UK Aadhaar Digital ID: ब्रिटनचे पंतप्रधान केअर स्टारमर (Keir Starmer) यांनी नुकताच भारत दौरा केला. व्यापार (Trade) करारांवर चर्चा करण्यासाठी ते नवी दिल्लीत आले असताना, त्यांनी मुंबईत इन्फोसिसचे सह-संस्थापक नंदन नीलेकणी (Nandan Nilekani) यांची भेट घेतली.
नीलेकणी हे भारताच्या ‘आधार’ (Aadhaar Card) या डिजिटल ओळख प्रोग्रामचे (Unique Digital ID Programme) प्रमुख शिल्पकार मानले जातात. ब्रिटन देखील अशाच प्रकारचे ओळखपत्र त्यांच्या देशात अनिवार्य करण्याचा विचार करत आहे.
UK च्या पंतप्रधानांनी नीलेकणींकडून आधारसारखी प्रणाली ब्रिटनमध्ये लागू करण्यासाठी मार्गदर्शन मागितले आहे. नंदन नीलेकणी यांना 2009 मध्ये आधारच्या यशस्वी लॉन्चिंगचे श्रेय दिले जाते. ही प्रणाली आता जवळपास सर्व भारतीयांसाठी आवश्यक ओळख बनली आहे.
ब्रिटनला आधार कार्डाची गरज का?
रिपोर्टनुसार, पंतप्रधान केअर स्टारमर यांचे प्रवक्ते डेव्ह पारेस म्हणाले की, “स्टारमर यांना नीलेकणींकडून आधारबद्दल जाणून घ्यायचे होते. ब्रिटन सरकारही आपल्या देशात अशाच प्रकारची ओळखपत्र योजना सुरू करू इच्छित आहे.
केअर स्टारमर यांनी स्पष्ट केले की, ते प्रस्तावित करत असलेली स्मार्टफोन-आधारित ओळखपत्र (Smartphone-based ID) प्रणाली सुरू करण्याचा मुख्य उद्देश बेकायदेशीरपणे काम करण्यासाठी ब्रिटनमध्ये येणाऱ्या लोकांना रोखणे हा आहे.
स्टारमर म्हणाले की, स्थलांतरितांना कामाचा अधिकार सिद्ध करण्यासाठी आधारप्रमाणेच डिजिटल ओळखपत्र दाखवणे अनिवार्य होईल.
त्यांनी पुढे सांगितले की, ही प्रणाली इतर नागरिकांसाठीही ‘चांगला पासपोर्ट’ ठरू शकते. अनेकदा लोकांना मुलांच्या शाळा प्रवेशासाठी किंवा इतर अर्जांसाठी आपली ओळख सिद्ध करण्यासाठी अनेक कागदपत्रे (उदा. बिलांचे पुरावे) शोधावी लागतात. डिजिटल ओळखपत्रामुळे ही प्रक्रिया अत्यंत सोपी होईल आणि देशाला महत्त्वपूर्ण फायदा मिळेल.
आधार आणि यूकेच्या प्रस्तावात नेमका फरक
भारतात आधारचा वापर खूप व्यापक आहे, जिथे लोकांचा बायोमेट्रिक डेटा UIDAI द्वारे संग्रहित केला जातो. मात्र, ब्रिटन या संपूर्ण प्रणालीची कॉपी न करता, आधारची अंमलबजावणी आणि वापरण्याची पद्धत (Method of Use) तपासण्याचा प्रयत्न करत आहे.
ब्रिटनमध्ये अशा प्रकारच्या राष्ट्रीय ओळखपत्राच्या कल्पनेला राजकीय आणि सार्वजनिक स्तरावर नेहमीच विरोध राहिला आहे, कारण यामुळे सरकारला नागरिकांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवता येईल आणि त्यांच्या डेटाचा गैरवापर होऊ शकेल, अशी भीती व्यक्त केली जाते.
हे देखील वाचा – नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिली फ्लाईट कधी टेक ऑफ करणार? जाणून घ्या