Trade war- दुर्मीळ खनिजांच्या आणि अन्य मालाच्या निर्यातीवर चीनने लागू केलेल्या निर्बंधांना प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आता चिनी मालाच्या आयातीवर अतिरिक्त शंभर टक्के आयात शुल्क लावण्याची घोषणा केली आहे. त्याचबरोबर चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्याशी होणारी शिखर परिषद रद्द करण्याचीही घोषणा ट्रम्प यांनी केली.ट्रम्प यांनी लागू केलेल्या या अतिरिक्त शुल्कामुळे आता अमेरिकेत चिनी मालावर एकूण 130 टक्के एवढे अवाढव्य आयात शुल्क लागणार आहे. ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे मागील काही महिन्यांच्या शांततेनंतर पुन्हा एकदा अमेरिका आणि चीनमध्ये व्यापार युद्धाचा (Trade war) भडका उडाला आहे.
ट्रम्प यांनी ट्रूथ सोशल या सोशल मीडियावर याबाबत घोषणा केली. चीनने जगभरातील देशांना पत्र पाठवले असून 1 नोव्हेंबर 2025 पासून दुर्मीळ खनिजांसह चीनमध्ये उत्पादित होणार्या आणि अन्य देशांमधून चीनमध्ये येणार्या मालाच्या निर्यातीवर कठोर निर्बंध लागू करण्याचा इशारा दिला आहे. याचा संपूर्ण जगाला फटका बसणार आहे. चीनचे हे कृत्य अति आक्रमकपणाचे आहे. जगाला वेठीस धरण्याची चीनी राज्यकर्त्यांची ही फार पूर्वीपासूनची कुटिल योजना आहे. आंतरराष्ट्रीय व्यापार क्षेत्रात अशा प्रकारचा अति आक्रमकपणा यापूर्वी कधीच पाहिला नव्हता. चीनचे हे कृत्य नैतिकतेला धरून नाही,अशा शब्दात ट्रम्प यांनी चीनवर टीका करून चीनच्या या आक्रमकतेला उत्तर म्हणून ट्रम्प यांनी वाढीव कर लादला.
ट्रम्प आपल्या पोस्टमध्ये म्हणाले की, 1 नोव्हेंबर 2025 पासून (किंवा चीनने आणखी कुरापती काढल्यास त्यापूर्वीच) चीनी आयातीवर आधी लागू असलेल्या आयात शुल्काच्या वर 100 टक्के आयात शुल्क लागू केले जाईल. अमेरिकेतून चीनमध्ये होणार्या एखाद्या किंवा सर्व महत्वाच्या सॉफ्टवेअरच्या निर्यातीवर कठोर निर्बंध लागू केले जातील.चीनवर अतिरिक्त आयात शुल्क लागू करण्याचा निर्णय हा देशहिताच्या रक्षणासाठी घेण्यात आला असून चीनव्यतिरिक्त अन्य कोणत्याही देशाला या धोरणाचा काहीही फटका बसणार नाही, असेही ट्रम्प यांनी पोस्टमध्ये स्पष्ट केले.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे दुसर्यांदा हाती घेतल्यापासून ट्रम्प यांनी अनेक धडाकेबाज निर्णय घेतले. त्यापैकी जगभरातील देशांवर जशास तसे आयात शुल्क लागू करण्याचा निर्णय सर्वात महत्वपूर्ण ठरला. 2 एप्रिलच्या मध्यरात्री जगाला मोठा धक्का देत ट्रम्प यांनी रेसिप्रोकल टॅरीफची घोषणा केली. त्यानुसार चीनसह जगभरातील सर्व देशांच्या आयातीवर ट्रम्प यांनी अवाढव्य कर लागू केले. चीन वगळता अनेक देशांनी आयात शुल्क कमी करण्यासाठी ट्रम्प यांच्या विनवण्या केल्या. त्यानंतर ट्रम्प यांनी आपल्या निर्णयाला काही काळ स्थगिती दिली. मात्र एकट्या चीनने अमेरिकेला जशास तसे प्रत्युत्तर देत अमेरिकेच्या आयातीवर वाढीव आयात शुल्क लागू केले. त्यामुळे जगातील या दोन मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये व्यापर युध्द भडकले. चीन हा अमेरिकेचा सर्वात मोठा निर्यातदार देश आहे.
अमेरिकेचा चीनशी शेकडो अब्ज डॉलरचा व्यापार आहे. इलेक्ट्रॉनिक उपकरणे, तयार कपडे आणि फर्निचर या वस्तुंची चीनमधून अमेरिकेत सर्वाधिक निर्यात होते. त्या दृष्टीने अमेरिका बर्याच अंशी चीनवर अवलंबून आहे. उत्पादन क्षेत्रातील चीनच्या मक्तेदारीला आव्हान देण्यासाठी ट्रम्प यांनी अमेरिकन कंपन्यांना अन्य देशांमध्ये उत्पादन न करता देशात उत्पादन घेण्याचे आव्हान केले. मात्र बाहेरील बड्या कंपन्यांनी अमेरिकेत मोठी गुंतवणूक करण्याची तयारी दाखवताच ट्रम्प यांनी मवाळ धोरण स्वीकारले. त्यामुळे गेले काही महिने अमेरिका आणि चीन दरम्यान व्यापाराच्या आघाडीवर शांतता होती. मात्र चीनने निर्यातीवर निर्बंध लादल्यानंतर हे व्यापार युध्द नव्याने छेडले गेले आहे.
ट्रम्प यांच्या या निर्णयाचे काल अमेरिकेतील भांडवली बाजारावर नकारात्मक पडसाद उमटले. चीनी मालाच्या आयातीवर अतिरिक्त आयात शुल्क लागू होण्याचा धसका घेत डाऊ जोन्स 878 अंकांनी गडगडला. एस अँड पी 500 मध्ये 2.7 टक्क्यांची घसरण झाली. तर नॅसडॅक निर्देशांकात 3.5 टक्क्यांची मोठी पडझड झाली.
हे देखील वाचा –
टेक ऑफ करताना खाजगी विमान कोसळल! तीन जणांचा जागीच मृत्यू