BMC Election: बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये महायुती जिंकल्यास मुंबईतील धोरणनिर्मिती आणि नागरी नियोजप्रक्रियेत Gen Z तरुणांना सहभागी करून घेण्यासाठी मुंबई भाजपने महत्त्वाकांक्षी इंटर्नशिप कार्यक्रम आखला आहे.
मुंबई भाजपचे अध्यक्ष अमीत साटम यांनी नुकतेच मुंबईतील वायबी चव्हाण सभागृहात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना या इंटर्नशिप कार्यक्रमाची घोषणा केली. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्राच्या मतदारांमध्ये युवकांचा (18-29 वयोगटातील) वाटा सुमारे 20 टक्के आहे.
युवकांकडून नागरी प्रशासनासाठी कल्पना
साटम यांनी स्पष्ट केले की, शहराच्या कल्याणासाठी धोरणनिर्मिती आणि प्रशासकीय प्रक्रियेत Gen Z चा सहभाग घेणे, तसेच त्यांच्या नाविन्यपूर्ण सूचनांचा उपयोग करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी रस्ते, पूर, मोकळ्या जागा, कचरा व्यवस्थापन , पर्यावरण आणि सुरक्षा यांसारख्या विविध शहरी समस्यांवर चर्चा केली.
त्यांनी सांगितले की, सार्वजनिक धोरण आणि प्रशासनाचे अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या 50 तरुण व्यक्तींना या कार्यक्रमात संधी मिळेल. हे सर्व तरुण नागरी प्रणालीचे निरीक्षण करतील, त्यांच्या सूचना देतील आणि शहरी नियोजन तसेच नागरी प्रशासन मजबूत करण्यासाठी रिसर्च पेपर्स तयार करतील. साटम यांच्या माहितीनुसार, मुंबईच्या 24 प्रशासकीय वॉर्डांमध्ये प्रत्येकी दोन इंटर्न्सची नियुक्ती केली जाईल, तर अतिरिक्त दोन इंटर्न्स BMC मुख्यालयात काम करतील.
त्यांनी पुढे सांगितले की, तरुणांना मुंबईच्या प्रशासनात सहभागी होण्याची संधी मिळत असल्यामुळे त्यांनी या योजनेबद्दल मोठा उत्साह दाखवला. या इंटर्नशिप कार्यक्रमासाठी स्पष्ट निकषांसह एक व्यावसायिक निवड प्रक्रिया असेल. यशस्वी झाल्यावर हा कार्यक्रम विस्तारित केला जाईल.
2015 मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या पहिल्या कार्यकाळात सुरू झालेल्या मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमाप्रमाणेच या योजनेचा उद्देश युवकांना प्रशासनात सामील करणे आहे.
हे देखील वाचा – देशातील सर्वात स्वस्त कार! फक्त दरमहिना 4,916 रुपये भरा आणि घरी घेऊन जा गाडी