UK Universities – पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi)आणि ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर (UK Prime Minister Keir Starmer)यांची आज राजभवन येथे उच्चस्तरीय बैठक पार पडली.बैठकीत उभय देशांदरम्यान जुलै महिन्यात झालेल्या मुक्त व्यापार कराराच्या अनुषंगाने तंत्रज्ञान,सर्जशीलता,दूरसंचार, कृत्रिम बुद्धिमत्ता,दुर्मिळ खनिजे,संरक्षण आणि शिक्षण आदि क्षेत्रांमध्ये सहकार्यावर चर्चा झाली.महत्वाचे म्हणजे ब्रिटनमधील नऊ नामवंत विद्यापीठे भारतात आपल्या शाखा सुरू करतील असे या बैठकीत निश्चित करण्यात आले.
बैठकीनंतर आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत मोदी म्हणाले की, भारत आणि ब्रिटन यांच्यातील भागीदारी ही विश्वासार्हता,कौशल्य आणि तंत्रज्ञान या त्रिसुत्रीवर आधारित आहे.गतिशीलता आणि ब्रिटनची कुशलता यांचा आदर्श समन्वय झाला आहे.
मोदी यांनी उभय देशांदरम्यान जुलै महिन्यात झालेल्या सर्वंकष आर्थिक आणि व्यापार कराराचे (Comprehensive Economic and Trade Agreement) महत्व याप्रसंगी अधोरेखित केले.कराराचा ऐतिहासिक असा उल्लेख करत मोदी म्हणाले की, या ऐतिहासिक करारामुळे उभय देशांची आयात कमी खर्चिक होईल.तरुणांसाठी नवे रोजगार उपलब्ध होतील, द्वीपक्षीय व्यापार वाढेल आणि त्याचा लाभ भारतीय उद्योग आणि ग्राहकांना होईल.
बैठकीनंतर उभय नेत्यांच्या वतीने एक संयु्क्त निवेदन जारी करण्यात आले.या निवेदनात गेल्या एप्रिल महिन्यात जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात आला.आंतरराष्ट्रीय स्तरावर दहशतवादी घोषित करण्यात आलेल्या संघटना आणि त्यांना पडद्याआडून रसद पुरवणाऱ्यांविरुध्द निर्णायक आणि ठोस पावले उचलण्यावर उभय नेत्यांमध्ये सहमती झाली,असे निवेदनात म्हटले आहे.
या बैठकीनंतर एक्स पोस्टवर मोदी म्हणाले की, ब्रिटनचे पंतप्रधान स्टार्मर यांच्यासोबत शिक्षण क्षेत्रातील आतापर्यंतचे सर्वात प्रभावशाली प्रतिनिधी मंडळ आले आहे.आनंदाची गोष्ट म्हणजे ब्रिटनची नऊ विद्यापीठे भारतात आपल्या शाखा सुरू करणार आहेत.साऊदम्पटन विद्यापीठाच्या गुरुग्राम (University of Southampton’s Gurugram)शाखेचे काही दिवसांपूर्वी उद्घाटन झाले असून विद्यार्थ्यांच्या पहिल्या तुकडीने या विद्यापीठात प्रवेशही घेतला आहे.
हे देखील वाचा –
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन!आता वाढवण बंदराकडे पंतप्रधानांचे लक्ष
डोनाल्ड ट्रम्प यांना खरचं नोबेल शांतता पुरस्कार मिळणार का?
हिजाबवरून दीपिकाला केलं ट्रॉल; हिजाब परिधानकरून दीपिकाच जाहिरात शूट