Home / महाराष्ट्र / Diwali 2025: दिवाळीत फटाके फोडताना घ्या विशेष काळजी! अग्निशमन दलाकडून सुरक्षेसाठी गाईडलाईन्स जारी

Diwali 2025: दिवाळीत फटाके फोडताना घ्या विशेष काळजी! अग्निशमन दलाकडून सुरक्षेसाठी गाईडलाईन्स जारी

Diwali 2025: प्रकाशाचा उत्सव म्हणजेच दिवाळी सुरक्षित, पर्यावरणपूरक आणि शांततेत साजरी व्हावी, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका आणि मुंबई अग्निशमन दलाने मुंबईकरांना...

By: Team Navakal
Diwali 2025

Diwali 2025: प्रकाशाचा उत्सव म्हणजेच दिवाळी सुरक्षित, पर्यावरणपूरक आणि शांततेत साजरी व्हावी, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका आणि मुंबई अग्निशमन दलाने मुंबईकरांना विशेष आवाहन केले आहे. फटाक्यांमुळे ध्वनी आणि वायू प्रदूषण वाढणार नाही याची दक्षता घेण्यासोबतच, फटाके फोडताना लहान मुलांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे स्पष्ट निर्देश प्रशासनाने दिले आहेत.

Diwali 2025 Firecracker Safety Guidelines: निष्काळजीपणामुळे वाढले आगीचे अपघात

महापालिकेच्या अग्निशमन दलाने दिलेल्या आकडेवारीनुसार, दिवाळीच्या उत्साहात निष्काळजीपणामुळे आगीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. गेल्या चार वर्षांत म्हणजेच 2021 ते 2024 या कालावधीत शहरात एकूण 135 आगीच्या गंभीर दुर्घटनांची नोंद झाली आहे. यामध्ये 2024 मध्ये सर्वाधिक 60 घटनांची नोंद झाली, तर 2023 मध्ये 35, 2022 मध्ये 19 आणि 2021 मध्ये 21 घटना घडल्या होत्या. या पार्श्वभूमीवर यंदाची दिवाळी सुरक्षित पार पाडण्यासाठी अग्निशमन दलाकडून ‘फटाके सुरक्षा जनजागृती विशेष मोहीम’ राबवली जात आहे.

Diwali 2025 : फटाके फोडताना काय करावे आणि काय टाळावे?

आगीचे अपघात टाळण्यासाठी आणि सुरक्षितता राखण्यासाठी अग्निशमन दलाने नागरिकांसाठी सविस्तर मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

सुरक्षिततेसाठी आवश्यक बाबी: फटाके फोडताना नेहमी सुती कपडे परिधान करावेत आणि पादत्राणे (चप्पल) वापरावीत, नायलॉनचे कपडे टाळावेत. लहान मुले फटाके फोडत असताना मोठ्यांनी त्यांच्यासोबत उपस्थित राहणे आणि त्यांच्यापासून फटाके लांब ठेवणे आवश्यक आहे.

अपघाताची शक्यता लक्षात घेऊन, फटाके फोडताना पाण्याने भरलेली बादली जवळ ठेवावी आणि कोणाला भाजल्यास तात्काळ त्या ठिकाणी भरपूर स्वच्छ पाणी ओतावे. तसेच, फटाके पेटवण्यासाठी आगकाडी (माचिस) किंवा लायटरचा वापर टाळून, अगरबत्ती किंवा फुलबाजीचा वापर करावा.

या गोष्टी टाळा: इमारतीत, जिन्यावर, टेरेसवर, गर्दीच्या भागात किंवा वाहनांजवळ फटाके फोडू नयेत. विजेच्या तारा, गॅस पाईपलाईन किंवा वाहनतळाच्या ठिकाणी फटाके फोडणे पूर्णपणे टाळावे. झाडे, ओव्हरहेड विद्युत तार किंवा उंच इमारतींजवळ हवेत उडणारे फटाके फोडण्याची परवानगी नाही.

दिवे किंवा पणत्या खिडक्यांच्या पडद्याजवळ लावू नयेत. तसेच, विजेच्या रोषणाईसाठी अधिकृत तंत्रज्ञांची मदत घ्यावी आणि निर्धारित क्षमतेपेक्षा जास्त (ओव्हरलोड) विद्युत भार होणार नाही याची काळजी घ्यावी.

आणीबाणीसाठी संपर्क: प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत दिलेल्या सूचनांचे पालन करावे. दुर्दैवाने आग किंवा तत्सम प्रसंग उद्भवल्यास तात्काळ 101 किंवा नागरी मदत सेवा संपर्क क्रमांक 1916 यावर संपर्क साधण्याचे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुंबई अग्निशमन दलाकडून करण्यात आले आहे. शक्य असल्यास, प्रदूषण टाळण्यासाठी ‘ग्रीन फटाके’ (Green Firecrackers) वापरण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

हे देखील वाचा – 48 तासांसाठी युद्धविराम! पाकिस्तान-तालिबान संघर्ष तात्पुरता थांबला, पण अनेक नागरिकांचा मृत्यू

Web Title:
संबंधित बातम्या