Ahmedabad 2030 Commonwealth Games: राष्ट्रमंडळ क्रीडा कार्यकारी मंडळाने (Executive Board of Commonwealth Sport) 2030 मध्ये होणाऱ्या 24 व्या राष्ट्रकुल क्रीडा (Commonwealth Games) स्पर्धेसाठी अहमदाबाद या शहराच्या यजमानपदाची शिफारस केली आहे.
या शिफारसीमुळे भारतासाठी मोठी संधी निर्माण झाली आहे, कारण 2030 मध्ये या बहु-क्रीडा स्पर्धेला 100 वर्षे पूर्ण होत आहेत.
कॉमनवेल्थ स्पोर्टने दिलेल्या निवेदनानुसार, या शिफारशीवर 26 नोव्हेंबर 2025 रोजी ग्लासगो येथे होणाऱ्या सर्वसाधारण सभेतॉअंतिम निर्णय घेतला जाईल. जर या प्रस्तावाला मंजुरी मिळाली, तर अहमदाबाद हे 2010 मध्ये नवी दिल्लीनंतर राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आयोजित करणारे भारतातील दुसरे शहर ठरेल.
भारताने 2036 मध्ये ऑलिम्पिक स्पर्धा आयोजित करण्याच्या मोठ्या महत्त्वाकांक्षी योजनेचा एक भाग म्हणून राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या यजमानपदासाठी बोली लावली आहे.
इव्हेंट्सचा समावेश आणि अपेक्षित फायदा 2030 च्या स्पर्धांमध्ये 72 राष्ट्रे आणि प्रदेशांमधील खेळाडू सहभागी होण्याची अपेक्षा आहे. यातून मोठ्या प्रमाणावर रोजगार, पर्यटन आणि क्रीडा क्षेत्राव्यतिरिक्त इतर अनेक क्षेत्रांत संधी निर्माण होतील. 2026 च्या स्पर्धांमधून वगळण्यात आलेले हॉकी, क्रिकेट, बॅडमिंटन, कुस्ती, टेबल टेनिस यांसारखे अनेक महत्त्वाचे मेडल इव्हेंट्स भारत 2030 च्या गेम्समध्ये पुन्हा समाविष्ट करण्याचा प्रयत्न करेल.
Commonwealth Games: निवड प्रक्रिया आणि भारताची महत्त्वाकांक्षा
राष्ट्रकुल क्रीडा मूल्यमापन समितीने तांत्रिक वितरण, खेळाडू अनुभव, पायाभूत सुविधा आणि प्रशासनासह अनेक निकषांवर उमेदवारी शहरांचे विस्तृत मूल्यांकन केल्यानंतर ही शिफारस केली आहे. नायजेरियातील अबुजा शहरानेही 2030 च्या यजमानपदासाठी बोली लावली होती. दोन्ही शहरांनी प्रभावी प्रस्ताव सादर केले होते.
भारताच्या राष्ट्रकुल क्रीडा संघटनेच्या अध्यक्षा पी.टी. उषा यांनी या शिफारसीबद्दल आनंद व्यक्त केला. “100व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे आयोजन करणे, हा भारतासाठी एक असाधारण सन्मान असेल. या स्पर्धा ‘विकसित भारत 2047’ च्या आमच्या राष्ट्रीय प्रवासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील,” असे त्या म्हणाल्या.
आफ्रिकेच्या यजमानपदाला पाठिंबा कार्यकारी मंडळाने नायजेरियाच्या प्रस्तावाची दखल घेतली आहे आणि 2034 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांसाठी नायजेरियाला यजमानपद मिळण्यास मदत करण्यासाठी एक धोरणात्मक रोडमॅप तयार करण्याचे मान्य केले आहे. आफ्रिका खंडात प्रथमच राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आयोजित करण्याचा यामागे उद्देश आहे.
हे देखील वाचा – भारत रशियाकडून तेल खरेदी थांबवणार? मोदींचे नाव घेत ट्रम्प यांचा मोठा दावा