Maharashtra Farmer Relief Protest: मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये सप्टेंबरच्या अखेरीस झालेल्या अतिवृष्टीमुळे (Heavy Rainfall) शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत आणि कर्जमुक्ती मिळावी या मागणीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने छत्रपती संभाजीनगर येथे ‘हंबरडा मोर्चा’ आयोजित करण्यात आला होता.
या मोर्चात बोलताना उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरेंच्या टीकेनंतर आता देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले आहे.
उद्धव ठाकरेंचा सरकारला थेट इशारा
हंबरडा मोर्चात बोलताना उद्धव ठाकरे यांनी सरकारला थेट इशारा दिला. ते म्हणाले, “आम्हाला शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन नको आहे, आजचे मरण उद्यावर नकोय. आम्हाला कर्जमुक्ती हवी आहे. जोपर्यंत शेतकऱ्यांना कर्जमुक्त केले जात नाही, तोपर्यंत आम्ही या सरकारला सोडणार नाही आणि आंदोलनाचा पवित्रा घेत राहू. हा हंबरडा मोर्चा नाहीये, हा इशारा मोर्चा आहे!”
यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये मदत देण्याची मागणी केली.
देवेंद्र फडणवीसांचे उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर
उद्धव ठाकरेंच्या या मोर्चाबद्दल माध्यमांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला असता, त्यांनी यावर प्रतिक्रिया दिली. फडणवीस म्हणाले, “मोर्चा काढणे हे विरोधी पक्षाचे कामच आहे. शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे, यावर त्यांचा विश्वास आहे, हे ऐकून बरे वाटले.”
त्यांनी पुढे सूचक विधान केले, “मदत मिळाली नाही, तर ते रस्त्यावर उतरणार असतील, तर आम्ही त्यांना रस्त्यावर उतरू देणार नाही. आम्ही मदत वेळेवर देऊ.”
शेतकऱ्यांना मदत सुरू
शेतकऱ्यांच्या मदतीच्या प्रश्नावर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मदत मिळणे सुरू झाले आहे. मदतीसाठी आवश्यक असलेल्या निधीचा पहिला टप्पा वितरीत करण्यात आला आहे.
जास्तीत जास्त निधी दिवाळीपूर्वी देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. तर काही निधी दिवाळीदरम्यान किंवा दिवाळीनंतरही दिला जाईल. यावेळी फडणवीस यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीबद्दल देखील माहिती दिली.
हे देखील वाचा – Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंची सरकारवर सडकून टीका..