EPFO Withdrawal Rules: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) केंद्रीय विश्वस्त मंडळाने (CBT) EPF खात्यातून अंशतः पैसे काढण्याच्या नियमांमध्ये मोठी सूट दिली आहे. आता सदस्य त्यांच्या पात्र शिल्लक रकमेपैकी 100% पर्यंत रक्कम काढू शकतात. यात कर्मचारी आणि नियोक्ता या दोघांच्याही योगदानाचा समावेश आहे.
कामगार मंत्री मनसुख मांडविया यांनी 13 विद्यमान तरतुदींचे तीन मुख्य श्रेणींमध्ये एकत्रीकरण करण्याच्या निर्णयाला मंजुरी दिली आहे. या तीन श्रेणींमध्ये आवश्यक गरजा (शिक्षण, आजारपण, विवाह), गृहनिर्माण गरजा आणि विशेष परिस्थिती (उदा. नैसर्गिक आपत्ती किंवा बेरोजगारी) याचा समावेश आहे.
जुने नियम बदलले, वारंवार पैसे काढण्याची मर्यादा वाढली
या सुधारणांनुसार, शिक्षणासाठी दहा वेळा आणि विवाहासाठी पाच वेळा पैसे काढता येतील. पूर्वी यासाठी तीन वेळा पैसे काढण्याची मर्यादा होती. मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात स्पष्ट केले आहे की, “आता सदस्यांना भविष्य निर्वाह निधीतील पात्र शिल्लक रकमेपैकी 100% पर्यंत रक्कम काढता येईल, ज्यात कर्मचारी आणि नियोक्ता या दोघांच्या योगदानाचा समावेश असेल.”
आता सर्व अंशतः पैसे काढण्यासाठी 12 महिन्यांच्या किमान सेवेची एकसमान अट निश्चित करण्यात आली आहे. यापूर्वी वेगवेगळ्या श्रेणींसाठी वेगवेगळे नियम होते.
पैसे काढणे झाले सोपे
यापूर्वी, ‘विशेष परिस्थिती’ अंतर्गत पैसे काढू इच्छिणाऱ्या EPFO सदस्यांना नैसर्गिक आपत्ती, कारखाना बंद होणे किंवा दीर्घकाळ बेरोजगारी यांसारखी विशिष्ट कारणे नमूद करावी लागत होती. या प्रक्रियेमुळे अनेकदा दावे फेटाळले जात होते. मात्र, सुधारित नियमांनुसार, सदस्य आता कोणतेही विशिष्ट कारण न सांगता अशा प्रकारचे पैसे काढू शकतात, ज्यामुळे ही प्रक्रिया सोपी झाली आहे आणि वादविवादांना वाव कमी झाला आहे.
निवृत्तीसाठी किमान शिल्लक अनिवार्य
निवृत्तीसाठी बचत सुरक्षित ठेवण्यासाठी, EPFO ने एक महत्त्वाचा नियम केला आहे. खात्यात किमान 25% योगदान शिल्लक ठेवणे अनिवार्य करण्यात आले आहे. यामुळे सदस्यांना 8.25% दराने चक्रवाढ व्याजाचा फायदा मिळत राहील.
सदस्य आता 12 महिन्यांनंतर मुदतीपूर्वी अंतिम EPF काढू शकतात आणि पेन्शनसाठी 36 (दोन महिन्यांऐवजी) महिन्यांनंतर पैसे काढता येतील.
हे देखील वाचा – महागाईला मोठा ब्रेक! देशातील महागाई दर 2017 नंतर सर्वात कमी पातळीवर; खाद्यपदार्थांच्या किमतीत घसरण