Dilip Khedkar : नवी मुंबईत ट्रक क्लिनरच्या अपहरण प्रकरणात फरार आता एक नवीन माहिती समोर येत आहे. निवृत्त आयएएस अधिकारी दिलीप खेडकर (Dilip Khedkar) यांना अखेर मुंबई उच्च न्यायालयाकडून (Bombay High Court) अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आल्याने आता ह्या प्रकरणाला नवीन वळण येताना दिसत आहे. रस्ते अपघातानंतर झालेल्या या वादग्रस्त प्रकरणात खेडकर आणि त्यांच्या अंगरक्षकावर ट्रक क्लिनरला मारहाण करून जबरदस्तीने गाडीत बसवून नेल्याचा गंभीर आरोप आहे.
नेमकं प्रकरण काय?
१२ सप्टेंबर रोजी नवी मुंबईतील मुलुंड-आयरोली लिंक रोडवर २२ वर्षीय प्रल्हाद कुमार या ट्रक क्लिनरच्या काँक्रीट मिक्सर ट्रकने चुकून दिलीप खेडकर यांच्या लँड क्रूझर या गाडीला धक्का दिला. या घटनेनंतर, संतापाच्या भरात दिलीप खेडकर आणि त्यांच्या अंगरक्षकाने प्रल्हाद कुमारला जबरदस्त मारहाण केली. आणि त्यानंतर त्याला मारहाण करतच गाडीत बसवले आणि “पोलिस ठाण्यात नेतो” असे सांगत त्याचे अपहरण केल्याचा गंभीर आरोप नोंदवण्यात आला.
१४ सप्टेंबरला, पोलिसांनी खेडकर यांच्या घरातून प्रल्हाद कुमारला सुरक्षित सोडवले, तेव्हापासून खेडकर हे फरार होते. त्यांचा ६ ऑक्टोबरला अटकपूर्व जामीन फेटाळला गेला होता, मात्र आता १६ऑक्टोबर रोजी उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला.
खेडकर यांच्या पत्नी मनोरमा खेडकर यांच्यावरही पोलीस तपासात अडथळा निर्माण केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी चौकशीसाठी नोटीस बजावूनही सहकार्य केले नाही. सायंकाळी ६ वाजल्यानंतर चौकशीसाठी हजर झाल्या, ज्यामुळे कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप देखील पोलिसांनी न्यायालयात केला. याच प्रकरणात मनोरमा खेडकर यांना देखील १५ दिवसांपूर्वी स्थानिक न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला. मात्र, याबाबतची अधिक माहिती पोलिसांकडे नव्हती, अशी कबुलीही पोलिसांनी दिली आहे.
दरम्यान, मनोरमा खेडकर यांचा वादग्रस्त इतिहासदेखील तितकाच प्रसिद्ध आहे. पुण्यातील चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात बनावट कागदपत्रांच्या आधारे मालमत्तेवर कब्जा मिळवण्याचे गुन्हे देखील दाखल आहेत. तसेच, अनेक वेळा त्यांनी शासकीय अधिकाऱ्यांशी उर्मटपाणे वर्तन केल्याच्या तक्रारी देखील नोंदवल्या गेल्या आहेत. परिसरात त्यांच्या वर्तनामुळे दहशत निर्माण झाली आहे असे आरोप शेजाऱ्यांनी केले होते. तसेच पूजा खेडकर यांच्यावर आधीच नियमभंग, निलंबन आणि नियुक्ती प्रक्रियेत फसवणुकीचे गंभीर आरोप आहेत.
हे देखील वाचा – Ban Hindi : हिंदी फलक , चित्रपट, गाण्यांवर तामिळनाडूत बंदीचे विधेयक येणार