचा आढावा यावेळी मंत्री संजय शिरसाट यांनी घेतला. या बैठकीनंतर दै ‘नवाकाळ’शी बोलताना त्यांनी सांगितले की, पुतळा उभारण्याचे काम पुढील वर्षी डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल. त्यामुळे पुढील वर्षी 6 डिसेंबर या बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनी आंबेडकरी अनुयायांना त्यांच्या 350 फुटी पुतळ्याला अभिवादन करता येण्याची शक्यता आहे. हा पुतळा जगातील सर्वात उंच पुतळा आहे.

या पुतळ्याच्या रचनेप्रमाणे पुतळ्याचे हात 10 ते 12 मजली असतील. यावरून पुतळा किती भव्य असेल याचा अंदाज येऊ शकतो, असेही त्यांनी सांगितले.पुतळ्याचे बूट सुमारे अडीच टन वजनाचे आहेत. दिल्लीजवळील गाझियाबाद येथून टप्प्याटप्प्याने पुतळ्याचे भाग आणले जातील व त्यानंतर स्मारक स्थळी त्यांना जोडण्यात येईल.
या पुतळ्याचे वजन सुमारे दीड हजार टन असेल.पुतळ्यात दोष नाहीपुतळ्यात दोष आहे हा दावा आनंदराज आंबेडकर यांनी दै. ‘नवाकाळ’शी बोलताना खोडून काढला. ते म्हणाले की, जे जे स्कूल ऑफ आर्टमधील तज्ज्ञांसह अनेक जाणकारांचा समावेश असलेल्या समितीने प्रतिकृतीला मान्यता दिली आहे. हा माझ्या एकट्याचा निर्णय नाही.
जे लोक आक्षेप घेताहेत ते बाबासाहेबांना भेटलेत का? त्यांनी त्यांना जवळून पाहिले का? पुतळा पूर्ण झाल्यानंतर तो बाबासाहेबांसारखा दिसेल. पुतळ्यात दोष असल्याचा दावा या प्रकल्पाचे वास्तुरचनाकार शशि प्रभू यांनीही दै. ‘नवाकाळ’शी बोलताना खोडून काढला. एखाद्या उंच व्यक्तीचा चेहरा तुम्ही खालून बघता तेव्हा वेगळा दिसतो आणि त्याच्या उंचीच्या पातळीवर (आय लेव्हलवर) जाऊन बघतो तेव्हा तो वेगळा दिसतो. लोकांना पुतळा व्यवस्थित पाहता यावा म्हणून आम्ही एक उंच जागी पाईंट ऑफ व्ह्यू उभारणार आहोत, असे प्रभू म्हणाले.
हे देखील वाचा –
एअर इंडियाच्या विमानाला धडकला पक्षी ! १५८ प्रवासी बचावले..
देवीच्या मिरवणुकीत पुन्हा एकदा राडा! जळगावात देवीच्या विसर्जना दरम्यान १३ जण जखमी