Nobel Peace Prize 2025: व्हेनेझुएला (Venezuela) येथील विरोधी पक्षनेत्या मारिया कोरिना मचाडो (Maria Corina Machado) यांना 2025 चा नोबेल शांतता पुरस्कार (Nobel Peace Prize) जाहीर करण्यात आला आहे. व्हेनेझुएलामध्ये लोकशाही अधिकारांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि देशातील हुकूमशाहीतून शांततापूर्ण मार्गाने बदलासाठी त्यांनी केलेल्या अथक कार्याबद्दल त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे.
नोबेल समितीने गौरव केला
‘आयर्न लेडी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मारिया मचाडो यांना व्हेनेझुएलामध्ये लोकशाही पुढे नेण्यासाठी केलेल्या प्रयत्नांसाठी हा पुरस्कार देण्यात आल्याचे नोबेल समितीने स्पष्ट केले. टाईम मासिकाच्या ‘2025 च्या 100 सर्वात प्रभावशाली व्यक्ती’ (100 Most Influential People of 2025) मध्येही त्यांचा समावेश करण्यात आला होता.
कोण आहेत मारिया कोरिना मचाडो?
1967 मध्ये जन्मलेल्या मारिया मचाडो यांनी अभियांत्रिकी आणि वित्त क्षेत्रात शिक्षण घेतले. 2002 मध्ये त्यांनी व्हेनेझुएलामध्ये मुक्त आणि निष्पक्ष निवडणुकांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘सुमाटे’ (Sumate) या संस्थेची सह-स्थापना केली.
2010 मध्ये त्या विक्रमी मतांनी नॅशनल असेंब्लीवर निवडून गेल्या. संसदीय सदस्य असताना त्यांनी निकोलस मादुरो (Nicolas Maduro) राजवटीच्या संस्थात्मक गैरवापर, आर्थिक गैरव्यवस्थापन आणि मानवाधिकार उल्लंघनावर कठोर टीका केली.
त्यांनी 2013 मध्ये ‘वेंते व्हेनेझुएला’ (Vente Venezuela) या लिबरल विरोधी पक्षाची सह-स्थापना केली आणि 2017 मध्ये त्यांनी विविध लोकशाही समर्थक गटांना एकत्र आणणाऱ्या ‘सोय व्हेनेझुएला’ (Soy Venezuela) आघाडीची स्थापना केली.
सध्या भूमिगत
2024 च्या वादग्रस्त अध्यक्षीय निवडणुकीत मचाडो यांना निवडणुकीत उभे राहण्यापासून रोखण्यात आले होते. या निवडणुकीला आंतरराष्ट्रीय निरीक्षकांनी फसवणूक असल्याचे म्हटले आहे. 14 महिन्यांहून अधिक काळ त्या राष्ट्राध्यक्ष मादुरो यांच्या राजवटीच्या धमक्या आणि दडपणामुळे भूमिगत आहेत. देशद्रोह आणि कटाचे आरोप त्यांच्यावर लावण्यात आले होते.
नोबेल पुरस्काराचा मान
मारिया मचाडो यांची निवड नोबेल शांतता पुरस्कारासाठी 338 उमेदवारांमधून (ज्यात 244 व्यक्ती आणि 94 संस्था होत्या) करण्यात आली आहे. या पुरस्काराची रक्कम 11 दशलक्ष स्वीडिश क्राऊन्स इतकी आहे. अल्फ्रेड नोबेल यांच्या पुण्यतिथीदिनी म्हणजेच 10 डिसेंबर रोजी ओस्लो येथे हा पुरस्कार प्रदान केला जाईल.
हे देखील वाचा – Maria Corina Machado: ट्रम्पचे स्वप्न भंगले! शांततेचा नोबेल मारिया कोरिना मचाडो यांना जाहीर