Pandharpur Vitthal Temple : पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात कर्मचाऱ्यांना दिलेल्या दिवाळी भेटीवरून सध्या वातावरण चांगलंच तापलं आहे. मंदिरातील कर्मचाऱ्यांना बीव्हीजी कंपनीकडून ‘चिकन मसाला’ भेटवस्तू म्हणून देण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या घटनेमुळे वारकरी संप्रदाय आणि विठ्ठल भक्तांमध्ये तीव्र नाराजी दिसत आहे. (Pandharpur Vittal Mandir) विशेष म्हणजे बीव्हीजी कंपनी विठ्ठल मंदिरात सुरक्षा रक्षक देखील पुरवते.
श्री क्षेत्र पंढरपूर हे वारकरी संप्रदायाचे पवित्र असे केंद्रस्थान मानले जाते. येथे दरवर्षी लाखो वारकरी ‘माऊली माऊली’चा गजर करत लाखो मेल पायी वारी करतात. वारकरी परंपरेनुसार शाकाहार, संयम आणि साधेपणा हे त्याचे संस्कार मानले जातात. मांसाहार, मद्यपान किंवा त्यासंबंधित कोणत्याही वस्तूंना येथे जागा नसते. अशा ठिकाणी ‘चिकन मसाल्या’सारख्या वस्तूंची भेटवस्तू म्हणून वाटप झाल्याने अनेक भक्तांनी रोष व्यक्त केला आहे.
मंदिरात सुरक्षारक्षक, स्वच्छता कर्मचारी आणि इतर काही सेवा बीव्हीजी कंपनीच आऊटसोर्सिंग पद्धतीने पुरवत असते. दिवाळीच्या निमित्ताने या कर्मचाऱ्यांना कंपनीकडून भेटवस्तू देण्यात आल्या होत्या. परंतु भेट पिशवीत चिकन मसाल्याचे पाकीट असल्याचे आढळून आले.
मे महिन्यापासून मंदिरात सुरक्षारक्षक पुरवण्याची जबाबदारी बीव्हीजी ग्रुपला मिळाली आहे. यापूर्वी ठेका असणाऱ्या ठेकेदाराकडून मंदिराच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याने त्याचा ठेका रद्द करण्यात आला होता. यानंतर मंदिरांनी निविदा प्रसिद्ध केल्यानंतर देशभरातून आठ एजन्सीने यासाठी दर दिले होते. विशेष म्हणजे या आठही एजन्सीने सर्विस चार्जेस म्हणून ३. ८५ इतका समान दर कोट केला होता. मंदिरासाठी जवळपास २२० सुरक्षारक्षक पुरवण्याचे काम बीव्हीजी करणार असून यांचा वापर मंदिर दर्शन रांग आणि मंदिर परिसरातील परिवार देवता येथे केला जात होता अशी माहिती आहे. याशिवाय यात्रेसाठी लागणाऱ्या जास्तीच्या सुरक्षारक्षकांची जबाबदारी ही बीव्हीजी कंपनीवर असणार आहे.
हे देखील वाचा – Rohit Sharma: 2027 चा वर्ल्ड कप खेळणार का? चाहत्यांच्या प्रश्नावर रोहित शर्मा म्हणाला…