Navi Mumbai Airport Naming Row: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतेच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे (Navi Mumbai International Airport) उद्घाटन पार पडले. या उद्घाटनावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते.
मात्र, भूमिपुत्रांचे नेते माजी खासदार दि. बा. पाटील यांच्या नावाची घोषणा न केल्याने स्थानिक नागरिक आणि सरकारमध्ये पुन्हा एकदा संघर्ष पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आता विमानतळाच्या नावाबाबत अजित पवार यांनी महत्त्वाचे विधान केले आहे.
भूमिपुत्रांचा तीव्र संताप
नवी मुंबई, पनवेलसह रायगड, ठाणे, मुंबई आणि पालघरमधील भूमिपुत्रांकडून सातत्याने या विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी केली जात आहे. पंतप्रधानांच्या भाषणात दि. बा. पाटलांच्या नावाचा उल्लेखही न झाल्याने भूमिपुत्रांमध्ये प्रचंड नाराजी आणि संताप पसरला आहे.
अजित पवारांचे महत्त्वाचे विधान
या वादावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केले आहे. नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटलांचे नाव देणार की ते बदलणार, या प्रश्नावर अजित पवार म्हणाले, “अजून या विमानतळावरून विमानांची उड्डाणे सुरू झालेली नाहीत. थोडं थांबा, लोकांच्या भावना लक्षात घेऊन आणि जनतेच्या बहुमताचा विचार करून सरकार योग्य ती कार्यवाही करेल.”
नावाच्या संदर्भात स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेगवेगळ्या शिष्टमंडळांशी चर्चा केली आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
45 दिवसांत उड्डाणे सुरू होणार
नवी मुंबई विमानतळावरून विमानांच्या उड्डाणास अद्याप साधारण 45 दिवस बाकी आहेत. या विमानतळावरून दरवर्षी 9 कोटी प्रवासी प्रवास करतील अशी क्षमता आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील वाढलेला ताण कमी करण्यासाठी या विमानतळाची गरज होती.
वाढवण विमानतळाचा उल्लेख
अजित पवार यांनी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री के. राम मोहन नायडू यांच्यासमोर वाढवण येथील विमानतळाचा विषय काढल्याचे सांगितले. वाढवण बंदर बांधायला चार-पाच वर्षे लागतील, तसेच तिथले विमानतळ बांधायला देखील चार-पाच वर्षे लागतील. मुंबईसारखेच एक शहर तिथे उभे करायचे आहे, असे त्यांनी नमूद केले.
‘मोदीं’च्या नावाची चर्चा
याचदरम्यान शिवसेनेचे (खासदार) संजय राऊत यांनी असा दावा केला आहे की, विमानतळ बांधणाऱ्या अदानी समूहाने या विमानतळाला थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव देण्याची शिफारस केली आहे, ज्यामुळे हा वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे.
हे देखील वाचा – ‘भारतात मुस्लिमांची लोकसंख्या वाढण्याचे मुख्य कारण…’; अमित शाह यांचा मोठा दावा