P Chidambaram on Operation Blue Star: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृह व अर्थमंत्री पी. चिदंबरम (P Chidambaram) यांनी 1984 मधील ‘ऑपरेशन ब्लू स्टार’ (Operation Blue Star) बद्दल एक मोठे विधान केले आहे.
ऑपरेशन ब्लू स्टारची पद्धत चुकीची होती, असे वक्तव्य त्यांनी केले आहे. हिमाचल प्रदेशातील कसौली (Kasauli) येथे झालेल्या खुशवंत सिंग साहित्य महोत्सवात बोलताना त्यांनी हा दावा केला.
‘ऑपरेशन ब्लू स्टार’ चुकीच्या मार्गाने
1984 मध्ये सुवर्ण मंदिरातील (Golden Temple) दहशतवाद्यांना बाहेर काढण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या सूचनेवरून ‘ऑपरेशन ब्लू स्टार’ राबवण्यात आले होते. या कारवाईबद्दल बोलताना चिदंबरम म्हणाले की, “सुवर्ण मंदिर पुन्हा ताब्यात घेण्याचा तो चुकीचा मार्ग होता. 3 ते 4 वर्षांनंतर आम्ही सैन्याला बाहेर ठेवून सुवर्ण मंदिर परत मिळवण्याचा योग्य मार्ग दाखवला होता.”
ते पुढे म्हणाले, “ब्लू स्टार ही चुकीची पद्धत होती. मी हे मान्य करतो की, इंदिरा गांधी यांनी याच चुकीची किंमत आपल्या जीवाने चुकवली.”
इंदिरा गांधींना एकट्याला जबाबदार धरू नका!
या चुकीसाठी केवळ इंदिरा गांधींना एकट्याला जबाबदार धरणे योग्य नाही, असे मतही चिदंबरम यांनी मांडले. “ती चूक केवळ इंदिरा गांधी यांची नव्हती. तो निर्णय सैन्य, पोलिस, गुप्तचर यंत्रणा आणि नागरी सेवा यांचा एकत्रित निर्णय होता. त्यामुळे केवळ गांधींना दोष देता येणार नाही,” असे ते म्हणाले. पत्रकार हरिंदर बावेजा यांच्या ‘दे विल शूट यू, मॅडम’ या पुस्तकाच्या चर्चेदरम्यान चिदंबरम बोलत होते.
ऑपरेशन ब्लू स्टार आणि त्यानंतरच्या घटना
1जून ते 8 जून 1984 दरम्यान हे ‘ऑपरेशन ब्लू स्टार’ राबवण्यात आले होते. या कारवाईचा उद्देश जर्नेल सिंग भिंद्रनवाले याच्या नेतृत्वाखालील फुटीरतावादी चळवळ मोडून काढणे हा होता.
या कारवाईदरम्यान शीख धर्मियांचे सर्वात पवित्र स्थळ असलेल्या सुवर्ण मंदिरावर सैन्य कारवाई करण्यात आली. यामध्ये अकाल तख्त उद्ध्वस्त झाले, ज्यामुळे शीख समाजात प्रचंड असंतोष निर्माण झाला. या घटनेनंतर काही महिन्यांतच इंदिरा गांधी यांची त्यांच्या शीख अंगरक्षकांनी गोळ्या झाडून हत्या केली.
इंदिरा गांधींच्या हत्येनंतर देशभरात शीख समुदायाविरुद्ध मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला. सरकारी अंदाजानुसार, दिल्ली आणि इतर ठिकाणी 3,000 हून अधिक शीख मारले गेले होते.
हे देखील वाचा – “आम्ही त्यांना रस्त्यावर उतरू देणार नाही!” उद्धव ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर फडणवीसांचे मदत देण्याबाबत सूचक विधान