Home / मनोरंजन / ‘जे हुंडा घेतात ते नामर्द…’; अभिनेते मकरंद अनासपुरे यांचे परखड विधान, म्हणाले…

‘जे हुंडा घेतात ते नामर्द…’; अभिनेते मकरंद अनासपुरे यांचे परखड विधान, म्हणाले…

Makarand Anaspure Dowry Statement: चित्रपट अभिनेते आणि ‘नाम फाउंडेशन’चे सह-संस्थापक मकरंद अनासपुरे यांनी अकोला जिल्ह्यातील एका कार्यक्रमात हुंडा प्रथा आणि...

By: Team Navakal
Makarand Anaspure Dowry Statement

Makarand Anaspure Dowry Statement: चित्रपट अभिनेते आणि ‘नाम फाउंडेशन’चे सह-संस्थापक मकरंद अनासपुरे यांनी अकोला जिल्ह्यातील एका कार्यक्रमात हुंडा प्रथा आणि शेतकऱ्यांचे आर्थिक प्रश्न या दोन महत्त्वाच्या सामाजिक विषयांवर अत्यंत परखड मत मांडले आहे. निंबा फाटा येथे ‘अंदुरा ॲग्रो प्रोड्युसर कंपनी’च्या वतीने आयोजित ‘कुणबी स्नेहमिलन सोहळा’ आणि शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. या कार्यक्रमाला अभिनेत्री गिरिजा ओक यांचीही उपस्थिती होती.

हुंडा घेणाऱ्यांवर कठोर टीका

हुंडा प्रथेवर बोलताना अनासपुरे यांनी कोणतीही भीडभाड न ठेवता अत्यंत कठोर शब्दांत टीका केली. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, “जे हुंडा घेतील ते नामर्द आहेत.” ते पुढे म्हणाले, “पत्नीला घरात लक्ष्मी म्हणून आणायचे असते. तिने आपल्या लेकरांना जन्म देऊन त्यांच्यावर संस्कार करण्याची जबाबदारी असते. मग ती घरात येत असताना भिकाऱ्यासारखे तिच्या वडिलांकडे पैशांची मागणी कशासाठी करायची?”

त्यांनी स्त्री आणि तिच्या अस्तित्वाचे महत्त्व अधोरेखित केले. “स्त्री जर टिकली नाही, तर समाज कसा टिकेल? आपला देश ‘भारत’ हा पुल्लिंगी शब्द असतानाही आपण त्याला ‘भारत माता’ म्हणतो, कारण आपल्या संस्कृतीने आदिशक्तीचे महत्त्व जाणले आहे,” असे अनासपुरे यांनी स्पष्ट केले.

शेतकऱ्यांच्या लुटीवर आकडेवारीसह प्रश्नचिन्ह

मकरंद अनासपुरे यांनी देशातील शेतमालाच्या दरांमधील विसंगतीकडे लक्ष वेधले. त्यांनी शेतकऱ्यांची लूट थांबणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे नमूद केले. त्यांनी 1973 मधील स्थितीची तुलना 2025 शी केली:

1973 मध्ये जेव्हा पगार केवळ 75 रुपये ते 100 रुपये होता, तेव्हा सोने 400 रुपये तोळा आणि कपाशीचा भाव 500 रुपये क्विंटल होता. आज 2025 मध्ये लोकांचे पगार लाख-दीड लाखाच्या घरात आहेत आणि सोन्याचा भावही लाखाच्या वर गेला आहे, पण कपाशीचा भाव अजूनही 3 हजार ते 5 हजार रुपयांमध्येच अडकला आहे.

या आकडेवारीचा आधार घेत ते म्हणाले, “या देशाला महासत्ता व्हायचे असेल, तर शेतकऱ्यांची ही लूट थांबायलाच हवी. शेतकऱ्यांनी फक्त ‘शेतकरी’ हीच जात लक्षात ठेवून एकत्र काम केले, तर त्यांचे प्रश्न सुटण्याची शक्यता आहे.”

बँकांना कर्जवसुली थांबवण्याची विनंती

अनासपुरे यांनी यावेळी बँका आणि वित्तसंस्थांना शेतकऱ्यांच्या अडचणीच्या काळात मदत करण्याची विनंती केली. त्यांनी मागणी केली की, शेतकऱ्यांना उद्योजकाचा दर्जा मिळायला हवा आणि त्यांच्या अडचणीच्या काळात बँका, पतसंस्था आणि मायक्रो फायनान्स कंपन्यांनी कर्जवसुली न करता त्यांना सहानुभूती दाखवावी.

हे देखील वाचा – ‘मुलगी रात्री 12.30 वाजता बाहेर कशी गेली?’; दुर्गापूर सामूहिक बलात्कार प्रकरणावर ममता बॅनर्जींच्या वक्तव्यामुळे मोठा वाद

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या