IAS Sanskriti Jain Farewell: मध्य प्रदेशातील सिवनी (Seoni) जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या आयएएस अधिकारी संस्कृती जैन (IAS Sanskriti Jain) या सध्या चर्चेत आहेत. त्यांची बदली झाल्यानंतर कर्मचाऱ्यांनी ज्या प्रकारे त्यांना निरोप दिला, त्याची जोरदार चर्चा रंगली आहे.
संस्कृती जैन यांना त्यांच्या कर्मचारी, सहकाऱ्यांनी अत्यंत अविस्मरणीय आणि ‘शाही’ पद्धतीने निरोप दिला. सिवनीहून भोपाळ येथे बदली झाल्यामुळे हा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. या समारंभात संस्कृती जैन यांना त्यांच्या दोन लहान मुलींसह सोन्याच्या रंगाच्या पालखीतून (Golden Palanquin) मिरवणूक काढून निरोप देण्यात आला.
सिवनीनंतर भोपाळमध्ये मोठी जबाबदारी
जिल्ह्याच्या नवीन जिल्हाधिकारी शीतला पाटले ( यांचे स्वागत करण्यासाठी आणि संस्कृती जैन यांना निरोप देण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ऑनलाइन व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये 2015 बॅचच्या या आयएएस अधिकारी त्यांच्या सहकाऱ्यांच्या खांद्यावर असलेल्या पालखीत बसलेल्या दिसत आहेत.
सिवनीच्या जिल्हाधिकारी पदावरून संस्कृती जैन यांची आता भोपाळ महानगरपालिकेच्या आयुक्तपदी बदली झाली आहे. यासोबतच त्यांच्याकडे मध्य प्रदेश मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या अतिरिक्त व्यवस्थापकीय संचालक पदाचा अतिरिक्त कार्यभारही सोपवण्यात आला आहे.
कोण आहेत आयएएस संस्कृती जैन?
14 फेब्रुवारी 1989 रोजी श्रीनगर येथे जन्मलेल्या संस्कृती जैन यांचे पालक भारतीय वायुसेवेत कार्यरत होते. त्यांचे वडील फायटर पायलट आणि आई वैद्यकीय विभागात होत्या. त्यांच्या बदलीमुळे संस्कृतीने देशभरातील सहा वेगवेगळ्या शाळांमध्ये शिक्षण घेतले.
त्यांनी BITS पिलानी (गोवा कॅम्पस) येथून पदवी प्राप्त केली आणि LAMP फेलोशिपमध्येही भाग घेतला होता. सुरुवातीला पीएचडी करण्याची इच्छा असलेल्या संस्कृतीने एका मित्राच्या सल्ल्यावरून यूपीएससी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे, त्यांनी पहिल्याच प्रयत्नात परीक्षा उत्तीर्ण करून त्या आयआरएस अधिकारी (IRS Officer) बनल्या.
दुसऱ्या प्रयत्नात त्यांनी 2014 च्या नागरी सेवा परीक्षेत अखिल भारतीय रँक 11 मिळवून आयएएस बनण्याचे आपले स्वप्न पूर्ण केले. विशेष म्हणजे, त्यांनी 2014 मध्ये वैकल्पिक विषय म्हणून निवडलेल्या फिलॉसॉफीमध्येसर्वाधिक गुण मिळवले होते.
मध्य प्रदेश कॅडरच्या या अधिकारी म्हणून त्यांनी यापूर्वी रेवा महानगरपालिकेच्या आयुक्त, सतना येथे अतिरिक्त जिल्हाधिकारी, मऊगंजच्या SDM आणि अलीराजपूर आणि नर्मदापुरममध्ये जिल्हा पंचायतीच्या सीईओ (CEO) अशा विविध महत्त्वाच्या प्रशासकीय जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत.
हे देखील वाचा – पुणेकरांनो लक्ष द्या! दिवाळीत फटाके वाजवण्यासाठी कडक नियम; उल्लंघन केल्यास होणार कारवाई