Cough Syrup Deaths- कळंब तालुक्यातील पिंपळखुटी येथे एका सहा वर्षांच्या चिमुकल्याचा संशयास्पद मृत्यू (Cough Syrup Deaths)हा कफ सिरप घेतल्याने झाल्याचा खळबळजनक आरोप कुटुंबियांनी केला आहे. राजस्थान आणि मध्य प्रदेशात कफ सिरपमुळे अनेक बालकांचा मृत्यू झाल्याने खळबळ माजली असताना आता महाराष्ट्रात त्याच प्रकारचा संशय निर्माण झाल्याने अन्न आणि औषध प्रशासन खडबडून जागे झाले आहे. प्रशासनाने 7 औषधांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेकडेपाठवले आहेत.
पिंपळखुटी येथील एका सहा वर्षांच्या बालकाने गेल्या 4 ऑक्टोबरला यवतमाळ शहरातील बालरोगतज्ज्ञांकडून औषधोपचार घेतले होते. बरे न वाटल्याने 6 ऑक्टोबरला औषधे बदलण्यात आली. त्यानंतर दुसर्याच दिवशी 7 ऑक्टोबरला सायंकाळी बालक अचानक बेशुद्ध पडले आणि त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. पालकांनी त्याला तातडीने त्याच डॉक्टरांकडे नेले असता त्यांनी शहरातील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यास सांगितले. तिथे डॉक्टरांनी तपासणी केली असता बालकाचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.
शासकीय रुग्णालयाच्या प्रशासनाने तातडीने अन्न व औषध प्रशासनाला याची माहिती दिली. एफडीएच्या पथकाने संबंधित खासगी रुग्णालयातील मेडिकल आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडील कफ सिरपचे नमुने घेतले. बालकाला देण्यात आलेल्या 5 औषधांचेही नमुने प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आल्याचे एफडीएचे सहायक आयुक्त एम. के. काळेश्वरकर यांनी सांगितले. खबरदारी म्हणून दोन ब्रँडच्या कफ सिरफचे नमुनेही पाठवण्यात आले आहेत. मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्यासाठी शासकीय रुग्णालयात बालकाची शवचिकित्सा करण्यात आली. व्हिसेरा रासायनिक विश्लेषणासाठी प्रयोगशाळेकडे पाठवला आहे.
बाळाचा मृत्यू कफ सिरपमुळे झाला की अन्य कारणांमुळे याचा उलगडा प्रयोगशाळेतील तपासणी अहवालानंतरच होईल. दरम्यान, मध्य प्रदेशात लहान मुलांचा जीव घेणार्या कोल्ड्रिफ कफ सिरपची निर्मिती करणार्या श्रीसन फार्मा कंपनीवर ईडीने छापे टाकले होते. चेन्नईतील सात ठिकाणी छापे टाकण्यात आले. कंपनीचा मालक जी. रंगनाथनला मध्य प्रदेश पोलिसांनी 9 ऑक्टोबर रोजीच अटक केली आहे.
——————————————————————————————————————————————————
हे देखील वाचा-
तालिबानचा पाकिस्तानला कठोर इशारा..एकमेकांविरोधात मोठे दावे..