Lalu Yadav – बिहार विधानसभा निवडणुकीच्या (Bihar Assembly elections) तोंडावर राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव, राबडी देवी (Rabri Devi) आणि तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांना दिल्लीतील राऊज अॅव्हेन्यू कोर्टाने दणका दिला आहे. भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन महामंडळातील (IRCTC land) जमीन घोटाळ्याप्रकरणी या तिघांवर भ्रष्टाचार, कारस्थान आणि फसवणुकीचा आरोप निश्चित केला आहे .
लालूप्रसाद यादव केंद्रीय रेल्वेमंत्री असताना सन २००४ ते २००९ या कालावधीत आयआरसीटीसीच्या अखत्यारितील रांची आणि पुरी येथील दोन हॉटेल निविदा प्रक्रियेला बगल देऊन सुजाता हॉटेल्स (Sujata Hotels)समुहाला भाडेतत्वावर देण्यात आली होती. त्या बदल्यात कोट्यवधी रुपये बाजार मूल्य असलेल्या जमिनी सुजाता हॉटेल्सच्या माध्यमातून कवडीमोलाने राबडी देवी आणि तेजस्वी यादव यांच्याशी संबंधित कंपनीच्या नावे करण्यात आल्या,असा सीबीआयचा (CBI)आरोप आहे.
सीबीआयने ७ जुलै २०१७ रोजी या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. लालुप्रसाद आणि कुटुंबियांशी संबंधित दिल्ली,रांची आणि गुरुग्राम (Gurugram)येथे १२ ठिकाणांवर छापेमारी केली होती. आज या खटल्यात न्यायालयात भ्रष्टाचार, गुन्हेगारी स्वरुपाचे कारस्थान रचणे यांसह विविध कलमांखाली लालुप्रसाद, राबडी देवी, तेजस्वी यादवसहीत एकूण चौदा आरोपींवर आरोप निश्चित करण्यात आले.
लालुप्रसाद यादव आणि कुटुंबियांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले असून हा खटला राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोप पुन्हा एकदा केला आहे.बिहार विधानसभेसाठीचे मतदान ६ आणि ११ नोव्हेंबर अशा दोन टप्प्यांत होणार आहे. त्यापूर्वी भ्रष्टाचाराच्या खटल्यात आरोप निश्चिती झाल्यामुळे यादव कुटुंब राजकीय क्षेत्रात अडचणीत येणार आहे.
हे देखील वाचा –
आनंदाचा शिधानंतर शिंदेची माझी शाळा योजना बंद?
मतचोरीच्या एसआयटी चौकशीची मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळली
डोनाल्ड ट्रम्प यांचे पुन्हा घुमजाव क्षी जिनपिंग यांची प्रशंसा केली