SSC HSC Time Table: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) दहावी (SSC) आणि बारावी (HSC) परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. लाखो विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनातील हा एक महत्त्वाचा टप्पा असून, या वर्षी परीक्षा नियोजित वेळेपेक्षा दोन आठवडे आधी सुरू होणार आहेत.
मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्यांना परीक्षेच्या तयारीसाठी पुरेसा अवधी मिळावा, यासाठी वेळापत्रक लवकर जाहीर करण्यात आले आहे.
SSC HSC Time Table: बारावी आणि दहावीलेखी परीक्षेचे वेळापत्रक
- बारावी (HSC) : 10 फेब्रुवारी 2026 ते 18 मार्च 2026
- दहावी (SSC) : 20 फेब्रुवारी 2026 ते 18 मार्च 2026
मागील वर्षापर्यंत बारावीची परीक्षा फेब्रुवारीच्या अखेरीस तर दहावीची परीक्षा मार्चच्या सुरुवातीला सुरू होत असे. परंतु यावर्षी हे वेळापत्रक बदलण्यात आले आहे. माहिती तंत्रज्ञान आणि सामान्य ज्ञान या विषयांच्या ऑनलाइन परीक्षा याच कालावधीत होतील.
प्रात्यक्षिक परीक्षांचे वेळापत्रक
लेखी परीक्षांसोबतच प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षांच्या तारखाही निश्चित करण्यात आल्या आहेत.
- बारावीसाठी (HSC): 23 जानेवारी ते 9 फेब्रुवारी 2026 या काळात प्रात्यक्षिक परीक्षा होतील. यात माहिती तंत्रज्ञान आणि सामान्यज्ञान विषयांच्या परीक्षांचा समावेश आहे.
- दहावीसाठी (SSC): 2 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारी 2026 या कालावधीत प्रात्यक्षिक परीक्षा होणार आहेत. यात शरीरशास्त्र, आरोग्यशास्त्र आणि गृहशास्त्र या विषयांचा समावेश असेल.
शिक्षण मंडळाचे महत्त्वाचे निर्देश
मंडळाचे सहसचिव प्रमोद गोंफणे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. या तारखा लक्षात घेऊन शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना त्यांच्या अभ्यासक्रमाचे नियोजन पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
अभ्यासासाठी पुरेसा वेळ
वेळापत्रक लवकर जाहीर झाल्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी सुमारे पाच महिन्यांचा कालावधी मिळत आहे. विद्यार्थ्यांनी या काळात विषयवार अभ्यासक्रम पूर्ण करणे, सराव परीक्षा देणे तसेच पालक आणि शिक्षकांनी तणावमुक्त राहण्यासाठी प्रोत्साहन देणे आवश्यक आहे.
निकाल कधी अपेक्षित?
परीक्षा संपल्यानंतर निकाल साधारणपणे मे-जून 2026 मध्ये अपेक्षित आहे. तसेच, पूरक परीक्षा जुलै महिन्यात होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांसाठी परीक्षा केंद्रांची यादी आणि हॉल तिकीट वितरणाची प्रक्रिया लवकरच सुरू होईल. अधिकृत व तपशीलवार विषयनिहाय वेळापत्रक मंडळाच्या mahahsscboard.in या संकेतस्थळावर लवकरच प्रसिद्ध होईल.
हे देखील वाचा – Donald Trump: ‘भारत-पाक दोन्ही देश…’; शहबाज शरीफ यांच्यासमोरच डोनाल्ड ट्रम्प यांचे महत्त्वाचे विधान