Punha Shivajiraje Bhosale Movie: दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा बहुचर्चित चित्रपट ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ चा ट्रेलर लोअर परळ येथील पीव्हीआरमध्ये मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या उपस्थितीत दिमाखात लाँच झाला. 3 मिनिटे 34 सेकंदांच्या ट्रेलरने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचवली आहे.
या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित राहणार होते, मात्र पुण्यात सुरू असलेल्या बैठकांमुळे ते येऊ शकले नाहीत.
राज ठाकरेंनी केले मांजरेकरांचे भरभरून कौतुक
ट्रेलर लाँच सोहळ्यात बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचे तोंड भरून कौतुक केले. ते म्हणाले, “महेश मांजरेकर हा झपाटलेला माणूस आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत जसे यश चोप्रा आहेत, तसेच मराठीमध्ये महेश मांजरेकर आहेत, हे निश्चित आहे.”
“माझ्यात आणि मांजरेकरांमध्ये एक गोष्ट कॉमन आहे, ती म्हणजे आम्ही दोघेही जे पाहतो, ते भव्य पाहतो.याआधीचा 2009 (साली प्रदर्शित झालेला ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ हा चित्रपट मुंबई, पुणे, ठाणे या भागासाठी होता; पण हा चित्रपट (‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’) संपूर्ण महाराष्ट्राचा आहे आणि महाराष्ट्र या सिनेमाला उचलून धरेल.”, असेही ते म्हणाले.
शेतकरी आत्महत्या, मराठी माणसाचे स्थान आणि परप्रांतीयांची मुजोरी यांसारखे संवेदनशील सामाजिक विषय छत्रपती शिवाजी महाराजांच्या माध्यमातून मांडण्याचे धाडस मांजरेकरांनी दाखवले आहे, असेही राज ठाकरे म्हणाले.
सिनेमा वर्तमान आणि भूतकाळाचा संगम
चित्रपटाबद्दल बोलताना महेश मांजरेकर यांनी स्पष्ट केले की, हा पहिल्या चित्रपटाचा भाग 2 नाही. शेतकरी आत्महत्या या अत्यंत गंभीर विषयावर मला काम करायचे होते. “मराठी माणसाची, आपल्याच राज्यात काय अवस्था आहे? आणि यावर महाराज काय रिएक्ट होणार?” या अनुषंगाने हा सिनेमा आहे. वर्तमान आणि इतिहास यांच्या संगमावर आधारित हा चित्रपट आहे, असे मांजरेकर म्हणाले.
या चित्रपटातून शिवाजी महाराजांचे प्रखर रूप दिसणार असून, मराठीची अस्मिता आणि बळीराजाचे प्रश्न महाराजांच्या कृतीतून आणि भाष्यातून प्रेक्षकांना बघायला मिळतील.
कलाकार आणि प्रदर्शनाची तारीख
या चित्रपटात अभिनेता सिद्धार्थ बोडके छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुख्य भूमिकेत दिसणार आहे. विक्रम गायकवाड, शशांक शेंडे, मंगेश देसाई, पृथ्वीक प्रताप, रोहित माने आणि नित्यश्री यांसारख्या कलाकारांची तगडी फौज यात आहे. तसेच राष्ट्रीय पुरस्कार विजेते बाल कलाकार त्रिशा ठोसर आणि भार्गव जगताप यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.
‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ हा चित्रपट येत्या 31 ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. महेश मांजरेकर यांनी भविष्यात मराठी सिनेमा बनवून तो हिंदीत डब करण्याचा आणि मराठी सिनेमा 450 कोटी कमवेल अशी आशा व्यक्त केली.
हे देखील वाचा – “आम्ही त्यांना रस्त्यावर उतरू देणार नाही!” उद्धव ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर फडणवीसांचे मदत देण्याबाबत सूचक विधान